Friday, August 14, 2015

वेगळा - १

कपिल मेडिटेशनला बसला होता. त्याचे वडील त्याच्याकडे बघत होते. असा कसा हा मुलगा? मी इतका कट्टर नास्तिक. हे सगळे मेडिटेशन वगैरे गोष्टींबद्दल मला कॉलेजला जायला लागल्यापासूनच तिटकारा. मग याला ही असली आवड कशी निर्माण झाली? मग त्यांना कपिलचे बालपण आठवले. तसा हा लहानपणापासूच वेगळा. कसली ईर्ष्या म्हणून नाही. हुषार पण पहिला नंबर यावा अशी जिद्द नाही. खेळात उत्तम पण शर्यत जिंकावी असे वाटतच नसे. अभ्यास करणे सराव करणे सहज केले तर केले. पण जिंकून दाखवेनच अश्या जिद्दीने नाही. म्हटले तर म्हणणार 'पहिला नंबर आल्याने काय होणार?' काय करावे याला? अर्थात तसा तो इंजिनीयर झाला. पुढे एम टेक देखिल झाला. पण काहीतरी उणीव आहे असे सतत वाटत रहाते. मलाच नाही तर त्याच्या आईला देखिल काहीतरी खटकते. पण काय? ते नक्की कळत नाही. आता तरूण मुलगा. पण एकही मैत्रीण नाही. अश्या देखण्या मुलाला मैत्रिणी का मिळत नसतील? मित्र आहेत पण अगदी जवळचा असा एकही दिसत नाही. सगळ्यांशी अगदी गोड बोलतो. पण भावना काही आहेत की नाही हेच कळत नाही. कुठल्याच विषयावर पोटतिडकीने बोलत नाही. लग्नाचा विषय काढला तर म्हणतो लग्न करून काय करायचे? बघू या. कधी ना कधी तरी वाटेलच ना लग्न करावेसे?
कपिल वेगळा होता हे खरेच होते. लहानपणापासूनच कसलाही हट्ट नाही. रडणे नाही. जे द्याल ते खाईल, ते कपडे घालेल; साधे फटाके हवेत म्हणून सुद्धा हट्ट नाही. त्याला काय आवडते विचारले तर आईला सांगता आले नसते. गोड, चमचमीत, तिखट, कसेही असले तरी तो एक शब्द न बोलता शांतपणे खात असे. हां 'शांतपणे' वरून त्यांना एक गोष्ट आठवली. विलक्षण शांतपणा हे त्याचे स्वभाववैषिष्ट्य म्हणता येईल. तंद्री लागणे हे दुसरे. काहीही दिसले की लागलीच याची तंद्री. कुठे फिरायला नेले तर समोर डोंगर, पशू, पक्षी दिसले की हरपलेच भान. किती हाका मारल्या तरी भानावर येत नसे. मग गदागदा हलवावे लागत असे. वाचतांना असेच देहभान विसरत असे. अजून विसरतो. वडील चिंताक्रांत झाले होते.
आई देखिल काळजीत होती. याला काही होत असेल का? हा नॉर्मल नाही का? बरे म्हटले तर चांगला शिकलाय. तब्बेतीने उत्तम आहे. उंच पूरा, पिळदार शरीराचा. चांगल्या पदावर नोकरी करणारा. पण त्याला कॉलेजमधूनच प्लेसमेंट झाले नसते तर याने नोकरी शोधली असती का? आताही पगार जमा झाला की नाही ते पहात देखिल नसे. मग तो बरोबर आहे की नाही हे बघणे तर दूरच. त्याच्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने केलेले त्याचे वर्णन आईला आठवले " ब्रिलियंट बट अ‍ॅबसंट माईंडेड". इतकेच असेल तर ठीक आहे पण तितकेच असेल का? हा या वयात असा मेडिटेशन का करत असेल? बरे तो स्वतः कधी मेडिटेशन वगैरे शब्द वापरत नव्हता. पण असे मांडी घालून डोळे मिटून तासभर निष्चल बसणे याला काय म्हणतात? कोणा बाबा च्या नादी तर लागला नसेल? आईचा जीव तिळ तिळ तुटत होता.

वेगळा - २
कपिलचा धाकटा भाऊ विश्वास अगदी याच्या उलट होता. अतिशय जिद्दी. पहिला नंबर कधीच सोडला नाही. टेनिस, बुद्धीबळात कॉलेजचा चँपियन. कायम मित्र मैत्रिणिंच्या गराड्यात. कपिल एकांतप्रिय तर हा गर्दीप्रिय. पण खेळायला बसले की कपिल याला बुद्धीबळात व टेनिसमध्ये देखिल हरवत असे. पण स्पर्धेत भाग घ्यायला कपिल कधीच तयार नसे. घाबरतो म्हणावे तर एकदा त्याच्या प्रिन्सिपॉलनी त्याला न विचारताच त्याचे नाव स्पर्धेत घातले. त्यावेळी त्याने स्पर्धा जिंकली होती. पण स्पर्धा संपल्या बरोबर त्याने नम्रपणे सांगितले होते की मला स्पर्धेत भाग घ्यायला आवडत नाही, माझे नाव घालू नये.
त्याच्या वडिलांनी त्याच्या नकळत प्रिन्सिपॉलना त्याच्या बद्दल विचारले होते. तेव्हां ते म्हणाले होते की 'ही इज मोस्ट ब्रिलियंट बट लॅक्स द ड्राईव, नो किलर इन्स्टिंक्ट अ‍ॅन्ड अ‍ॅब्संट माईंडेड' ते आणखी काळजीत पडले होते. त्यांनी घरी आईला सगळे न सांगता थोडक्यात सांगितले. उगाच तिला घोर नको.
पण आईला घोर होताच. तिला आठवले. एकदा, तो १० वर्षांचा असेल, त्याला व विशुला घेऊन आपण बागेत गेलो होतो. अपेक्षेप्रमाणे तो बाकावर बसून भान हरपून झाडे, पाने व पक्षी बघू लागला. त्याला विचारले आईस्क्रीम हवे का? पण त्याने उत्तर दिले नाही. मग लहानग्या विशुला घेऊन ती आईस्क्रीम आणायला गेली. परत येते तर तो तिथेच बाकावर पण मांडी घालून डोळे मिटून बसला होता. त्याला हलवून उठवले तर तो काही तरी चमत्कारिक बोलत होता. " किती दिवस गेले ना आई?" आईने विचारले "म्हणजे? " तो म्हणाला " अग मी असाच फिरायला उठलो आणि रस्ता चुकलो.मग एक झोपडी दिसली. तिथे रस्ता विचारायला गेलो तर तिथे एक पांढर्‍या झग्यातला माणुस होता. तो म्हणाला 'ये बाळा मी तुला योगासने शिकवतो' मग मला नाही म्हणताच आले नाही. मी तिथे राहिलो व त्याने मला शिकवले. कितीतरी दिवस मी शिकत होतो. मग ते म्हणाले की आता तू झोप मी तुला परत सोडून येईन. मी डोळे मिटले आणि उघडले तर तू हलवत होतीस." आई त्याच्याकडे बघत राहिली; मग म्हणाली "काय बोलतोस? अरे मी आताच तर आईस्क्रीम आणायला गेले होते ना? फारतर पाच ते दहा मिनिटे झाली असतील" पण कपिलला काही ते पटेना. तो सारखे तेच घोकत राहिला. मग आई गप्प बसली. "आहेच तंद्रट पाहिले असेल स्वप्न काहीतरी" ती मनाशी म्हणाली. पण दुसर्‍या दिवसापासून कपिल रोज आसने करू लागला. त्याचे स्पष्टीकरण कोणालाच देता आले नव्हते. वडिलांना हा प्रकार आवडला नव्हता. पण ते गप्प बसले. जाऊ दे त्रास तर देत नाही ना? तेव्हांपासून कपिल अतिशय नियमितपणे आसने करत होता.
मेडिटेशन कधी पासू सुरू झाले? हां त्याच्या कॉलेजमध्ये एक मनाच्या शक्तीबद्दल व्याख्यान आयोजित केले होते. विशु सांगत होता. पण विशुने ऐकले व सोडून दिले. पण कपिल मात्र रोज मेडिटेशनला बसू लागला. आसने व मेडिटेशन यात रोज बराच वेळ जाऊ लागला. शिक्षण संपत आले व कपिलला प्लेसमेंट मिळाली एका मोठ्या कंपनीत व उत्तम पॅकेजदेखिल मिळाले. आई व वडील दोघेही खुश झाले. आता हा मार्गाला लागेल अशी त्यांना आशा वाटू लागली. पण कपिलने आसने व मेडिटेशन सोडले नाही. त्याने वेळा जुळवून घेतल्या. लौकर उठू लागला. "कसले ध्यान करतोस रे?" एकदा आईने चिडून विचारले. तो हसून म्हणाला " ध्यान कसले ग ममा; मनाचा शोध घेतोय" "कळेल असे बोल बाबा" आई वैतागून म्हणाली. "असे बघ ममा. आपण स्वत:लादेखिल नीट ओळखत नसतो. उगाच कसला तरी विचार करत रहातो. एखादी गोष्ट आपल्याला का आवडते? एखाद्या गोष्टीचा राग का येतो? हे आपल्याला कळत नसते. पण त्याचे कारण असते आपल्या लहान वयापासून आपल्यावर झालेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये दडलेले असते. मी ते प्रोग्रॅमिंग पुसून मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. मग मला जे दिसेल, जे मी वाचेन ऐकेन ते नीट कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय कळायला मदत होईल." कपिल म्हणाला. आई गोंधळून ऐकत राहिली. पण गप्प बसली. रात्री तिने वडिलांना सगळे सांगितले. त्यांनादेखिल काही कळले नाही. त्यांनी ठरवले कपिलला सायकिअ‍ॅट्रिस्टची गरज आहे.

वेगळा - ३
कपिलच्या वडिलांनी मग सायकिअ‍ॅट्रिस्टला सांगता यावी अशी माहिती गोळा करायचे ठरवले. त्यांचे व आईचे निरीक्षण तर होतेच शिवाय विशुचे, कपिलच्या मित्र मैत्रिणींचे देखिल मत घ्यायला हवे. त्यांनी आधी विशुला विचारले. विशु म्हणाला " पपा ब्रो इज मोस्ट बॅफलिंग पर्सनॅलिटी आय हॅव सीन. तो ब्रिलियंट आहे पण तो स्वतःतच रमतो. सगळ्यांशी चांगला वागतो पण कोणाच्याही जवळ जात नाही. अंतर राखून असतो. माझे मित्र मला म्हणतात की तुझा भाऊ शिष्ट आहे" " इतक्या वर्षात त्याचे एकही भांडण झालेले नाही. माझी तर कितीतरी भांडणे झाली मग विसरूनही गेलो पण त्याचे भांडण होतच नाही. भांडण व्हायला लोकांशी इंटरॅक्ट तर व्हायला पाहिजे ना? नाही म्हणायला एकदा एक मवाली मुलगा त्याच्या मैत्रीणीला त्रास देत होता. त्याला त्याने समजावयाचा प्रयत्न केला होता पण तो ऐकत नाही म्हटल्यावर दोघांची मारामारी झाली होती. परत तो मवाली तिच्या मागे लागला नाही" "कपिलची मैत्रीण?" वडीलांनी उत्सुकतेने विचारले. "हो पपा; गौरी तिचे नाव. हा प्रसंग झाल्यावर ब्रो च्या प्रेमात पडली होती पण ब्रो चा काहीच रिस्पॉन्स नाही हे बघून शेवटी बाजूला झाली." वडीलांचा आशेने उजळलेला चेहरा हे ऐकून पडला. मग त्यांनी विचारले " त्या गौरीला भेटता येईल का? आणि इतर कोणी त्याचे मित्र मैत्रिणी आहेत का जे कपिल बद्दल नीट बोलतील? हे बघ मला वाटते की त्याला साय्किअ‍ॅट्रिस्टकडे न्यायला हवे पण असे सांगितले की काही लोक गावभर करतील व ते मला नको आहे" विशु म्हणाला " पपा तुम्ही गौरीशी बोला ती सेन्सिबल मुलगी आहे. शिवाय शंकर नाग म्हणुन त्याचा मित्र आहे तो देखिल कोणाला बोलणार नाही हे सोडून तुम्ही आमचे प्रोफेसर सागर यांच्याशी बोला ते ब्रो ला बरेच क्लोज होते" वडीलांनी विचारले "तू त्यांच्याशी माझी भेट ठरवू देऊ शकतोस का?" विशू ने ठरवण्याचे मान्य केले व तो कॉलेजला निघून गेला.
दोन दिवस गेले. मग एक दिवशी विशू ने शंकर नाग याच्याशी भेट ठरवल्याचे सांगितले. ठरलेल्या वेळी दोघे समुद्रकिनारी बसले. त्यांना गोरा पान स्मार्ट शंकर आवडला. उच्चारांवरून बंगाली किंवा त्या बाजूचा असावा. वडील म्हणाले " सगळ्यात आधी म्हणजे मी तुझा अत्यंत आभारी आहे तू मला वेळ दिल्याबद्दल" शंकर हसला; म्हणाला " डोन्ट बी फॉर्मल अंकल. मला आवडेल कपिलला माझी काही मदत झाली तर. बोला काय बोलायचे आहे?" वडीलांनी विचारले " तू कपिलचा जवळचा मित्र आहेस का?" शंकरने सांगितले  "जवळचा म्हणजे माझ्याकडून जवळचा कपिल कोणाच्याच जवळ जात नाही. पण काही लोक कसे आपोआप कनेक्ट होतात? तसे माझे त्याच्या बाब्तीत झाले आहे. मला तो आवडतो एक मित्र म्हणून व व्यक्ती म्हणून. अर्थात व्यक्ती म्हणून त्याचे वर्णन नाही करू शकणार मी. ही इज सच ए क्लोज्ड पर्सनॅलिटी. पण स्टिल अ लव्हेबल वन" वडीलांनी विचारले "बाकी कसा आहे तो?" शंकर म्हणाला " मी इतकेच सांगेन की मनात आणले तर तो काहीही करू शकेल इतका टॅलंटेड आहे पण मनात येणे हाच एक प्रश्न आहे"
पुढची भेट गौरीची ठरली. दोघे एका हॉटेलात भेटले. तरतरीत सावळी चमकत्या डोळ्यांची गौरी कोणालाही आवडेल अशीच होती. कॉफी आली. मग वडीलांनी सुरूवात केली. ते म्हणाले " विशूने संगितले असेलच मला कशाबद्दल बोलायचे आहे ते" गौरी गंभीर झाली. म्हणाली " काका मला कित्येक दिवसांपासून वाटत होते की कपिलला ट्रीटमेंटची गरज आहे. पण मी कशी बोलणार? आता तुम्हीच विषय काढला आहे तर बोलते" वडीलांनी आश्वासन दिले "नि:संकोचपणे बोल तू" ती म्हणाली " तुम्हाला कदाचित माहित असेल की कपिल मला आवडत होता. म्हणजे अजूनही आवडतो. त्याच्याशी लग्न करायला आवडेल मला. पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. आमची फारशी ओळख नव्हती तेव्हांची गोष्ट आहे. एक मवाली मला रस्त्यात अडवायचा व त्रास द्यायचा. असेच एकदा त्याने मला अडवले. मी घाबरले. सुदैवाने तितक्यात कपिल तेथे आला. त्याने त्या मवाल्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो अधिकच चेकाळला व माझ्या अंगचटीस आला. मग कपिलने त्याला खूप मारले व तो पळून गेला. या घटनेमुळे मला कपिलचे आकर्षण वाटू लागले. पण कपिलच्या चेहर्‍यावर मला कधी माझ्याबद्दल काही भावना दिसल्या नाहीत. मग मला वाटले की अन्य कोणा मुलीला क्लोज असेल पण तसे काही नव्हते. काही मुलींना तो आवडत होता पण कपिल कडून कधीच काही दिसायचे नाही. शेवटी मी त्याला थेट सांगितले की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे. तर त्यावर त्याने चक्क का असे विचारले. मी सांगितल्यावर म्हणाला लग्न बिग्न हा प्रकार मला नको आहे. तू उगाच वेळ घालवू नको. काका खरे सांगू का? पुरुषाच्या डोळ्यात असतो तसा भेदकपणा याच्या डोळ्यात नाहीये. आम्हा मुलींना याच्याजवळ ऑकवर्ड होत नाही. जणू एका यंत्रमानवापाशी वावरतोय. याच्यात काहीतरी कमी आहे" गौरी निघून गेली. पण आंतरबाह्य हादरलेले वडील बसून राहिले. म्हणजे हा पुरुषच नाही? याच्यात काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे? त्यांचे मन कळवळले. इतके दिवस आपल्याकडून दुर्लक्ष झाले का? मग त्यांनी विशुला फोन करून प्रो. सागर यांची भेट इतक्यात नको असे कळवले. पाय ओढत ते घरी आले. सगळे ऐकल्यावर आई तर मटकन खालीच बसली. वडीलांनी तिला धीर दिला व म्हणाले घाबरू नकोस निदान काहीतरी दिशा मिळाली आहे असे वाटते आहे हे काय कमी आहे? आता मेडिकल सायन्समध्ये खूप प्रगती झाली आहे नक्की काहीतरी मार्ग निघेल. मग वाटले आपण बायकोला समजावतोय का स्वतःला?
आता प्रश्न होता की कपिलला कसे सांगायचे हा. पण तो अगदीच सोपा निघाला. वडीलांनी सुरुवात केल्यावर कपिल मध्येच म्हणाला " जाऊ या ना पपा. तुम्हाला बरे वाटेल ना? मग जाऊ या. तसे मला वाटत नाही काही प्रॉब्लेम आहे असे पण तुम्ही म्हणताय तर जाऊ या" वडीलांना हाय से वाटले. "आता लौकरच चेक अप करून घेऊ" त्यांनी ठरवले.

वेगळा-४
मग वडीलांनी ओळखीच्या एम्.डी डॉक्टरची वेळ घेतली व मग ते आणि आई धडधडत्या हृदयाने भेटायला गेले. सगळे ऐकल्यावर डॉक्टर गंभीर झाले. " थोडी निराळीच दिसतेय केस. पण आपण आधी वेगवेगळ्या टेस्ट्स करून घेऊ. तुम्ही त्याला उद्या घेऊन या मग बघू या. मला देखिल नीट तपासायला लागेल"
मग दुसर्‍या दिवशी ठरलेल्या वेळी कपिलला घेऊन दोघे डॉक्टरकडे गेले. डॉ. नी आधी स्टेथॉस्कोप लाऊन नीट तपासले. मग बी.पी तपासला. बी.पी अगदी नॉर्मल होता. मग डॉ. म्हणाले की "आपण थायरॉईड टेस्ट, टेस्टेस्टेरॉन टेस्ट काही डिफीशियन्सी टेस्ट करून घेऊ या. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन डी अश्या काही कमतरता आहेत का ते पाहू या. मग परत बघू. उद्या फास्टिंग व पी.पी ब्लड द्या तपासायला."
दुसर्‍या दिवशी रक्त दिले. चार दिवसांनी रिपोर्ट मिळेल असे सांगितले. ते चार दिवस आई वडील व विशु यांनी अत्यंत तणावात काढले. चार दिवसांनी मग परत कपिलला घेऊन आई व वडील डॉ कडे गेले. कपिल शांत होता. पण आई व वडील मात्र अस्वस्थ होते. त्यांचा नंबर आला. तिघे डॉ. कडे गेले. डॉ नी समोर रिपोर्ट घेऊन त्यांना सांगितले. "चांगली बातमी आहे व वाईट देखिल. चांगली ही की सर्व रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. वाईट ही की त्यामुळे नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळले नाही. मी तुम्हाला एका ऑन्कॉलॉजिस्टकडे रेफर करतो. त्याला हे रिपोर्ट दाखवा. मग ते काय म्हणतात ते पाहू."
त्या ऑन्कॉलॉजिस्टची वेळ १५ दिवसांनी मिळाली. हे वाट पहाणे आई वडील व विशुला अत्यंत भारी पडत होते. दिवसभर नुसता तणाव. रात्रीपण नीट झोप लागेना. विचारांनी डोके भणभणायचे. कपिल मात्र शांत होता. तो सगळ्यांना धीर देत होता. "काहीही प्रॉब्लेम नाहीये का उगाच काळजी करताय?" पण काळजी करू नको म्हटल्याने काळजी थोडीच कमी होते? पण हात चोळत बसण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. अखेर तो दिवस आला.
तिघे नव्या डॉ. कडे गेले. त्यांनी पहिल्या डॉ. ची चिठ्ठी वाचली व रिपोर्ट्स पाहिले. मग त्यांनी कपिलला तपासायला आत नेले. त्यांनी कपिलला विचारले "नाईट फॉल किती दिवसांतून होतो?" कपिल म्हणाला "अजिबात होत नाही." "मग उत्तेजना येते का? म्हणजे मुलींच्या विचारांनी वगैरे?" कपिल म्हणाला "नाही". मग डॉ. नी त्याला काही स्लाईड्स दाखवत त्याचे बी.पी तपासले. पण त्या बघूनही त्याचे बी.पी नॉर्मल होते. असे कसे असेल? डॉ. विचारात पडले. काही तरी चुकत आहे. त्यांनी टेस्टेस्टेरॉन टेस्ट परत करायला सांगितली. दुसर्‍या लॅबमध्ये करा असे सांगितले. आता पुन्हा ४ दिवस वाट पहाणे आले.
वेगळा - ५
चार दिवसांनी रिपोर्ट आले. ते घेऊन परत तिघे डॉ. कडे गेले. रिपोर्ट नॉर्मल होते. डॉ. नी मग आणखी मोठ्या डॉ. ना रेफर केले. मग आणखी टेस्ट्स वाट पहाणे यात दीड महिना गेला. पण शेवटी निकाल शून्य आला. डॉ. नी सांगितले मेडिकली फिट. पण मग आता पुढे काय? समस्या तशीच होती. परत पहिल्या डॉ. कडे गेले. तेही आश्चर्यचकित झाले. पण म्हणाले "मला तरी हा काही तरी मानसिक धक्क्याने झालेला प्रकार वाटत आहे. तुम्ही एखाद्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडे न्या" वडीलांनी मनातल्यामनात डोक्याला हात लावला. घरी येऊन विचार करत बसले. अचानक एक भयानक शंका त्यांना छळू लागली. कपिल 'गे' तर नसेल? त्याची मुलींबद्दल असलेली अनास्था पण त्याचवेळी असणारे तंदुरुस्त शरीर एकांतप्रियता हे प्रकार त्यांची शंका दृढ करू लागले. परत त्यांनी चौकशी केली. पण गौरी, शंकर नाग व विशुने देखिल ती शक्यता फेटाळून लावली. कपिल मुलांशीदेखिल क्लोज नव्हता. मग आता?
आता साय्किअ‍ॅट्रिस्टकडे जायचे आहे. मग वडीलांना प्रो. सागर यांची आठवण झाली. त्यांना भेटायचे राहून गेले. त्यांनी विशुमार्फत वेळ ठरवली. कॉलेजमध्येच भेट ठरली. वडील कॉलेजम्ध्ये गेले. प्रो. सागर यांच्या केबिन मध्येच भेट झाली. निमगोरे, चेहर्‍यावर बुद्धीमत्तेचे तेज असलेले, सोनेरी काड्यांचा चष्मा लावलेले सागर यांचे व्यक्तिमत्त्वच आदर उत्पन्न करणारे होते. त्यांनी वडीलांचे प्रसन्नपणे स्वागत केले. विशुने त्यांना कल्पना दिली होतीच. मग सरळ मुद्द्यावर आले. "बोला काय म्हणणे आहे तुमचे? कपिल माझा फेवरिट विद्यार्थी होता. मला जमेल ती मदत मी करीन" वडीलांना बरे वाटले. त्यांनी सर्व पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली. स्वतःला वाटणारी काळजी देखिल सांगितली. व मानसोपचार तज्ञाकडे जायचे असल्याचेही सांगितले.
जरा वेळ विचार करून प्रो. सागर बोलू लागले " मला नाही वाटत कपिलमध्ये काही प्रॉब्लेम आहे असे. काय होते की आपण एका चाकोरीत जगत असतो. त्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की या चाकोरीबाहेर काही दिसले तर आपल्याला ते अ‍ॅबनॉर्मल वाटू लागते. असे काही असू शकते हेच आपल्याला मान्य नसते. पण आपण हे लक्षात घेत नाही की आपल्या मनाचे प्रोग्रॅमिंग पहिल्यापासून तसे झालेले असते. मग काहीही वेगळे दिसले की आपल्या मनाचा कॉम्प्यूटर आपल्याला 'एरर' चा सिग्नल देऊ लागतो. गरज आहे ती आपण पूर्वग्रहदूषित मनाने विचार न करण्याची." वडील चमकले अरे हे तर कपिलसारखीच भाषा बोलतात. म्हणजे यांचाच प्रभाव आहे का त्याच्यावर? विचारल्यावर प्रो. सागर हसले म्हणाले " नाही. कपिल आम्हाला ज्यांनी शिकवले ते श्रीराम सर यांना भेटायला जात असे. त्यांच्याचकडून तो बर्‍याच गोष्टी शिकला आहे. पण सध्या ते व्याख्यान द्यायला देशाबाहेर गेलेत. तो पर्यंत तुम्ही मानसोपचार तज्ञांना दाखवत का नाही? मला खात्री आहे की तिथेही नॉर्मल असल्याचाच रिपोर्ट येईल."
वडिल सावकाश उठून बाहेर आले. गेल्या दीड महिन्यात ते थकल्यासारखे झाले होते. जोम राहिला नव्हता. आईची अवस्था फारशी वेगळी नव्हती. तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसत होती. चिंता व झोप न येणे याचा हा परीणाम होता. ते परत डॉ. कडे गेले. डॉ नी एका सायकिअ‍ॅट्रिस्टला चिठी लिहून दिली. भेट ठरवली. आठ दिवसांनंतरची वेळ मिळाली. तेवढ्यात डॉ. नी काही गोळ्या त्यांच्या हातात ठेवल्या. म्हणाले " विटॅमिनच्या आहेत. तुम्ही दोघांनी घ्यायला हव्यात. प्रसंगाला तोंड द्यायला शक्ती शिल्लक रहायला हवी." गोळ्या घेऊन वडील घरी आले. आई वाटच पहात होती. वडीलांनी थोडक्यात सगळे सांगितले. म्हणाले की "प्रो. सागर यांना कपिलमध्ये काही प्रॉब्लेम असेल असे वाटत नाही. आता सायकिअ‍ॅट्रिस्ट काय म्हणतात ते बघावे लागेल. पण आठ दिवसांनंतरची वेळ आहे. तो पर्यंत आपण स्वतःकडे पहायला हवे. मी पण कामावर जातो. या गोळ्या घे. रोज एक गोळी आपण घ्यायला हवी. तोंड द्यायचे आहे ना?" भिजल्या डोळ्यांनी आईने गोळ्या घेतल्या. दोघांनी जेऊन घेतले. गोळ्या देखिल घेतल्या. आता परत ती जीवघेणी वाट बघणे आले.
सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटायचा दिवस जवळ आला. वडिलांनी आधी फोन केला. त्यांनी आधी भेटायचे असल्याचे सांगितले. डॉ. म्हणाले की "अवश्य भेटू या. पण येतांना तुम्ही त्यच्या हस्ताक्षरात लिहिलेले काही तरी घेऊन या." वडिलांनी फोन ठेवला. काय न्यावे? विशुला विचारले तर विशु म्हणाला "काही प्रॉब्लेम नाही पपा. मी ब्रो च्याच नोट्स वापरतो. त्या घेऊन जा." वडिलांनी मग स्वतःदेखिल नोट्स काढल्या. आजपर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सविस्तर्पणे लिहून काढल्या. आपले, आईचे, व भेटलेल्या सगळ्या.चे कपिलबद्दलचे निरीक्षण लिहून काढले. हे सगळे व त्याचे रिपोर्ट्स यांची एक फाईल केली. आता उद्या भेटायला जायचे होते.
अपूर्ण
वेगळा - ६
अखेर तो दिवस उजाडला. आई व वडिल सगळी कागदपत्रे घेऊन सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेले. डॉ. निळकंठ एकलहरे सायकिअ‍ॅट्रिस्ट व हिप्नॉटिस्ट अशी पाटी वाचून ते आत शिरले. एसी च्या गारव्यात त्यांना बरे वाटले. एक जण पाणी व चहा घेऊन आला. एका डॉ. कडे असे स्वागत? त्यांना आश्चर्य वाटले. कदाचित सायकिअ‍ॅट्रिस्टकडे होत असेल. मग दोघे वाट पहात बसले. लवकरच् त्यांना बोलावले गेले. दोघे डॉ.च्या केबिन मध्ये शिरले. मध्यम वयाचे, गोरे, उंच भेदक डोळ्यांचे डॉक्टर पाहून त्यांना धीर आला. इथे काहीतरी होईल असे वाटले. डॉ. नी आधी परीचय करून घेतला. मग म्हणाले सांगा आता काय सांगायचे आहे?
वडिलांनी खाकरून सुरुवात केली. "आमच्या मोठ्या मुलाची ही केस आहे. ही डॉक्टरांची चिठ्ठी आहे." मग एकलहरे डॉक्टरांनी ती चिठ्ठी वाचली. "अस्स. तर तुमचा मुलगा नॉर्मल नाही असे तुमचे म्हणणे आहे. मला सांगा की असे तुम्हाला का वाटते?" वडिलांनी सांगितले " एक तर तो कोणात फारसा मिसळत नाही. त्याला कसली ड्राईव नाही जिद्द नाही. हुषार पण पहिला नंबर यावा, सर्वोत्कृष्ट ठरावे असे वाटत नाही. तसा तो एम. टेक झाला आहे. पण तरी तो जे काही करू शकतो त्यामानाने तो करत नाही असे आम्हाला वाटते." "दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा योगासने व मेडिटेशनकडे असणारा कल. मी पहिल्यापासून नास्तिक. हे देवदेव करणारे मंदिरात जाणारे यांच्याबद्दल मला तिरस्कार आहे. तिटकारा आहे. मी जाणीवपूर्वक मुलांना कॉन्व्हेन्ट मध्ये शिकवले. आमच्या घरी देव्हारा वगैरे फॅड नाही. पण तरी हा मुलगा योगासने करतो नियमित मेडिटेशनला बसतो." डॉ. नी त्यांना मध्येच थांबवले. विचारले " तुम्हाला नक्की काय खटकते आहे? तो तुमच्या मतांबाहेर जातोय असे तुम्हाला वाटते हे का अजून काही?" मग चाचरत वडिलांनी कपिलच्या स्त्रीबद्दल आकर्षण न वाटण्याबद्दल सांगितले. डॉ. म्हणाले "ठीक आहे त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेले काही आणले आहे?" "हो" वडिल म्हणाले " या त्याच्या नोट्स आहेत."
डॉ. नी त्या नोट्स बारकाईने तपासल्या म्हणाले "मला तरी काही वैचारिक गोंधळ दिसत नाही." "म्हणजे?" वडिलांनी विचारले. " कसे असते; मनात गोंधळ असेल तर तो हस्ताक्षरात उमटतो" डॉ म्हणाले " म्हणजे काही अक्षरे मागे पुढे होणे; शब्द संपता संपता अक्षर इतके लहान होणे की ते वाचता न यावे. पण इथे तसे काही नाही. अक्षर सुंदर नसले तरी वाईट देखिल नाही व कुठे ही फरकाटे नाहीत. अक्षरे उलटी सुलटी नाहीत. लहान मोठे नाही. सगळे नीट लिहिले आहे. म्हणजे हा वैचारिक गोंधळ नाही वाटत. बरे तुमची आर्थिक परीस्थिती कशी आहे? घरी त्याच्यासमोर काही भांडणे झालीत का त्याच्या लहानपणी?" वडिल सांगू लागले "आमची आर्थिक परीस्थिती उत्तम आहे. त्याने काही काम न केले तरी आयुष्यभर ददात पडणार नाही इतकी माझी संपत्ती आहे. भांडणे तर कधीच नाहीत." डॉ. म्हणाले "मग बाहेर कुठे काही त्याला धक्का बसेल असे झाले आहे का तुमच्या माहितीत?" आई ने सांगितले "मला तरी तसे वाटत नाही. मला कळले असते" डॉ. म्हणाले "ठीक आहे त्याला घेऊन या त्याच्याशी बोलून काय ते कळेल"
मग आईने विचारले " होईल ना तो बरा?" डाँ. नी त्यांचे भेदक डोळे आईवर रोखले. "मुळात तो नॉर्मल नाही हे सिद्ध व्हायला हवे. केवळ तो योगासने करतो मेडिटेशन करतो, त्याला जिद्द नाही असे तुम्हाला वाटते यावरून तो अ‍ॅब्नॉर्मल ठरत नाही. हां एकच मुद्दा आहे की या वयात त्याला स्त्रीचे आकर्षण का नाही मेडिकली प्रॉब्लेम नसूनही हाच. त्याबद्दल त्याच्याशीच बोलायला लागेल. स्त्री सान्निध्याचे टेन्शन येते का काही कारणाने हे तोच सांगू शकेल. काय आहे असे टेन्शन सगळ्याच पुरुषांना वयात येतांना असते पण आकर्षणाचा जोर इतका असतो की टेन्शन असूनही तो पुढाकार घेतो. पण काही लोकांच्या बाबतीत हे घडत नाही. मग त्यांना काउन्सेलिंगची गरज असते. तो भेटला की कळेल खरे काय ते." डॉ. नी दोघांना निरोप दिला.
आई वडिल बाहेर पडले. घरापर्यंत कोणीच कोणाशी काही बोलले नाही. घरी आल्यावर आईने विचारले " काय वाटते" तिच्या स्वरात आशा होती. वडिल बराच वेळ काही बोलले नाहीत. मग म्हणाले " मला वाटते की मी माझ्या अपेक्षा व मते देखिल लादत आहे. डॉ. म्हणाले तसे त्याचे मुलींशी वागणे हा एकच प्रॉब्लेम आहे. बघू आता कपिल भेटल्यावर काय होते ते. मला तरी हे डॉ. योग्य तेच करतील असे वाटत आहे. आता पुढच्या आठवड्यात कपिलला एकट्याला बोलावले आहे मग बघू काय होते ते". मग दोघे वाट बघू लागले. या वेळी वाट पहाण्यात आशा होती.
कपिलच्या डॉ. च्या भेटीचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. कपिलने त्यांना फोन केला व उद्या १०.३० ला ठरल्याप्रमाणे येतोय असे सांगितले. मग डॉ. नी देखिल त्याची फाईल नीट वाचून घेतली. काही पॉइंट्स लिहून काढले. त्यांना दोनच गोष्टी खटकत होत्या. एक म्हणजे त्याची स्त्री विषयक उदासीनता व त्याचे योगासनांबद्दलचे स्वप्न अथवा जे काही असेल ते. त्याच्या विषयीची सगळ्यांची मते त्यांनी परत परत वाचली. परत काही नोट्स लिहिल्या व फाईल ठेवून दिली.
ठरल्या वेळी कपिल त्यांच्या क्लिनिकमध्ये शिरला. स्वागतिकेने त्याला बसायला सांगितले. तो बसला. समोर आलेले पाणी पिऊन त्याने चहा मात्र नाकारला. हे सगळे डॉ. सी.सी टी.व्ही मधून पहात होते. कपिल सावळा, देखणा उंच असा २५-२६ चा तरूण होता. कपडे स्वच्छ इस्त्री केलेले. नीट नेटके. पण तरीही "सोबर" मध्ये मोडणारे. त्याच्यावर कसलाही ताण दिसत नव्हता. त्याच्या वागण्यात सहजता होती. साधारणपणे मानसोपचारतज्ञांकडे येतांना कोणीही तणावाखाली असते. पण हा अगदी सहजतेने वावरत होता. डॉ. नी त्यांच्या वहीत नोंद केली. डॉ. नी त्याला आत पाठवायला सांगितले.
कपिल आत शिरला. " नमस्कार डॉक्टर; आत येऊ का" त्याने विचारले. " ये ये बस इथे " डॉ. म्हणाले. कपिल डॉ. समोर बसला. डॉ. नी आपले भेदक डोळे त्याच्यावर रोखले. डॉ.च्या डोळ्यात समोरच्याला अस्वस्थ करण्याची ताकद होती. पण कपिल चे काळेभोर डोळे शांतपणे डॉ कडे बघत होते. "किती विलक्षण शांत नजर! " डॉ. मनाशी म्हणाले. डॉ. नी विचारले "चहा-कॉफी घेणार? " कपिलने प्रसन्न हसत नाही म्हटले. मग डॉ. नी प्रश्नांना सुरुवात केली.
डॉ. : शिक्षण किती झाले आहे? आणि काम काय करतोस?
कपिल : एम. टेक मेकॅट्रॉनिक्स. नोकरीला आहे. सॉफ्टवेअर डिव्हिजनमध्ये एका मोठ्या कंपनीत.
डॉ. : काम कसे आहे? म्हणजे जॉब सॅटिसफॅक्शन आहे का?
कपिल : काम उत्तमच आहे. मी त्या कंपनीतल्या अनेक प्रोजेक्ट्स पैकी डिफेन्सला लागणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम करत आहे. म्हणजे असे पहा की पुढची युद्धे यंत्रमानव लढतील. त्यासाठी आतापासून काम सुरू आहे. म्हणजे जे काही दिसते त्याचे फोटो त्याचे कॅमेरा घेतील व त्यानुसार निर्णय त्याला घेता आले पाहिजेत. एकूण समोरचे दृष्य त्याला वाचता आले पाहिजे. यापेक्षा अधिक मी सांगू शकणार नाही कारण हा प्रोजेक्ट तसा गोपनीय आहे"
डॉ. : तुला युद्धे आवडतात? म्हणजे कसे आहे की युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे आर्थिक बोजा. विनाकारण हिंसा.
कपिल : प्राचीन काळापासून युद्धे चालत आली आहेत. ती ना कोणाला रोखता आली आहेत ना येतील. त्यात आपण काही करू शकत नाही. माझे काम आहे दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे व मी तेवढेच करतो.
डॉ. ( वहीत नोंद करत) : बरे; मी ऐकले की तुला फारसे मित्र मैत्रिणी नाहीत? का बरे? तुझे कोणाशी पटत नाही का?
कपिल ( हसून) : असे मुळीच नाही. माझे आणि त्यांचे इंटरेस्ट वेगवेगळे आहेत असे म्हणू या. पण माझे कोणाशी मतभेद नाहीत ना भांडण. त्यांची बरीचशी चर्चा सिनेमा, फॅशन, परदेशी जाणे कसे महत्त्वाचे आहे यावर असते. मला स्वतःला हे विषय फारसे आवडत नाहीत.
डॉ. : का बरे? या वयात हे विषय नैसर्गिक आहेत ना?
कपिल : असे समाजमान्य आहे खरे. पण मला स्वतःला तसे वाटत नाही. कुठल्या वयात काय योग्य याचे आपण ठोकताळे बनवले आहेत पण कोणी त्या चाकोरीत बसत नसेल; बसू इच्छित नसेल तर तो अ‍ॅबनॉर्मल ठरत नाही.
डॉ. ( हसत) : निश्चितच नाही पण तसे असण्याला काही कारण तर हवे ना?
कपिल : अर्थातच. पण हा विषय मोठा आहे. पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. कसे आहे की आपण सगळे प्रतिमांमध्ये जगतो. प्रत्येक माणसासमोर आपली वेगळी प्रतिमा, प्रत्येक प्रसंगाला आपण कसे तोंड देणार हे आपल्या प्रतिमेनुसार ठरते. पालकांसमोर मी सरळमार्गी अभ्यासू व करीयर ओरिएन्टेड असेन तर मित्र मैत्रिणींसमोर डॅशिंग, डेअर डेव्हिल अशी प्रतिमा, मित्रांसमोर केअरफ्री तर मैत्रिणिंसमोर केअरिंग. मग मी तसेच वागायचा प्रयत्न करतो. कॉलेजात वेगळा, प्राध्यापकांसमोर वेगळा नातेवाईकांसमोर वेगळा वयानुसार वेगळा. होते काय की या सगळ्या प्रतिमांचे ओझे वागवतांना आपण स्वतः कुठेतरी हरपून जातो. माझा प्रयत्न हा आहे की कोणत्याही प्रतिमेत न अडकता मी स्वतः कसा आहे याचा शोध घेऊन तसे रहाण्याचा व जीवनाचा आनंद लुटण्याचा. आज जर मला एखादे गाणे रस्त्यात म्हणावेसे वातले तर माझी प्रतिमा आड येता कामा नये असे स्वच्छंदपणे रहाता आले पाहिजे. मला एखादी गोष्ट करायची नसेल तर केवळ माझी प्रतिमा तशी आहे म्हणून मला ती करायला लागता कामा नये. हे सगळे कमी म्हणुन की काय आपण अन्य लोकांच्या देखिल प्रतिमा बनवतो. मग त्याने तसेच वागायला हवे असे आपल्याला वाटते. शिवाय बरेचदा केवळ कोणी सांगितले म्हणूनही आपण प्रतिमा बनवतो. लोक सांगतात अरे तो ना आखडू आहे मग आपण त्याच्याशी वागतांना ते डॉक्यात ठेऊन वागतो मग त्याची प्रत्येक गोष्ट आपण त्या चष्म्यातून पहातो. त्यामुळे मूळ व्यक्ती आपल्याला कळत नाही.
डॉ. : ईंटरेस्टिंग. मला तुझ्याशी आणखी बोलायला आवडेल. परत येशील का तू? माझी आणखी एक अ‍ॅपॉइंटमेंट आहे.
कपिल : हो दोन दिवसांनी येईन मी.
कपिल बाहेर पडला. डॉ. नी वहीत नोंद केली. क्लियर थॉट्स, रॅशनल थिंकिंग, दो अन्युज्वल. डसन्ट सीम टु बी हॅविंग एनी डिसऑर्डर.
आता पुढच्या सिटींगला कळेल.
दोन दिवसांनी कपिल परत डॉ. एकलहरे यांच्यासमोर बसला होता. आज शनिवारची सुट्टी होती त्यामुळे तो जीन्स व टीशर्ट घालून आला होता. त्यातून त्याचे दंडातील स्नायू दिसत होते. एकुणच शरीरयष्टी उत्तम म्हणता येईल अशी होती. आता तो परत आपली शांत नजर डॉ. च्या डोळ्यांना भिडवून बसला होता. डॉ. नी सुरुवात केली.
डॉ. : कपिल परवा तू इमेज मध्ये अडकायचे नाही असे म्हणालास त्यावर आणखी काही सांगशील का?
कपिल : डॉ. तुम्ही सिनेमा पहाता का? जर पहात असाल तर दिलीपकुमार ट्रॅजेडीकिंग, अमिताभ अँग्री यंग मॅन, राज कपूर बावळट अश्या खेडवळ माणसाच्या भूमिकेत अडकलेले दिसतात. या प्रतिमेबाहेर त्यांना यायला जमले नाही. तसे काहीसे आहे. आपणच आपली इमेज करून घेतो व त्यात अडकतो. फरक इतकाच की नटनट्यांची इमेज ही त्यांच्या भूमिकेला मिळणार्‍या प्रतिसादावर अवलंबून असते तर आपली प्रतिमा आपल्याला काय व्हावेसे वाटते त्या इच्छा आकांक्षा, लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, आपण पहात असलेली मॉडेल्स यातून घडत असते. उदाहरणार्थ बहुतेक सगळेच स्त्री-पुरुष आदर्श प्रेमी, आदर्श पती पत्नी, आदर्श शेजारी, आदर्श व्यावसायिक अथवा एम्प्लॉयी, किंवा आदर्श आई-बापाच्या प्रतिमेत अडकलेले असतात. पण या प्रतिमा कुठून येतात? त्यामागे विचार प्रक्रिया असते का? चांगले आई वा बाप होंणे म्हणजे नक्की काय याचा विचार आपण केलेला असतो का? तर याचे उत्तर नाही असेच येते. आपण बहुधा आपली प्रतिमा आपली आई वा बाप अथवा आजूबाजूचे तश्याच भूमिकांमधील लोक यातून शोधतो. शिवाय कथा कादंबर्‍यांमधूनही आपण त्या प्रतिमा शोधतो. स्त्रियांच्या बाबतीत तर हल्ली टी.व्ही मधूनही मारा होत असतो. तिला सर्व ज्ञानी; सगळे माहित असलेली घरादारावर अधिकार गाजवणारी अशी दाखवली जाते. मग स्त्री स्वतःची सूपर वूमन अशी प्रतिमा करू पहाते. खरे काय हवे? तर अगदी प्रतिमेत जरी जगायचे म्हटले तर त्यामगे दीर्घ विचारप्रक्रिया व अभ्यास हवा. पण तसे घडतांना दिसत नाही.
डॉ. : पण प्रतिमांमध्ये तू म्हणतोस तसे जगले तरी तोटा काय आहे?
कपिल : का बरे? एकदा का एखाद्या प्रतिमेत आपण अडकलो की त्यात शोभण्यासाठी आपण धडपडत रहातो. कधी कधी जमत नसून प्रयत्न करत रहातो. मग मनस्वास्थ्य हरपते. चिड चिड होते, त्रास होतो तरी आपण धावतच रहातो. आता पहा ना. तुम्ही वाढदिवस साजरा केला. आनंदात असता. पण कोणी तुम्हाला महागडे गिफ्ट दिले की तुम्हाला दडपण येते. मग आपणही तसेच द्यायला हवे नाहीतर वाईट दिसेल असे तुम्हाला वाटते हे का वाटते तर तुमची एक इमेज आहे. मग परवडत नसले तरी तुम्ही प्रयत्न करता तसे गिफ्ट देण्याचा. पण मग त्यात आनंद नसतो. हा जो प्रकार आहे आपण जे नाही तसे जगासमोर दिसण्याचा जसे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न यामुळे मनःशांती ढळते. शेवटी सगळ्यांना मनःशांती हवीच असते ना?
डॉ. : मग इमेजमध्ये अडकले नाही तर मनःशांती प्राप्त होईल असे तुला वाटते का?
कपिल : केवळ तेवढ्याने नाही पण मनाचा तोल ढळण्याचे प्रसंग कमी येतील हे निश्चित. आज जिकडे तिकडे शर्यत लागली आहे. मी सगळ्यात पुढे कसा असेन हे लोक पहात आहेत. नाहीतर तुम्ही बावळट; मागास; कमी क्षमतेचे ठरण्याची भीती आहे. हे तुम्हाला नको आहे, का? कारण तशी तुमची इमेज नाही. त्या इमेजच्या बाहेर पडण्याची तुम्हाला भीती वाटते. त्या इमेजची एक सुरक्षित चौकट तुमच्या भोवती आहे असे तुम्हाला वाटत असते. पण खरोखरच ती सुरक्षित असते का? तर नाही. उलट कधी कधी ती घातक ठरते. पहा पुरुषाची इमेज कशालाही धैर्याने तोंड देणारा न घाबरणारा अशी आहे. मग त्याने घाबरून कसे चालेल? रडून कसे चालेल? मग यापायी तो सगळे आतल्या आत दाबून ठेवतो. साहजिकच याचा परीणाम त्याच्या प्रकृतीवर होतो. वाढता ताण सोसायला त्याला जमत नाही. मग आहेच रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात तरी सगळ्यांनी हा विचार करायला हवा.
डॉ. विचार करत : तू म्हणतोस त्यात तथ्य असले तरी हजारो वर्षे लोक असेच जगत आले आहेत.
कपिल : एकदा एकादी चौकट चूक म्हटले की ती किती वर्षे चालत आली आहे याला काही अर्थ उरत नाही. हे हजारो वर्षे चालत आले आहे हे खरेच पण जिकडे तिकडे कलह देखिल हजारो वर्षे चालत आला आहे. मानसाची दु:खे देखिल चालत आली आहेत. आपल्याला नक्की काय हवे याचा नीट विचार न केल्याने तसे होत आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला हवी असे आपण म्हणतो त्यावेळी ती बहुधा अन्य कोणाकडे असते म्हणून म्हणतो. तिची आपल्याला खरोखरच गरज आहे का? असा विचार आपण करत नाही. मग त्याच्यामागे आपण धावत सुटतो. त्यावेळी हे आपण लक्षात घेत नाही की प्रत्येक माणूस निसर्गाने निराळा घडवला आहे. पण आपण आपले निराळेपण जपण्यापेक्षा आपण सर्वसामान्य आहोत यातच अभिमान मानायला बघतो. ही बाब खरोखरच शोचनीय आहे.
डॉ. : पण मग आपण निराळे आहोत हे कसे शोधायचे?
कपिल : त्याचसाठी तर स्वतःचा शोध घ्यायला हवा. आपण नक्की कसे आहोत हे निरपेक्षपणे पहायला हवे. तटस्थपणे पहायला हवे. याचा उपयोग तुम्हाला दैनंदिन जीवनात देखिल होईल. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पहाता येईल. मग ती गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आकलन होईल. ती सर्वंकषपणे समजेल. मग कशानेही तुमचे मन विचलित होणार नाही. मनाचा तोल ढळणार नाही. कायम उत्साही व आनंदी राहील. सगळ्यात कुतूहल वाटेल. पण आधी स्वतःचा शोध घ्यायला हवा.
डॉ. : बरे आपण पुढच्या सिटिंगला यावर अधिक बोलू.
कपिल बाहेर पडला. डॉ. विचारात पडले होते. त्यांनी वहीत नोंद केली.
Very assertive. Deep thought process. A completely new approach towards life. Quite logical and thoght provoking argument. No behavioural Traits found that point to any disorder.

वेगळा - ९
आज परत कपिलची अ‍ॅपॉइंटमेंट होती. डॉ. नी त्याची फाईल उघडली. सगले पेपर्स पुन्हा तपासले. झालेल्या सगळ्या संभाषणांची रेकॉर्डिंग्स ऐकली. विचार उच्च बुद्धीमत्ता दाखवत होते हे खरेच होते पण या वयात ही समज कशी आली असेल? त्याच्या जीन्समध्येच असे काही अज्ञात ट्रेट होते का काही बाह्य ट्रिगर कारणीभूत आहे? काय घडले म्हणून तो त्याच्या मते स्वतःच्या शोधाकडे वळला? आज याची माहिती घ्यायची. डॉ. नी ठरवले. ते कपिलची वाट पाहू लागले. मग अचानक त्यांना लक्षात आले की कपिल ११ ला येणार आहे व अजून वेळ आहे. आपण इनव्हॉल्व होतोय का? हे योग्य नाही त्यांनी स्वतःला बजावले. सायकिअ‍ॅट्रिस्टने क्लिनिकल असा तटस्थ अ‍ॅप्रोच ठेवायला हवा. पण कपिलच्या केसने त्यांना विचार करायला लावले होते हे निश्चितच होते.
ठरल्यावेळी कपिल आला. डॉ. नी सुरुवात केली.
डॉ. : कपिल तुझे प्रतिमेत जगणे याबद्दलचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. पण मला सांग हे तू कुठून शिकलास? लहानपणापासून तर तुझ्याकडे नव्हते?
कपिल : नाही नाही डॉ. मी जे काही बोलतो ते आमचे श्रीराम सर यांचे कडून शिकलो.
डॉ. : हे कोण श्रीराम सर? कधी नाव ऐकले नाही.
कपिल : श्रीराम सर Achieve Your goals through focusing या विषयावर व्याख्याने देतात. शिवाय Find The real Yourself ही संस्था चालवतात. व्याख्यानांची फी असते तर त्यांच्या संस्थेत जे शिकायला जातात त्यांना विनाशुल्क शिकवतात.
डॉ. : फोकसिंग ऑफ माईंड म्हणजे नक्की काय?
कपिल : असे बघा की आपण जे काही करतो त्यात आपली पूर्ण एकाग्रता नसते. अगदी ऐकण्यात, वाचण्यात पहाण्यात देखिल पूर्ण एकाग्रता नसते. ज्यावेळि आपण काही ऐकत वा वाचत असतो त्याचवेळि आपण अनेक विचार करत असतो. त्या विषयाशी संबंधित व अजिबात संबंध नसलेले विचार सुद्धा. म्हणजे पहा की आत्ता तुम्ही माझे म्हणणे ऐकत आहात पण त्याचवेळी तुम्ही कुठेतरी अनेक विचार करत असाल. अशी एखादी केस आपल्या वाचनात पूर्वी आली आहे का? असेच काही मी पूर्वी ऐकले वाचले आहे का? हा जे बडबडत आहे ते अर्थपूर्ण आहे का? त्याचवेळि अगदी वेगळे विषय देखिल असतील. दुसर्‍या केससंबंधी विचार असतील. घरच्या एखाद्या कामाविषयी असतील संध्याकाळी कोणाला भेटायचे असेल त्यासंबंधी असतील. एकूण काय तर तुमच्या मनाची शक्ती तुम्ही माझ्या बोलण्याकडे एकवटली नाहीये. त्याला अनेक फाटे फुटले आहेत. मग माझे म्हणणे सर्वंकषपणे तुम्हाला कसे समजेल? हाच प्रकार आपण सगळ्याच बाबतीत करतो कुठलीच गोष्ट एकाग्रपणे करत नाही. अनेक विचारांची गर्दी मनात असते. त्यामुळे ती गोष्ट नीट कळतही नाही व होतही नाही. जीवनातील बहुतेक अपयशांमागे हेच कारण असते. जे जे यशस्वी लोक असतात त्यांच्यात पूर्ण नसले तरी विचार बर्‍यापैकी कमी असतात. हे त्यांना नैसर्गिकपणे जमते. पण बहुतांश म्हणजे अगदी ८० टक्के लोकांना हे जमत नाही ज्यांना जमते त्यात देखिल विचार किती कमी होतात याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्याचमुळे यशाचे प्रमाण देखिल वेगवेगळे असते. पण आपण जर एखाद्या पद्धतीने हे विचार बाजूला सारू शकलो तर आपल्या कामाचे समोरच्या विषयाचे आपल्याला नीट आकलन होईल आणि मग ते काम पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकू.
डॉ. : म्हणजे जर एखाद्याची ऐकण्या वाचण्याकडे एकाग्रता असेल तर तो विषय त्याला पूर्ण समजेल असे तुला म्हणायचे आहे?
कपिल : केवळ तेवढ्याने नाही. पण तेवढे जरी जमले तरी कितीतरी यश पदरी पडेल. पण जर मन पूर्वग्रहरहित करायला जमले तर आणखी वेगळ्या प्रकारे त्या विषयाकडे पहाता येईल. आपण तटस्थपणे पाहिले तरच संपूर्ण आकलन होते. पहा कोणी काही सांगत असेल तर आपण ते कसे ऐकतो? तर आपल्या भूतकाळाशी ते तूलना करून पहात असतो. आपण याआधी जे ऐकले वाचले आहे त्याच्याशी तूलना करत असतो. आपण लहानपणापासून ज्या मान्यता घेऊन वाढलो त्यात हे सगळे बसले तर ते बरोबर अन्यथा ते चूक अशी आपली उथळ रीत असते. पण तटस्थपणे बघणे हे कोणालाच माहीत नसल्यामुळे त्याची जाणीवच दिसत नाही व हेच मोठे दुर्दैव आहे.
डॉ. : पण ते साहजिकच आहे ना? आपले याआधीचे सगळे ज्ञान विसरून जायचे असे तुला म्हणायचे आहे का?
कपिल : अजिबात नाही. मला इतकेच म्हणायचे आहे की आपण ज्यावेळी नवीन काही ऐकत वाचत असतो त्यावेळेपुरते ते निष्कपटपणे ऐकावे. निरागस होऊन ऐकावे. एखादे लहान मूल कसे मोठ्या कूतूहलाने सगळ्या गोष्टींकडे पहाते? त्यामुळे त्याची आकलनशक्ती तीव्र असते. जे ऐकेल ते त्याच्या लक्षात रहाते. भूतकाळ फार कमी असल्याने डेटा कंपेअर करणे हा प्रकार ते करत नाही. साहजिकच त्याची एकाग्रता चांगली आते. मग हाच निरागसपणा कोणत्याही उपायाने आपल्यात आणता येईल का हे पाहिले पाहिजे. आपला भूतकाळ हाच आपल्या मार्गातील अडसर ठरतो. साहजिकच जितका मोठा भूतकाळ तितकीच ग्रहणशक्ती कमी आणि नीट न ऐकल्याने व वाचल्याने विस्मरण होऊ लागते. कारण मेंदू हा स्कॅटर्ड अवस्थेत असतो. म्हणुनच वया बरोबर आकलन शक्ती, ग्रहण शक्ती व स्मरणशक्ती कमी होते. हेच दुरुस्त करता आले पाहिजे. उलट फिरवता आले पाहिजे. मग इतर फायदे देखिल होतात. आपले मन शांत रहाते. भांडणे कमी होतात. मनाचा गोंधळ कमी झाल्याने प्रकृतीच्या तक्रारी देखिल कमी होतात.
डॉ. : या सगळ्याचा भांडणाशी काय संबंध?
कपिल : जगातील ७० ते ८० टक्के भांडणे; इथे मला वैयक्तिक स्वरूपाची भांडणे म्हणायचे आहे; ही गैरसमजांमुळे होतात. आणि गैरसमज का होतात तर आपण नीट न ऐकल्यामुळे अथवा पूर्वग्रहदूषितपणे ऐकल्यामुळे. आपले एखाद्याबद्दल काही मत असते. त्या मतानुसार आपण त्याच्या कोणत्याही बोलण्याचा अर्थ लावतो. त्याला काय म्हणायचे आहे हे आपणच ठरवतो व त्याप्रमाणे वागतो. त्यापेक्षा त्याला प्रतिक्रियाच नाही दिली अथवा शाब्दिक अर्थाने दिली तर? दुसर्‍याच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचे काम आपण का करायचे? त्याचे काम त्याला करू देत ना? हेच लॉजिक सर्व स्तरांत उपयोगी ठरते. उदाहरणार्थ समजा मी एका इंटरव्ह्यूला जातोय. मग होते काय की मी आधीच असे विचार करतो की तो असे विचारेल मग मी असे बोलेन एकूण काय तर त्याचे काम माझे मन करत असते. त्यात मनाची शक्ती वाया जाते. त्यापेक्षा आपण आपला विषय नीट अभ्यासला तर? मग कोणताही प्रश्न आला तरी आपण गडबडणार नाही. पण तसे होत नाही.
डॉ. : आज तू एक नवा विचार मांडत आहेस. प्रतिमांमध्ये जगणे चूक आहे याच्याशी याचा काही संबंध आहे का?
कपिल : नीट विचार केला तर तेच म्हणणे मी पुढे मांडत आहे हे लक्षात येईल. म्हणजे जर आपले मन पूर्वग्रह सोडून देईल तर बर्‍याचश्या प्रतिमा आपोआप नाहीश्या होतील आणि पूर्वग्रह हे केवळ अन्य लोकांबद्दलच नसतात तर स्वतःबद्दल, समाजाबद्दल असे देखिल असतात एखाद्या प्रसंगाचे आकलन परीस्थितीचे आकलन व त्यावर आपण देत असलेला रिस्पॉन्स हा आपल्या मनाच्या जडणघडणीवत अवलंबून असतो. म्हणून कोणी उत्कृष्टपणे कोणताही प्रसंग निभावून नेतात तर कोणी रडत बसतात. हे सगळे आपल्या प्रतिमा ज्यांमुळे पूर्वग्रह तयार होतात व मूलभूत बघायचे झाले तर आपल्या मनाचे जे लहानपणापासून झालेले प्रोग्रॅमिंग यामुळे होते. हे प्रोग्रॅमिंग जर पुसून टाकता आले तर एक नवे आपण आपल्यालाच सापडतो नवा शोध लागतो व त्यामुळे जी शांती प्राप्त होते ती कशानेही ढळत नाही.
डॉ. : पण या श्रीराम सरांना तू कुठे भेटलास?
कपिल : मी म्हटले ना की ते या विषयावर व्याख्याने देतात. तर तसेच आमच्या कॉलेजमध्ये आले होते. मी ईंजिनीयरिंगच्या दुसर्‍या सेमिस्टरला होतो. त्यांनी विषय समजण्यासाठी मन पूर्वग्रहदूषित नसणे एकाग्रचित्त होऊन ऐकणे व समजणे याबद्दल सांगितले त्याने मी अत्यंत प्रभावित झालो. मी मग त्यांचा पत्ता मिळवून त्यांच्या कार्यालयात गेलो. आणि मग जातच राहिलो. मग केवळ विषयच नव्हे तर स्वतःल समजण्याची देखिल क्रिया सुरू झाली. आज ५ वर्षे झाली त्या गोष्टीला.
वेळ संपल्यामुळे कपिल बाहेर पडला. पुढची अ‍ॅपॉइंटमेंट दोन दिवसांनी ठरली.
डॉ. नी वहीत नोंद केली
Must see this Mr. Shri Raam. Kapil is no doubt a highly intelligent person. He has a sound reasonig behind his way of living. However it must be found whether this is only skin deep or is still deeper. I must think of a way to disturb him mentally which will bring out his emotional side. However I am becoming mors and more sure that he has no abnormality in him.

वेगळा - १०
दोन दिवस उलटले. कपिल डॉ. एकलहरे यांच्या स्वागतकक्षात बसला होता. डॉ. आतून सीसी टीव्हीवर त्याचे निरीक्षण करत होते. हा कपिल जे बोलतो ती पोपटपंची आहे का खरच त्याने हे जीवनात आणायचा प्रयत्न केला आहे? त्याला इंस्टिगेटिंग प्रश्न विचारले पाहिजेत. त्याला अवघड जातील आवडणार नाहीत असे प्रश्न वा विधान काय असेल? व्हॉट विल प्रोव्होक हिम? विचार करून डॉ. नी तीन मुद्दे लिहिले. एक एक करून हे मुद्दे टाकायचे व बारीक निरीक्षण करायचे. त्यांनी कपिलला आत बोलावले. कपिल आत येऊन बसला. त्याची शांत नजर डॉ.वर खिळली. डॉ. नी सुरुवातीलाच अवघड वाटणारा प्रश्न टाकला.
डॉ. : कपिल एक सांग तू आस्तिक आहेस का नास्तिक?
कपिल : मी दोन्ही प्रकारच्या प्रतिमांमध्ये अडकणार नाही. ( उतर देण्यापूर्वी कपिल अजिबात गडबडला नाही वा विचारात पडला नाही डॉ. नी नोंद केली. नो साईन ऑफ प्रोव्होकेशन ). आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत. आपण लहानपणापासून कोणाच्या संपर्कात आलो, कशा स्वरूपाचे वाचन केले आपल्यावर कोणाचा प्रभाव झाला त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. उदाहरणार्थ जर मी आस्तिक लोकांच्या संपर्कात असेन, तसे साहित्य आधीपासून वाचत असेन, माझ्या घरी तसे वातावरण असेल तर मी आस्तिक होण्याची ९९ टक्के शक्यता आहे. शिवाय यात आणखी एक फॅक्टर देखिल आहे. जर मी आस्तिक वा नास्तिक आहे पण माझ्या लक्षात आले की त्याच्या उलट जाण्यात माझा स्वार्थ आहे तर मी पूर्ण यू टर्न देखिल घेऊ शकतो. तसेच नास्तिक असण्याचे आहे. आणि वाईट गोष्ट म्हणजे या आस्तिकतेचा व नास्तिकतेचा अहंकार बळावतो. मग एकमेकांचे मुद्दे ऐकून न घेता टिंगल टवाळी व चिखलफेक सुरू होते. कोणतीही गोष्ट आपण तटस्थपणे पाहू शकत नाही. त्या चष्म्यातूनच पहातो. हे प्रोग्रॅमिंग पुसले तरच आपण तटस्थ होऊ शकतो.
डॉ. : तू हे सारखे प्रोग्रॅमिंग पुसण्याबद्दल बोलत आहेस; तुला नक्की काय म्हणायचे आहे?
कपिल : असे बघा आपण लहान असल्यापासून आपल्यावर प्रोग्रॅमिंग सुरू असते. तू मुलगा/मुलगी आहेस, हिंदू आहेस, मुसलमान आहेस, मराठी आहेस, तमीळ आहेस, या देशाचा आहेस त्या देशाचा आहेस इतकेच काय पण विज्ञान शाखेचा आहेस कला शाखेचा आहेस असे देखिल् प्रोग्रॅमिंग होत असते. मग आपल्या त्या भूमिका ठाम होतात. आपण त्या त्या चष्म्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे पहातो. उअदाहरणार्थ जर मी हिंदू असेन तर रामायण महाभारताकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा, मुसलमान असेन तर वेगळा, ख्रिस्ती असेन तर कुरआन कडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा व मुसलमान असेन तर वेगळा. कोणत्याही गोष्टीचे नीट आकलन होण्यासाठी त्रयस्थ दृष्टीने त्याच्याकडे पहाता आले पाहिजे. आपण जे काही पहातो, वाचतो ऐकतो ते आपापल्या दृष्टीकोनातून करतो. प्रत्येकाला आपले आकलनच सत्य वाटते. आपल्या माणसाची बाजूच सत्य वाटते. एखादे भांडण सुरू असेल तर प्रत्येकाला आपली बाजूच बरोबर वाटते. यात आईन्स्टाईन्च्या रिलेटिविटी सारखे आहे. तुम्हाला जे दिसते ते तुमच्या मनोभुमिकेवर अवलंबून आहे. मग अंतिम सत्य कोणते? एक साधे उदाहरण घ्या. ( कपिल ने टेबलावरचा पेपरवेट उचलला) हा पेपरवेट कोणत्या रंगाचा आहे?
डॉ. : ( न कळून ) हिरव्या
कपिल : बरोबर. पण समजा कोणा आपल्याला माहित नसलेल्या भागातून एखादा माणूस आला व त्यांच्या भागात याच रंगाला लाल म्हणत असतील तर तो लालच म्हणेल ना? मग कोणाचे खरे?
डॉ. : तू नक्की काय सांगू पहात आहेस?
कपिल : मला असे म्हणायचे आहे की रंग तोच आहे. म्हणजे ती वस्तू ज्या फ्रिक्वेन्सी शोषून घेते त्या आपल्याला दिसत नाहित व जी घेत नाही ती दिसते व तो रंग दिसतो. हे सत्य. पण त्याला आपण काय म्हणतो हे प्रोग्रॅमिंग.
डॉ. : बरे मग?
कपिल : असाच प्रकार सगळ्याच बाबतीत आहे. जोपर्यंत आपण पूर्वग्रहदूषित अश्या नजरेने पहाणे सोडत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य कळुच शकत नाही. व तेच साध्य करायचे आहे.
डॉ. : मग हे कसे करणार?
कपिल : आपल्या विचारांचे तटस्थ निरीक्षण करणे हाच एक मार्ग आहे. रोज ठराविक वेळी एका शांत जागी बसून केवळ मनात काय विचार येतात त्याचे निरीक्षण करत रहायचे. कोणतीही जोरजबरदस्ती करायची नाही केवळ तटस्थ निरीक्षण. मग मन कसे इकडे तिकडे कसे धावत रहाते ते कळून येते. एकच लक्षात ठेवायचे की आपण मनाबरोबर धावायचे नाही. केवळ तटस्थपणे पहात रहायचे. आधी अवघड जाते. आपले लक्ष रहात नाही. आपण नकळत मनाबरोबर धावायला लागतो. पण चिकाटीने स्वतःला परत जाग्यावर आणायचे. असे करता करता हळू हळू आपल्याला मनाच्या बाहेर येऊन निरीक्षण करायला जमू लागते. मग आपण खरे कसे आहोत आपली जडणघडण कशी आहे हे कळू लागते व मग ते पुसून टाकायला सुरुवात होते. बरेचसे टाकून द्यायचे असते. आपले विचार, ठाम समजुती गळून पडायला लागतात. एक नवी दृष्टी येते जी निर्दोष असते. आणि मग आपले मन शांत होऊ लागते. कारण मनाचे जोखड आपण झुगारलेले असते. आपण मनाच्या गुलामीत नसून मन आपल्या ताब्यात असते. एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो.
डॉ. : पण या सगळ्याचा उपयोग काय? दैनंदिन जीवनात याचा काय फायदा?
कपिल : केवळ दैनंदिन जीवनच जरी बघायचे झाले तरी यातून विषय नीट समजण्यास मदत होईल. एकाग्रता वाढेल तुमचे काम तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. पण यापुढे जायचे तर तुम्हाला स्वतःचा शोध लागतो व माझ्या मते ते खरे महत्त्वाचे आहे. तुम्हाला असे वाटत नाही का की सत्य काय ते कळावे? जे खरे सत्य असेल जागा बदलली की सत्य बदलले असे सत्य नसावे?
डॉ. : विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण या सगळ्याचा तुला स्त्री बद्दल वाटत नसलेल्या आकर्षणाचा काय संबंध? मला वाटते की तू नपुंसक आहेस. ( अल्टिमेट प्रोवोकेशन !)
कपिल : ( चेहर्‍यावर काहिही बदल नाही. डॉ. नी नोंदले डिड नॉट गेट प्रोव्होक्ड अ‍ॅट ऑल ) तसे नाही डॉक्टर. जर माझे लग्न झालेच तर मी वैवाहिक जीवन नीट जगू शकेन. पण लग्न केले की माणूस अडकून जातो. सगळ्या जबाबदार्‍या पार पाडता पाडता त्याला कशालाच वेळ रहात नाही. मग तो काय स्वतःचा शोध घेणार? ही फार मोठी किंमत आहे. जी मला परवडणारी नाही.
डॉ. : बरे तुझे हे श्रीराम सर मला कसे भेटतील? मोठा माणूस असावा. ते इथे येतील का? का मला तिथे जायला हवे?
कपिल : (हसून) जर मी त्यांच्याकडे प्रतिमांमध्ये न अडकणे शिकलो असेन तर ते तरी या लहान मोठ्याच्या प्रतिमांमध्ये कसे अडकतील? मी त्यांना विचारेन. वेळ असेल तर ते जरूर येतील. मी तुम्हाला तसे कळवेन.
कपिल बाहेर पडला. डॉ. बराच वेळ विचार करत बसून होते. मग त्यांनी स्वागतिकेला सांगितले " यापुढे कपिलच्या केसमध्ये फी घ्यायची नाही व नवीन केसेस घ्यायच्या नाहीत."
डॉ. नी वहीत नोंद केली.
kapil is completely normal. Meeting with Mr. ShriRaam is imminent.
अपूर्ण

वेगळा - ११
दोन दिवस उलटले. डॉ. एकलहरे आपल्या क्लिनिक मध्ये बसले होते. गेले काही दिवस कपिलच्या केसने त्यांना विचारमग्न केले होते. मनाच्या अत्यंत खोलवर जाऊन सूस्पष्ट असे चित्र कपिल मांडत होता. ते त्याची फाईल चाळत होते. तेवढ्यात स्वागतिकेने सांगितले "मि. श्रीराम यांच्याकडून निरोप घेऊन कोणी आले आहे. " डॉ. नी सांगितले " पाठव त्यांना " एक उंच सावळासा पस्तिशीतला तरूण आत आला. डॉ. नी बसायला सांगितल्यावर बसला. " मी सुखविंदर" तो म्हणाला. डॉ. नी त्याच्याकडे निरखून पाहिले. मध्यमवर्गीय दिसत होता. कपिल सारखा उच्चमध्यमवर्गीय नाही. साधेसेच पण नीट्नेटके कपडे. चेहर्‍यावर अंधूकसे हास्य. मग त्यांच्या लक्षात आले. डोळे अगदी कपिलसारखेच शांत आहेत. अगदी तसाच तो डॉ. च्या नजरेला नजर देऊन शांत बसला होता. "बोला" डॉ. म्हणाले. " मी श्रीरामसरांचा निरोप घेऊन आलो आहे. त्यांनी तुमचे आमंत्रण स्वीकारले आहे पण सध्या त्यांची व्याख्याने सुरू असल्याने ते पुढच्या आठवड्यात येऊन भेटतील हे सांगायला आलो आहे." मराठी चांगले बोलत असला तरी त्याच्या बोलण्यात उत्तरप्रदेशी लहजा होता.
डॉ. : तुम्ही श्रीरामसरांकडे कसे गेलात?
सुखविंदर : मी लहानपणापासून टवाळ प्रकारात मोडणारा होतो. अभ्यास कधीच सिरीयसली घेतला नाही. तेच काय कधी काहीच सिरीयसली घेतले नाही. जेमतेम पास होत होतो. एकदा गटांगळी खाऊन कसा तरी बी. कॉम झालो. मग नोकरीचा शोध सुरू झाला. पण माझे मार्क पाहून मला कोणी नोकरी देईना. कशी तरी एका अगदी लहान कंपनीत नोकरी लागली. पण पगार अगदीच अपूरा होता. माझा खर्च जाऊन घरी फक्त ५०० र. देऊ शकत होतो. माझ्या आईला नेहमीच तिच्या भावाच्या मुलांचे कौतूक होते. ती मुले अभ्यासात हुषार होती. चांगले मार्क मिळवून मामाची मुले बँकेत लागली. मग आईचा आणखीनच जळफळाट होत असे. मग ती नेहमी मला घालून पाडून बोलत असे. त्यांच्या पायाशी बस त्यांचे तीर्थ घे असे बोलत असे. मग मी दिवसेंदिवस खचायला लागलो. मग दारू व सिगारेट सुरू झाली. मग आणखी बोलणी. नैराश्याच्या गर्तेत असतांना एका मित्राने मला श्रीरामसरांकडे आणून सोडले.
डॉ. : ( उत्सुकतेने ) मग?
सुखविंदर : सरांनी आधी माझ्या पाठीवरून हात फिरवला. म्हणाले घाबरू नकोस. कोणतीही परीस्थिती अशक्य नसते. मला सांग काय झाले आहे ते. मग मी माझ्याबद्दल सगळे सांगितले. सरांनी मला विचारले दारू पिऊन सिगारेट ओढून तुला समाधान मिळते का? मीम्हटले समाधान नाही पण काही काळ सततचे शल्य टोचत नाही. मग सरांनी मला विचारले पण मुळात शल्य कुठून उत्पन्न होते याचा शोध तू घेतला आहेस का?
मग त्यांनी मला स्वतःचा शोध घ्यायला सांगितले. विचारांचे निरीक्षण करायला सांगितले. जसे जसे मी ते करायला लागलो तसे तसे माझे मन आपोआप शांत होत गेले. दारू सिगारेट बंद झाली. मनास एक प्रकारची स्थिरता आली मग ती माझ्या वागण्या-बोलण्यातही दिसू लागली. मी आधी नोकरी साठी इंटरव्ह्यूला जायचो तेव्हां मी नर्व्हस असायचो. नीट जमत नसे. साहजिकच माझी निवड होत नसे. आधीच शिक्षणात आनंद होताच. ( सुखविंदर हसला) मग सरांनी मला विचारले की तुला काय अडचण येते? मी म्हटले की मी अनकंफर्टेबल होतो. सरांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. जो इतरांशी अनकंफर्टेबल असतो तो आधी स्वतःशी अनकंफर्टेबल असतो. मग आधी त्याचे कारण स्वतःमध्ये शोध. मी मग मागोवा घेऊ लागलो. तेव्हां मला आढळले की माझ्यात असुरक्षिततेची भावना आहे. ही नोकरी मला मिळायला हवी ही भावना इतकी तीव्र होत असे की मग शंकांना सुरुवात होई. नोकरी नाही मिळाली तर काय होईल? या कल्पनेने माझा थरकाप होई व आत्मविश्वास रहात नसे. मग काही प्रश्नांची उत्तरे येत असून त्यावेळि मला आठवत नसत. मग सरांच्या सल्ल्याने मी मला असुरक्षित का वाटते याचा शोध घेतला. तेव्हां असे लक्षात आले की आपण कुठेतरी कमी पडतोय आपल्याला कधीच यश मिळणार नाही अशी भावना माझ्या मनात आहे.
डॉ. : (स्तिमितपणे) उत्कृष्ट विश्लेषण ! पण मग यावर काय उपाय केला व त्या न्यूनगंडाचे कारण काय सापडले?
सुखविंदर : ( शांतपणे) मग हे सारे मी सरांना सांगितले. म्हटले की आईला माझे कधीच कौतूक नव्हते. त्या सततच्या तूलनेने मी खचत गेलो. मग आईला जे हवे ते नाहीच करायचे अश्या भावनेने मी अभ्यासात लक्षच दिले नाही. पण आज ते माझ्यावरच उलटले आहे. प्रेमहीन आईमुळे माझे जीवनच उध्वस्त झाले आहे.
डॉ. : ( अति उत्सुक) पुढे ?
सुखविंदर : सरांनी मला सांगितले की तुझी आई प्रेमहीन नाही. तुझी आई देखिल तुझ्यासारखीच अनकंफर्टेबल होती. तिला व्यक्त होता येत नव्हते. तिला तू तिच्या भावाच्या मुलांच्या वरचढ व्हावे असे तिला वाटत होते पण ते कसे सांगावे हे न कळल्याने तिने तुला चेतवायचा प्रयत्न केला. पण त्याचा पारीणाम उलट होतोय हे तिला कळले नाही. तुझ्या आईचे तुझ्यावर प्रेम होते पण काही लोकांना प्रेम व्यक्त करता येत नाही. ते स्वतःशी कंफर्टेबल नसतात. जसा तू नाहीस. त्या दिवशी मी ढसाढसा रडलो. सर माझ्या पाठीवर हात फिरवत बसून होते. मग म्हणाले जा आईला भ्टून ये. तिला सांग की मी आता तुझ्या इच्छे प्रमाणे होण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आशीर्वाद दे.
मी घरी गेलो. एका नव्या उमेदीने. मला पाहिल्यावर आईने तोंड फिरवले. पण आता मला कळले होते. मी तिच्याकडे गेलो आणि म्हटले आई इकडे बघ. मला आता कळले आहे की मी तुझ्या अपेक्षांना कधीच पूर्ण करू शकलो नाही. पण आई मी प्रयत्न करीन. मला आशीर्वाद देशील ना? आई थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिली. मग ती हमसाहमशी रडू लागली. म्हणाली हो रे माझ्या सोन्या. मी कायम तुझ्या पाठीशीच आहे रे. मग तिने मला जवळ घेतले. आम्ही दोघेही खूप रडलो. थोड्या वेळाने मी निघालो तेव्हां मन स्वच्छ झाले होते. पुढे मी नोकरीसाठी प्रयत्न करू लागलो. इंटरव्ह्यू दिले. आणि माझ्या लक्षात आले की मी हळूहळू चांगल्या प्रकारे सामोरा जात आहे. लवकरच मला नोकरी लागली. आता पगार चांगला आहे. व्यसने सुटली आहेत. जीवन शांत आहे. मन शांत आहे कसलीही खळबळ नाही.
सुखविंदर निरोप घेऊन निघून गेला.
डॉ. सुन्न पणे बसून राहिले. श्रीरामसरांनी हे प्रकरण जबरदस्त हाताळले होते हे त्यांनी मनातल्यामनात कबूल केले. हे श्रीरामसर एखादे अत्यंत बुद्धीमान असे सायकिअ‍ॅट्रिस्ट तर नसतील? मनाच्या विविध घडामोडींचा किती अभ्यास दिसत आहे त्यांचा ! असो वाट पहायला हवी.
अपूर्ण
वेगळा - १३
आज श्रीराम सर येणार आहेत. डॉ. आज जरा लवकरच क्लिनिकमध्ये पोचले. कपिलची फाईल चाळली. कपिलची व सुखविंदरच्या संभाषणांची रेकॉर्डिंग्ज ऐकली. आठवणीने सुखविंदरचे संभाषण रेकॉर्ड केले याचा त्यांना आनंद झाला. तेवढ्यात स्वागतिकेने कळवले "वन मि. श्रीराम हॅस अराईव्ड सर. ही हॅज अ‍ॅन अपॉइंटमेंट फॉर टुडे." डॉ. नी त्यांना बसवायला सांगितले. ते सीसी टीव्हीवरून त्यांचे निरीक्षण करू लागले. एक अगदी सामान्य बुटका व काळा माणूस पाहून त्यांची निराशा झाली. पांढरा शुभ्र पायजमा व झब्बा त्याने घातला होता. त्यात त्याचा काळेपण अधिकच उठून दिसत होता. चेहर्‍यावरून तो कोणत्या प्रांतातला असावा हे कळत नव्हते. तेवढ्यात त्यांना कपिलचे म्हणणे आठवले " आपण आधीच लोकांबद्दल प्रतिमा बनवून घेतो व त्या पूर्वग्रहाने त्यांच्याकडे बघतो व त्यांचे म्हणणे ऐकतो" डॉ. ना हसू आले. किती खरे आहे. आपणही हेच करत होतो. मग त्यांनी स्वागतिकेला श्रीरामसरांना आत पाठवायला सांगितले.
श्रीरामसर आत येऊन बसले. त्यांची शांत नजर डॉ. च्या नजरेला भिडली. मग डॉ. च्या लक्षात आले की या माणसाचे सगळे व्यक्तिमत्व, त्याची सर्व शक्ती त्याच्या डोळ्यांमध्ये एकवटली आहे.
काळेभोर. अथांग काय म्हणावे या डोळ्यांना? तेवढ्यात डाँ. ना आपण त्या शांत डोळ्यांमध्ये सामावून जात आहोत अशी एक अस्वस्थ करणारी भावना होऊ लागली. त्यांनी जोरात डोके हलवून तो विचार व ती भावना झटकली. मग श्रीरामसरांना विचारले "काय घेणार?" श्रीरामसर हसले म्हणाले "चहा चालेल". डॉ. नी स्वागतीकेला चहा सांगायला सांगितले. मग परत श्रीरामसरांकडे वळून विचारले "तुम्हाला सर का म्हणतात?" "मी पूर्वी शाळेत शिकवायचो" श्रीरामसर म्हणाले "तेव्हांपासून सर ही पदवी चिकटली आहे. " तेवढ्यात चहा आला. मग चहापान शांततेत पार पडले. डॉ. शब्दांची जुळवाजुळव करत होते. या अगोदर त्यांना कधी असे करावे लागले नव्हते.
मग डाँनी विषयाला हात घातला.
डॉ. : तुमचा एक विद्यार्थी कपिल याची केस माझ्याकडे आली आहे. मला तो तसा नॉर्मल वाटला पण तो लग्न करायला तयार नाही असे दिसते. असे तुम्ही सुचवले आहे का?
श्रीराम सर : (हसून) छे छे. मी तसे का सुचवेन? पण समजा लग्न नाही केले तर काय मोठे बिघडेल?
डॉ. : सगळेच लग्न करून सेटल होतात ना? लग्न झाले म्हणजे आयुष्य स्थिरावते. नाही का?
श्रीरामसर : म्हणजे लग्न करण्याचा निकष सगळे करतात म्हणून करायचे हा आहे का? पण असेच सगळीकडे घडत आहे. आपण सगळ्या गोष्टी सगळे करतात म्हणूनच करत असतो. हे असेच का करायचे? असा विचारही मनात येत नाही. आपले सर्व निर्णय आपल्या आयुष्याचे निर्णय इतकेच काय तर आपल्या मुलांच्या आयुष्याचे निर्णय देखिल आपण इतरांकडे पाहून घेत असतो. आणि कोणी या चौकटीचे बाहेर जात असेल तर त्याला आपण अ‍ॅबनॉर्मलचे लेबल लावून मोकळे होतो. खरे तर लग्न हा कामशांतीचा अधिकृत मार्ग पूर्वजांनी आखून दिला आहे. अत्यंत बुद्धीमान लोकांची इच्छाशक्ती त्यामागे आहे. समाजस्वास्थ्यासाठी लग्न आवश्यकच आहे. पण ते रहाटगाडगे होता कामा नये व कोणी त्यात अडकायचे नाकारत असेल तर त्याच्या निर्णयाचा सन्मान आपण केला पाहिजे. राहिली बाब स्थिरता येण्याची. तर खरेच असे तुम्हाला वाटते का? रुळलेल्या वाटेने जाणे या अर्थाने स्थिर म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. पण लग्ना नंतर येणार्‍या अनेक जबाबदार्‍यांचे काय? कोणाला वाटू शकते ना की त्याने जीव घुसमटून जातो असे? लग्नानंतर स्वतःला वेळ किती स्त्री-पुरुष देऊ शकतात? आठवा तुम्ही महिन्यातून एकदा तरी शांत बसून केवळ स्वतःकडे बघितले आहे का? ही फार मोठी किंमत माणूस देतो पण ते त्याच्या लक्षातही येत नाही हे दुर्दैव आहे.
डॉ. : एकूण तुम्ही लग्नाला विरोध करत आहात.
श्रीरामसर : (हसून) घाईने निष्कर्ष काढू नका. मी आधीच म्हटले की समाजस्वास्थ्याला लग्न आवश्यक आहे. माझे म्हणणे इतकेच की कोणाला जर रूढ चौकटीच्या बाहेर जायचे असेल तर त्याला त्याचे स्वातंत्र्य आपण नाकारू नये. केवळ सगळे करतात हे कारण आपल्या निर्णयांमागे  असू नये. याने आपण तर सुखी होत नाहीच शिवाय आपल्याशी संबंधित अश्या लोकांचे आयुष्य देखिल आपण दु:खी करत असतो.
डॉ. : मग काय करायचे? आयुष्य फुकट घालवायचे?
श्रीरामसर : (शांतपणे) हे त्याचे आयुष्य आहे. त्याने ते कसे घालवायचे हा त्याचा निर्णय आहे. शिवाय ते फुकट जाते आहे का अधिक संपन्न होत आहे हा देखिल त्याचा निर्णय आहे असे नाही तुम्हाला वाटत?
डॉ. : पण हे स्वतःचा शोध घेणे वगैरे तुम्हीच शिकवत आहात ना?
श्रीरामसर : शाळेत शिक्षक आपल्याला अक्षरओळख करून देत असतात त्यावेळी त्यांना माहित असते का की पुढे जाऊन आपण काय करणार आहोत ते? ते केवळ अक्षरओळख करून देत असतात. तसेच माझे आहे. मी केवळ त्याला मनाचा शोध घ्यायला सांगितले. तसे तर मी हजारो लोकांना सांगतो. पण त्यातले काहीच खरोखर शोध घेतात व त्यातूनही काहीच लोक गंभीरपणे त्याचा पाठपुरावा करतात. कपिलसारखा तर विरळाच आहे जो स्वतःच्या शोधाच्या अगदी जवळ येऊन पोचला आहे. मी त्याच्या जीवनात कुठलीही ढवळाढवळ करत नाही व करणार नाही याबद्दल निश्चिंत असा.
डॉ. : तुम्हाला नक्की म्हणायचे आहे तरी काय?
श्रीरामसर : असे पहा की माणूस जन्माला येतो, मोठा होतो, आपले अन्न मिळवतो पुनरुत्पादन करतो व मरून जातो. मग यात तो प्राण्यांपेक्षा वेगळे असे काय करतो? प्रत्येक प्राणी हेच करतो. शिवाय प्रत्येक प्राणी अन्न सहज कसे मिळेल ते पहातो. माणूस म्हणून आपण काय वेगळे करतो? आपल्याला श्रेष्ठ बुद्धीमत्ता मिळाली आहे अश्या आप्ण फुशारक्या मारतो पण तसे आपण वागतो का? प्राण्यांप्रमाणेच कलह करतो, एकमेकांपेक्षा आपण कसे वरचढ हे दाखवायचा प्रयत्न करतो चांगल्यात चांगली नोकरी वा काम मिळवायचा प्रय्त्न करतो उपलब्ध जोडीदारांमधील सगळ्यात चांगला जोडीदार मिळवायचा प्रयत्न करतो. मग यात वेगळे काय? तुम्हाला असे नाही का वाटत की काहीतरी फरक असायला हवा?
डॉ. : (विचारात पडून ) बरे मग?
श्रीरामसर : म्हणूनच आपण स्वतःचा शोध घ्यायला हवा. आपण खरे कसे आहोत आपली मनोरचना कशी आहे हे पहायला हवे.
डॉ. : म्हणजे तुम्ही ते साधू लोकांसारखे ज्ञानप्राप्ती मोक्ष वगैरे गोष्टी करायला सांगत आहात का?
श्रीरामसर : ( मोठ्याने हसून ) बघा पुन्हा एकदा तुम्ही एक प्रतिमा बनवली. तुमच्या आधीच्या वाचलेल्या, तुम्हाला माहित असलेल्या अथवा ऐकलेल्या गोष्टीची माझ्या बोलण्याची तूलना केलीत आणि निष्कर्ष काढायची घाई केलीत. मी कोणत्याही रूढ प्रतिमेत न अडकता केवळ स्वतःचा शोध घ्यायला सांगत आहे. पण अगदी तुम्ही साधूंबद्दल विचारताय तर सांगतो की ब्रह्मज्ञान म्हणजे नक्की काय प्राप्त करायचे हे कोणाला सांगता आले आहे का? हे अफाट विश्व जितके अफाट तितकेच सूक्ष्म. म्हणजे जितका ज्ञात विस्तार आहे त्यामध्ये आपल्या आकाशगंगेसारखी आणखी कितीतरी अक्षरशः अब्जावधी तारकाविश्वे आहेत. आपल्याच आकाशगंगेत २०० अब्ज तारे आहेत. आपल्या सूर्यापेक्षा लहान व मोठे देखिल सूर्यापेक्षा दशलक्षपटींनी तेजस्वी असा पिस्टल स्टार नावाचा तारा देखिल आहे तर दशलक्ष पटींनी मंद असा ब्राऊन ड्वार्फ तारा देखिल आहे. सेकंदाला २९८००० किमी जाणार्‍या प्रकाशाला देखिल जिथून आपल्याकडे यायला अब्जावधी वर्षे लागतात तितके लांब बघितले तरी तिथे क्वार्क नावाच्या काही वस्तू आहेत ज्यांच्याबद्दल नीट माहिती मिळू शकलेली नाही. तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन इतका सूक्ष्म आहे की तो सध्या नक्की कुठे आहे हे सांगता येत नाही केवळ प्रोबॅबिलिटी थिअरम मांडता येते. अश्या या विश्वाचे ज्ञान म्हणजे ब्र्ह्मज्ञान; का या विश्वाचे कार्यकारण म्हणजे ब्रह्मज्ञान? पण हे ज्ञान मिळवता येत असेल तरी त्याला आपली तयारी नको का? जो स्वतःलाच ओळखत नाही तो विश्व काय ओळखणार?
डॉ. : म्हणजे तुम्ही ईश्वर मानत नाही का?
श्रीरामसर : माझ्या मानण्याने तो असणार नाही व न मानण्याने तो नसणार नाही. पण त्याचे जसे स्वरूप आपण मानतो त्यावरून तो या विश्वाचा निर्माता अथवा नियंता आहे. तर मग तो असलाच तर त्याला आकलन करून घेण्याची आपली तयारी हीच आहे की आधी स्वतःचे आकलन करून घेणे. ते आकलन करून घेण्याचा मार्ग हाच आहे की आपल्या विचारांचा मागोवा घेणे व आपण खरे कसे आहोत ते निरीक्षण करणे. मग आपल्याला आपले विचार कसे सुरू होतात व विचाराला धरून विचार कसे येत रहातात ते कळते. मन जात्याच अशांत असते. त्यात आपण आपल्या व बाहेरच्या अनेक गोष्टींचे प्रदूषण केलेले असते. ते दूर करून निर्मळ अशी आपली रचना आपण बघू शकतो.
डॉ. बराच वेळ शांत बसले होते. मग श्रीरामसर म्हणाले "बराच वेळ झाला आहे. मलाही पुढे काही कामे आहेत. तर आता मी निघतो. परत येईन दोन दिवसांनी.
श्रीरामसर बाहेर पडले.
डॉ. तसेच बसून राहिले. हे प्रकरण त्यांचेच कितीतरी विचार धारणांना हादरवून टाकत होते. "पण नीट समजून घेतले पाहिजे" त्यांनी स्वतःशी ठरवले.
अपूर्ण
वेगळा - १३
श्रीरामसर भेटून गेले. त्यांचे विचार अर्थातच प्रभावित करणारे होते. विचारप्रवृत्त करणारे होते. डॉ. एकलहरेंनी कपिलच्या आईवडीलांना बोलावून घेतले. आईवडील वाट पहातच होते. ते अधीरतेने आले. समोर बसून मोठ्या अपेक्षेने डॉ. कडे पाहू लागले.
डॉ. : मी तुम्हाला यासाठी बोलावले आहे की मी कपिलचे मानसिक परीक्षण करायचा प्रयत्न केला आहे. होय मी प्रयत्न हाच शब्द वापरला आहे कारण त्याची विचार करायची पद्धत मला तरी इतकी तर्कशुद्ध व स्वच्छ वाटली की मी त्याने ज्यांच्याकडून ही पद्धत शिकली आहे त्यांची देखिल मी भेट घेतली. मला हे सांगायला आनंद वाटतो की कपिल मध्ये कोणतीही मेंटल डिसऑर्डर नसून उलट तो मनाच्या एका उत्तुंग अश्या अवस्थेत आहे. त्याने मानसिक शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात तो बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे असे मला वाटते. मी तुम्हाला नॉर्मल असा रिपोर्ट देत आहे.
डॉ. एकलहरे यांनी रिपोर्ट दिला. आता पुढे? आई व वडील परत डोक्याला हात लावून बसले. मग काही निश्चय करून दोघे श्रीरामसरांच्या कार्यालयात गेले. श्रीरामसर व्यासपीठावर उभे होते. समोर ३०-३५ जणांचा श्रोतृसमुदाय होता. प्रश्नोत्तरे चालली होती. कपिलचे आईवडील एका बाजूला बसू ऐकू लागले
एक श्रोता : यशस्वी व शांत समाधानी आयुष्य जगण्याचा सोपा मार्ग कोणता?
श्रीरामसर : यशस्वी व शांत समाधानी या वेगळ्या गोष्टी आहेत. आधी यशस्वी म्हणजे काय ते पाहू. प्रत्येकाचे यशाचे मापदंड वेग्वेगळे आहेत. पण आपण असे म्हणू या की उत्तम शिक्षण, चांगला व्यवसाय अथवा नोकरी, चांगला जोडीदार मुलेबाळे त्यांची शिक्षणे व उतारवयासाठी गाठीला पैसा हे सर्वसाधारनपणे आजचे यशाचे मापदंड म्हणता येतील. अर्थात मानवी इच्छा आकांक्षांना अंत नसल्याने कितीही मिळाले तरी ते माणसाला पुरेसे वाटत नाही त्यामुळे तो नेहमीच असमाधानी रहातो हा भाग वेगळा. तर असे यशस्वी होण्यासाठी काय करावे?
तर आधी आपल्या यशाच्या संकल्पना ठरवाव्या. मग स्वतःचा अभ्यास करावा. यातील कुठल्या कल्पना खरोखरच आपल्या आहेत? आपण त्या कशावरून निश्चित केल्या आहेत? आपल्याला नक्की काय हवे आहे? ते का हवे आहे? दुसर्‍याकडे आहे म्हणुन तर मला हवे आहे असे मी म्हणत नाहीये ना? असे विश्लेषण करा. बर्‍याच कल्पना गळून पडतात. दुर्दैवाने आज जरी आपल्याला हे पटले तरी बदल करण्याच्या स्थितीत बहुतेक लोक नसतील. त्यामुळे आता जी परीस्थिती आहे तिचे नीट अवलोकन करा. स्वतःचे निरीक्षण करा. यश का येत नाही हा प्रश्न स्वतःला विचारा. बहुधा एकच उत्तर येईल की आपले प्रय्त्न योग्य नव्हते. मग त्याचे कारण शोधा. मग उत्तर येईल की समस्येचे आकलन नीट करून घेण्यात आपण कमी पडतो. जर समस्येला अंगावर घेतले  तर समस्या सोडवण्यास मार्ग मिळेल पण आपण काय करतो की समस्या जणू नाहीच आहे असे वागतो. डोळेझाक करायचा प्रयत्न करतो. आपोआप मार्ग निघेल अशी आशा करतो. मग व्हायचे तेच होते तुमचे प्रय्त्न हाफ हार्टेड रहातात. आणि अपयश येते. त्यामुळे उत्तर तुमच्यापाशीच आहे. निरीक्षण करा. स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवा.
आता शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे याकडे वळू. आज शांती व समाधानाच्या शोधात सगळेच आहेत. सगळीकडे असणारी जीवघेणी स्पर्धा त्यामुळे
 सगळे सारखे धावत असतात. गरजा कधीही पूर्ण होत नाहीत व आपले धावणे थांबत नाही. शिवाय एकमेकांकडून आपण करत असलेल्या अतिरिक्त अपेक्षा. पहा ; तुमच्या तुमच्या जोडीदाराकडून, मुलांकडून किती अपेक्षा असतात? त्यांनी कसे वागावे हे देखिल तुम्हीच ठरवलेले असते. आणि मग तसे कोणी वागले नाही की तुम्हाला धक्का बसतो. राग येतो व मग दु:ख होते. मीच काय तो त्याग तडजोड  करतो/करते व बाकी सगळे मजा करतात असे वाटू लागते. थोडक्यात काय तर असमाधान होते. मनाचा तोल ढळतो. पण आपण नेमका याचाच अभ्यास करत नाही की समाधान मिळण्यासाठी आधी असमाधानाची कारणे दूर केली पाहिजेत. आपल्या अनेक इच्छा आकांक्षा, सतत दुसर्‍यांबरोबर तूलना, उगाच मुखवटे घालून वावरणे व इतरांकडून असलेल्या अतिरिक्त अपेक्षा ही ती असमाधानाची कारणे आहेत. मग? सोपे आहे ही कारणे दूर करा म्हणजे समाधान प्राप्त होईल.
मग काय करायचे? कोणताही बाबा, बुवा यासाठी लागत नाही. समाधान तुमच्यातच दडलेले आहे ते शोधून काढायचे आहे. मनाचे विचारांचे तटस्थ निरीक्षण करा हाच तो मार्ग.
नीट निरीक्षण करत राहिलात तर अश्या निष्कर्षाप्रत माणुस येतो की " मी व माझे "  या भावनेचा हा सारा गोंधळ आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी माणसांबद्दल देखिल स्वामित्वाची भावना आपण बाळगत असतो. वस्तुतः प्रत्येकजण निराळा आहे पण आपण त्याला आपल्या साच्यात बसवायला बघत असतो. मग तसे झाले नाही की दु:खी होतो. स्वतः दु:खी होतोच व इतरांना दु:खी करतो. आपणच स्वतः भोवती हे सगळे पडदे घालून बसतो व मग स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत नाही अशी तक्रार करत बसतो. पडदे फेकून द्या बरे मग पहा कसा आनंद प्राप्त होतो ते?
श्रोता -२ : मी रोज १००० जप करतो. त्याने मला शांती मिळणार नाही का?
श्रीराम सर : असे पहा हे जप नामस्मरण वगैरे प्रकार हे मनाची एकाग्रता वाढवण्याचेच प्रकार आहेत. प्रत्येकालाच काही काळ मनाच्या कोलाहलापासून दूर जाण्याची गरज असते. मग प्रत्येकजण आपापले मार्ग शोधतो. खेळ, वाचन, संगीत, विविध छंद हे मनाला अन्य विषयाकडे लावून कोलाहल विसरायला लावण्याचे प्रकार आहेत तर जप नामस्मरण हे प्रकार मनाला एक विषयाकडे केंद्रित करून कोलाहलापासून दूर करतात. पण मुख्य मुद्दा हा आहे की आपण जप करतो म्हणजे नक्की काय करतो? आपले मन हजार गोष्टींचा विचार करत असते व आपण यांत्रिकपणे जप करत असतो. याला जप म्हणत नाहीत तर केवळ माळ ओढणे असे फार तर म्हणता येईल. तीच गोष्ट नामस्मरणाची. जर ते नीट जमत असेल तर मनाला एक प्रकारची सवय लागते एकाग्र होण्याची त्यामुळे काही काळ तरी मन शांत रहाते. पण या अवस्थेतून पुढे जावेच लागते. म्हणूनच थेट मनाचेच निरीक्षण करणे हा कमी वेळेचा मार्ग आहे. अर्थात ज्यांना निरीक्षण जमत नाही त्यांनी हे मार्ग करून बघायला हरकत नाही पण त्यात लक्ष असले पाहिजे.
श्रोता -३ : म्हणजे भक्तीतून काही साध्य होणार नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
श्रीराम सर : मला तसे काहीही म्हणायचे नाही. मला सांगा भक्ती म्हणजे नक्की काय हे तरी स्पष्ट आहे का तुमच्या मनात? भक्ती म्हणजे पराकोटीचे प्रेम. दुसरे काही सुचता कामा नये. अशी भक्ती करता का तुम्ही? ज्याला अशी भक्ती जमली त्याला भक्ती सोडून दुसरे काही नकोच असते. मग हा प्रश्न विचारायला देखिल तुम्ही आला नसता. आपली भक्तीची कल्पना अत्यंत उथळ असते. सतत   ध्यास लागला पाहिजे जळीस्थळीकाष्टीपाषाणी दुसरे काही दिसले नाही पाहिजे. मग ती खरी भक्ती. पहा विचार करून.
बराच वेळ कोणाचा काही प्रश्न आला नाही. मग श्रीराम सरांनी निरोपादाखल हात जोडले. हळूहळू सगळे निघून गेले. पण कपिलचे आई व वडील तसेच बसू होते. त्यांची हृदये व्याकूळ झाली होती. हा समोरचा माणूस जरी काही मौलिक सांगत होता तरी कपिलच्या काळजीने त्यांना काही सुचत नव्हते.
श्रीराम सर त्यांच्याजवळ आले. " काही बोलायचे आहे का? " वडीलांनी सांगितले "आम्ही कपिलसाठी आलो आहोत." श्रीराम सरांनी मग ओळख करून घेतली. त्यांना आत नेऊन बसवले. पाणी दिले. आणि म्हणाले "बोला काय बोलायचे आहे? "
आई : आमच्या कपिलचे तुम्ही काय करायचे ठरवले आहे?
श्रीराम सर ( गंभीरपणे) : असे बघा आई मी ठरवणारा कोण? त्याचे आयुष्याचे त्यानेच ठरवायचे आहे. त्यानेच निर्णय घ्यायचे आहेत.
आई : पण तुम्हीच त्याला भरवून दिलेत ना? आमचाच मुलगा मिळाला का तुम्हाला?
श्रीराम सर : आई तुम्ही रागावला आहात व समजून घेत नाही आहात. मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवतो. स्वतःचा शोध घ्यायला सांगतो पण फार थोडे  लोक  प्रत्यक्ष प्रयत्न  करतात. मी काही कोणावर जबरदस्ती करत नाही.
आई (चिडून) : काही बोलू नका. तुमच्यामुळेच कपिल असा बहकल्यासारखा वागत आहे. ( रडू लागते)
इथे वडीलांनी आईला थांबवले.
वडील : सर क्षमा करा कपिलच्या दु:खाने व काळजीने ती वेडीपिशी झाली आहे. माझि ही अवस्था फार वेगळी नाही. पण मला सांगा की आता कपिलचे भवितव्य काय?
श्रीराम सर (मृदू स्वरात) : बाबा मी कधीही कपिलच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही निर्णय लादत नाही. पण तुमच्या एक लक्षात आले असेल की कपिल एकुणच फार वेगळा आहे. तो सर्वसामान्य नाही. बघा ना तुमच्या दुसर्‍या मुलाने देखिल माझे व्याख्यान ऐकले आहेच की पण त्याने कुठे ते गंभीरपणे घेतले? तर मला म्हणायचे हे की कपिल हा नियतीने वेगळाच घडवला आहे. साहजिकच त्याच्या आयुष्याची वाटचाल देखिल नियतीने वेगळ्या मार्गाने ठरवली आहे. एका फार उत्तुंग अश्या ध्येयाकडे त्याची वाटचाल सुरू आहे.
वडील : पण असा लग्न न करता एकटा रहाण्याने तो पुढे फ्रस्ट्रेट झाला वाईट मार्गाला लागला तर?
श्रीराम सर : बाबा कपिलला कधीही लग्न करावेसे वाटले ना तर तो करावयास मोकळा आहे. मी मध्ये येणार नाही बरे. निश्चिंत असा. पण असे कधीच समजू नका की लग्न न करण्यामुळे तो काही चुकीचा वागेल अथवा वाईट मार्गाला लागेल. जो स्वत:चे इतके छान विश्लेषण करू शकतो तो बहकू शकतो असे तुम्हाला वाटते का?
आई वडील घरी परत आले. आता जे घडते ते बघत बसणे आले.
वडील म्हणाले  " आपणही जात जाऊ या श्रीराम सरांकडे बघू मन शांत करता आले तर"
मग नेहमीप्रमाणे रुटीन चालू झाले. कपिल आता अधिक काळ मेडिटेशन करू लागला होता.
पुढील भागात समाप्त

वेगळा - १४
कपिलचे आई वडील मग आठवड्यातून ३-४ वेळा श्रीरामसरांच्या कार्यालयात जाऊ लागले. सर सांगतील तसे मनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू लागले. श्रीरामसर कधी भेटायचे तर कधी ते बाहेर गेलेले असायचे. मग ते नसले की आलेल्या इतर लोकांशी गप्पा होत असत. ते सगळे सामान्य संसारी लोक होते. प्रत्येकाच्या काही ना काही समस्या होत्या. कोणाला आर्थिक समस्या होत्या तर कोणाला मुलांच्या. सगळ्यांनाच श्रीरामसरांकडून काही अपेक्षा होत्या. श्रीरामसर काहीतरी ग्रेट आहेत ह्या बाबतीत मात्र सगळ्यांचे एकमत होते. हळूहळू सगळ्यांना कपिलची माहिती झाली. सगळे मग त्याच्या आई वडीलांशी आदराने वागू लागले. यांनी कितीही सांगितले की आम्ही तुमच्यासारखेच सामान्य आहोत तरी त्यात काही फरक पडेना. मग या दोघांनी नाद सोडून दिला. एक मात्र नक्की की हळूहळू त्यांच्या मनाची व्याकूळता कमी होत होती.
निरीक्षणानंतर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. श्रीरामसर नेहमीच आनंदात असायचे. कधीही थकलेले, व्यग्र, उदास रागावलेले असे दिसले नाहीत. बरेचदा लोक अगदी फालतू प्रश्न विचारायचे. पण ते नहमीच इतक्या आस्थेने ऐकून घ्यायचे की जणू ते त्या व्यक्तीला अगदी जवळचे आहेत व त्यांना त्या व्यक्तीच्या सुखदु:खात खरीखुरी आस्था आहे. मग ते काही उपाय सांगायचे. धीर द्यायचे. त्या व्यक्तीचे समाधान व्हायचे. अगदी त्वचारोगावर देखिल औषधे सांगायचे. एकदा वडीलांनी विचारलेच
वडील : तुम्ही लोकांना समस्यांवर उपाय सांगता त्यात कितपत तथ्य आहे?
श्रीरामसर : तुम्ही नीट ऐकले असेल तर मी नेहमीच समस्यांवर स्वतः उपाय शोधायला उद्युक्त करतो. कुठे अडकले असतील तर मार्गदर्शन करतो. इतकी वर्षे नाना प्रकारचे मानवी स्वभाव मी जवळून पाहिले आहेत. त्यामुळे बरेचदा लोक कुठे येऊन अडकतात याचा अंदाज मला आहे. मी फक्त ते त्यांना दाखवून देतो इतकेच.
वडील : नाही. पण तुम्ही त्या बाईंच्या मुलाला खरूज झाली आहे त्यावर झेंडूच्या पाल्याचा रस लावायला सांगितले त्याचे काय?
श्रीरामसर : पण त्या आधी मी डॉक्टर कडे ने असे सांगितले ना? व मग घरगुती उपाय म्हणून ते सांगितले. तो उपाय खराच आहे.
वडील : पण तुम्ही त्यांना सगळे ठीक होईल असे सांगता ते खरेच असते का?
श्रीरामसर : असे पहा की त्यावेळी त्यांना धीर देणे हेच महत्त्वाचे असते. त्याने त्यांचे मन शांत होऊन ते विचार करण्याच्या मनस्थितीत येतात. मग त्यांना योग्य मार्गदर्शन केले की झाले.
चर्चेमधून अशी श्रीरामसरांबद्दल माहिती मिळत होती. श्रीरामसर अनेक भाषा अस्खलित बोलतात. श्रीमंत वा गरीब कोणाकडेही तितक्याच आनंदाने आत्मीयतेने रहातात. गरीबाची कांदा भाकरी देखिल आनंदाने खातात. एक ना अनेक अश्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. त्या सगळ्याच खर्‍या आहेत की नाही हे कळायला मार्ग नव्हता. पण एकंदर श्रीरामसर हे अनोखे व्यक्तिमत्त्व आहे असे दिसत होते.
एकदा एका श्रोत्याने श्रीरामसरांना विचारले
श्रोता : तुम्ही सारखे स्वतःचा शोध घ्या म्हणत असता. तो लागला म्हणजे  नक्की काय होते?
सगळ्यांनाच त्यावर श्रीरामसरांचे म्हणणे ऐकायची उत्सुकता दिसली.
श्रीरामसर : जेव्हां आपण एखादे उत्तम संगीत ऐकतो तेव्हां काय होते? जेव्हां एखादी उत्तम कलाकृती बघतो जेव्हां निसर्गसौन्दर्य बघतो तेव्हां नक्की काय होते? हे सांगता येईल का? व्यक्तीगणिक हा अनुभव वेगवेगळा असतो. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. उत्कृष्ट गाण्याचे वर्णन ऐकून भागत नाही ते गाणेच ऐकावे लागते. कारण अनुभव शब्दात मांडता येत नाही आणि मांडायचा प्रयत्न केला तरी तो थिटा पडतो. पण इतके सांगू शकतो की जसेजसे आपण स्वतःचा शोध घेत अंतरंगात शिरतो तसे तसे मन सूक्ष्म होत जाते. शेवटी एका बिंदू पाशी येऊन थांबते. याच्या पलिकडे जाणे कठीण असते पण ते जर जमले तर मग आपले मन हे आधी समाजमन व मग विश्वमनाशी जोडले जाते. मग तुम्हाला एकच भावना जाणवते ती म्हनजे सर्व प्राणीमात्राबद्दल निरपेक्ष प्रेम. हे प्रेम सर्व विश्व भरून राहिलेले आहे. ते सगळ्यांना कळते. सगळ्या प्राण्यांना कळते. ही अवस्था प्राप्त झाली की एक प्रकारचा अतीव आनंद प्राप्त होतो. अर्थात याही पुढे जावे लागते. पण ते मांडणे शक्य होणार नाही म्हणुन इथेच थांबवतो.

दिवस गेले. महिने गेले. कपिल आता अधिकाधिक मेडिटेशन करत होता. शनिवार व रविवारि तर ५-६ तास तो बसलेला असे. तो जरासा वेगळा दिसू लागला होता. काय फरक आहे ते कोणी नक्की सांगू शकत नव्हते पण फरक आहे असे लोक म्हणत होते व आई वडील व विशुलाही तसेच वाटत होते. कपिलचा प्रोजेक्ट संपत आला. कपिलच्या कामाची कंपनीने प्रशंसा केली. त्याला बढती मिळाली. कपिलने सांगितलेच नाही पण त्याच्या कलीग्सचे अभिनंदनाचे फोन येऊ लागले तसे घरच्यांना कळले व अन्य लोकांनाही कळले. सगळे एके दिवशी संध्याकाळी घरी आले. अभिनंदन करून पार्टीची मागणी करू लागले. मग कपिलच्या आईने पुढाकार घेऊन सगळी व्य्वस्था केली आणि दिवस ठरवला. पार्टी झाली. गौरी पण आली होती. ती लांबूनच कपिल कडे निरखून पहात होती. कपिल निराळा दिसत होता हे तिच्याही लक्षात आले. ती विचार करू लागली. मग तिच्या लक्षात आले. कपिल जरी सगळ्यांमध्ये वावरत असला; सस्मितपणे अभिनंदन स्वीकारत असला तरी तो कुठेतरी लांब असल्यासारखा दिसत आहे. जणू व्हिडिओ कॉन्फरंसिंग करून तो इकडे भाग घेत आहे. कपिलबाबतची तिची आशा संपुष्टात येत होती. कपिल आणखिनच लांब गेला होता. दूर कुठेतरी.
कपिलचा प्रोजेक्ट संपला. दोनच महिन्यांनी त्याने राजीनामा दिला. कंपनीचे व्यवस्थापन चकित झाले. त्यांनी त्याला कारण विचारले. आणखी वाढ देऊ केली. पण ते सगळे नम्रपणे नाकारत कपिलने त्याला काही काळ एकांत हवा आहे असे सांगितले. पुन्हा जर नोकरी कराविशी वाटली तर संपर्क करण्याचे आश्वासन दिले.
आता कपिल मोकळा होता. आता रोज ६-७ तास मेडिटेशन सुरू झाले. किंचित बारीक झाला तो. पण तरी तो उत्साही वाटत होता. आनंदी वाटत होता. त्याचे डोळे अंतर्मुख दिसू लागले.
मग एके दिवशी श्रीरामसर कपिलच्या घरी आले. आईवडिलांना भेटले. त्यांनी कल्पना दिली की आता कपिलला दूर जावे लागेल. अश्या ठिकाणी जिथे पूर्ण एकांत असेल. काही महिने कदाचित वर्षभरही. आई वडीलांचा ठोका चुकला. पण त्यांनी मनाची तयारी केली. कपिलच्या निघण्याचा दिवस आला. त्याला निरोप द्यायला खूप लोक आले होते. शंकर नाग होता, गौरी होती. अन्य मित्रमंडळी होती. आईवडील व विशु तर होतेच. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. कपिलने सगळ्यांचा निरोप घेतला. आई वडिलांच्या पाया पडला. आई रडत होती. तिच्या खांद्यावर थोपटून कपिल श्रीरामसरांना भेटायला गेला. श्रीरामसर एका बाजूला उभे होते. त्यांनी कपिलला थोपटले. मग म्हणाले एक लक्षात ठेव तुला स्वतःचा खून करायचा आहे. त्यांनी दिलेला पत्ता खिशात ठेवून कपिल गाडीत चढला. श्रीरामसरांच्या बोलण्याचा अर्थ काय असेल बरे? तो विचार करत राहिला. मग तो विचार झटकून तो डोळे मिटून बसून राहिला.
कपिलने पोचल्यावर चौकशी केली. ते एक लहानसे गाव होते. इन मिन ५० घरे. ते लोक श्रीरामसरांना ओळखत होते. गावचा मुखिया त्याला आपल्या घरी घेऊन गेला. "कल आपके ठिकानेपर ले जायेंगे बेटा" तो म्हणाला " तबतक यहां रहो अपनाही घर समझो" कपिलने आभार मानायला सुरुवात करताच त्याला थांबवत म्हणाला " श्रीरामसर का हुकम सर आंखोंपर" "आओ हाथ मुंह धोकर खाना खाओ" मग कपिलने मक्याची रोटी व, कसली भाजी त्याला कळले नाही, खाल्ली. थोड्या वेळाने ताक आले. ते पिऊन कपिल झोपला. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. "किती प्रसन्न वाटत आहे" तो मनाशी म्हणाला. असा किलबिलाट शहरात ऐकायला येतच नाही.
मुखिया बरोबर न्याहरी करून कपिल तयार झाला. तयारी काहीच नव्हती. रोजचे कपडे पाणी प्यायचे पेला व तांब्या. एक विजेरी. बस इतकेच सामान. बाकी आईने बळेबळे दिलेले फराळाचे सामान त्याने मुखियाच्या मुलांना देऊन टाकले. मग दोघे बाहेर पडले. गावाबाहेर पडल्यावर थोड्याच वेळात चढण लागली. टेकडीवर एक झोपडी होती. मुखिया कपिलला घेऊन तिकडे गेला. तिथे १६-१७ चा एक मुलगा होता. त्याला तिकडच्या भाषेत काहीतरी बोलला. लगेच मुलाने हात जोडले. मग कपिलकडे वळून त्याला हाताला धरून आत नेले. झोपडी चांगली प्रशस्त होती. दोन खोल्या होत्या. दोन्ही खोल्यांना वेगवेगळी दारे होती. मुखियाने कपिलला सांगितले की एका खोलीत कपिल व दुसर्‍या खोलीत तो मुलगा रहातील. तो मुलगा, हरिया त्याचे नाव, कपिलकडे लक्ष ठेवेल व त्याला काय हवे नको ते बघेल. एरवी इकडे कोणी येणार नाही असे आश्वासन मुखियाने दिले. संध्याकाळ झाली होती. कपिलने मुखियाने आणलेली रोटी व भाजी हरियासोबत खाऊन घेतली. मुखिया निरोप घेऊन निघून गेला. कपिलने मग तिकडल्या खाटेवर अंग टाकून दिले. थकला होताच. लगेच झोप लागली.
पहाटे जाग आली. कपिल झोपडीबाहेर आला. हरिया आधीच उठला होता. तो कपिलला मागच्या बाजूला झर्‍यावर घेऊन गेला. तिकडे आवरायला सांगून तो निघून गेला. स्वत:चे आवरून कपिल परत येतो तर तांब्याभर दूध तयार होते. ते दूध कपिलने तोंडाला लावले. त्याला आश्चर्य वाटले. दूध इतके चांगले लागते हे तो पहिल्यांदाच अनुभवत होता. मग त्याने इकडे तिकडे पाहिले. खोलीच्या मधोमध एक चटई अंथरली होती. त्याच्यावर मऊ अशी लोकरीची दुलई अंथरली होती. बाजूला पाण्याचे भांडे होते. मग थोड्या वेळाने कपिल पाणी पिऊन त्या आसनावर मांडी घालून बसला. डोळे मिटले. ज्ञानमुद्रा केली. श्रीरामसरांनी शिकवल्याप्रमाणे १०० पासून आकडे उलटे मोजू लागला. लवकरच अर्धजागृतावस्था प्राप्त झाली. मग तो मनातील विचारांचे निरीक्षण करू लागला. आधी वेगवेगळे विचार येत राहिले. मग हळू हळू मन शांत होऊ लागले. हळू हळू कपिल खोल खोल जाऊ लागला. एका निरव शांत अश्या अवस्थेत शिरला.
दुसरा दिवस उजाडला. हरिया डोकावून गेला. कपिल अजूनही तसाच बसला होता. हरियाला हे परिचयाचे होते. त्याने अलगद दार लावून घेतले. दिवस गेले. महिना होत आला. कपिलची दाढी वाढली. बराच बारीक झाला. हरिया लक्ष ठेवून होता. मुखियादेखिल अधूनमधून विचारपूस करत होता. कौतुकाने ऐकत होता. एकदा बघूनही आला. कपिलविषयीच्या आदराने त्याचे मन भरून गेले.
मिट्ट काळोख होता. कपिल एका डोंगरावर चढत होता. वाट कठीण होती. चालतांना कष्ट होत होते. चढता चढता एका ठिकाणी वेगवेगळे रस्ते फुटलेले दिसले. शिवाय पायवाटदेखिल अगदी सहज सोपी दिसत होती. कपिल वळणार तोच त्याला गंभीर आवाजात हाक ऐकू आली. त्याने वरती पाहिले. श्रीरामसर उंचावर उभे होते. तिकडे जाऊ नकोस कपिल; हरवशील. परतीचा मार्ग मग नाही. सरळ वरती चढत रहा. कपिल त्यांना पाहून परत उत्साहाने चढू लागला. पण श्रीरामसर आता दिसत नव्हते. बरीच चढण चढल्यावर त्याला एका बाजूला प्रकाश दिसला. एक माणूस त्याला तिकडे बोलावत होता. त्याच्या हातात खाद्यपदार्थ व पाणी होते. कपिलने विचार केला. जरा वेळ तिकडे विश्रांती घेऊ. पण परत त्याला गंभीर आवाजातली हाक ऐकू आली. कपिल थांबू नको. त्या मोहात पडू नकोस. एकदा थांबलास की कायमचा थांबशील. कपिलने पाऊल वळवलेले परत घेतले. पुन्हा चढू लागला. असे अजून काही वेळा घडले पण श्रीरामसरांनी ना त्याला थांबू दिले ना कुठे वळू दिले. तो अगदी माथ्याजवळ आला. तिथे श्रीरामसर उभे होते. अत्यंत प्रसन्न नजरेने ते कपिलकडे पहात होते. "शाबास कपिल" ते म्हणाले " बराच पल्ला गाठलास तू. आता मात्र तुला एकट्याला पुढे जावे लागेल. शेवटची काही पाउले प्रत्येकजण एकटाच चालतो" त्यांनी माथ्याकडे बोट दाखवले " जा माझ्या शुभेच्छा आहेत" कपिलने वरती पाहिले. श्रीरामसर परत म्हणाले "लक्षात ठेव तुला स्वतःचा खून करायचा आहे" कपिल काही विचारणार तर त्यांनी वरती बोट दाखवले.
कपिल चढू लागला. आता डोंगरमाथा काही पावलांवरच राहिला. अचानक त्याला तो स्वतःच त्याचा मार्ग रोखून उभा असलेला दिसला. " पुढे जाऊ नकोस. तुझे अस्तित्वच संपून जाईल. मग या सगळ्याचा काय उपयोग? पुढे काहीच नाही. भयंकर कडा आहे. जाऊ नकोस थांब. आधी स्वतःला वाचव." कपिल बावचळला. विचारात पडला. परत समोरचा कपिल म्हणाला " तू टिकलास तर पुढे सारे करशील हे लक्षात ठेव" अचानक कपिलला श्रीरामसरांचे सांगणे आठवले. " लक्षात ठेव तुला स्वतःचा खून करायचा आहे". कपिलने मनाचा हिय्या केला आणि त्याला ढकलून दिले. तो कोसळला खोल खोल गेला. मग कपिलने निश्चयाने पुढे पाऊल टाकले. तो माथ्यावर चढून आला. समोर सूर्य उगवत होता...... शोध संपला होता.
हरियाने सकाळी डोकावून पाहिले. कपिलची चर्या आनंदाने ओसंडत होती. अजून डोळे उघडले नव्हते. पण हरिया समजला होता. त्याने गावाकडे धाव घेतली.
...
...
...
...
...
...
कपिलला एकांतवासात  जाऊन दोन महिने झाले होते. त्याचे आईवडील नियमितपणे श्रीरामसरांकडे जात होते.
आणि एके दिवशी डॉ. एकलहरे श्रीरामसरांच्या कार्यालयात शिरतांना दिसले.
आणखी एक प्रवासी स्वतःच्या शोधात निघाला होता.

समाप्त




ऐसे तो न देखो


नयना गेस्ट हाऊसच्या पायर्‍या चढत होती. तिचे लक्ष वरती गेले. तिथेच खिडकीत तो उभा होता. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. तिने नजर चुकवली. परत बघते तर अजूनही तो तिच्याचकडे बघत होता. देखणा; भव्य कपाळावर विखुरलेले बेफिकीर केस त्याला शोभत होते.
नयना लाजली. घाईघाईने तिने पायर्‍या चढून वळून पाहिले तेव्हां. तो तिथे नव्ह्ता मान उडवून ती पुढे निघाली. आपल्या रूममध्ये आली. तिची रूमपार्टनर आधीच तिची वाट बघत येऊन बसली होती.
"किती उशीर ग नयना; चल ना जेवायला जाऊ. भूक लागली आहे." नयना म्हणाली "आले गं मंदे. जरा वॉश घेऊन येते." नयना वॉश घेऊन आली. दोघी गेस्टहाऊसच्या डायनिंग हॉलमध्ये शिरल्या. रिकामे टेबल शोधता शोधता तिची नजर थबकली. एका टेबलवर तो होता. तिच्याचकडे बघत होता. टक लावून. बरोबर आणखी कोणीतरी होते.
मग नयनाने दुसर्‍या कोपर्‍यात जागा मिळवली. तरी अधून मधून तिचे लक्ष त्याच्याकडे जात होते. पण आता त्याचे लक्ष जेवणात होते. "क्या देख रही हो नयना?" मंदाने विचारले. नयनाने तिला तो तरूण दाखवला "तो मुलगा आहे ना? मगापासून माझ्याकडे बघत आहे. मी गेस्टहाऊसम्ध्ये शिरत होते तेव्हांपासून." "आय हाय" मंदा खट्याळ हसून म्हणाली. "गया कामसे बेचारा." "गप ग" मंदा ही हसून म्हणाली "काहीही बडबडत असतेस." मंदाने विचारले "पण खरं सांग मस्त आहे ना? हॅन्डसम आहे एकदम" नयनाने होकारार्थी मान हलवली "हो तसा चांगला आहे...." मंदाने परत चिडवले "हम्म्म्म्म म्हणजे आवडलाय तर...... "
"गप म्हटलं ना!!! " नयना म्हणाली तेवढ्यात जेवण आले आणि दोघी जेवण्यात मग्न झाल्या. मध्येच कधीतरी तो उठून गेला असावा. जेवणे झाली आणि दोघी रूम मध्ये आल्या. त्यांचा सगळा ग्रूपच तिथे आला होता. १५ जणी होत्या. सगळ्या गेस्टहाऊसमध्येच उतरल्या होत्या. गेस्टहाऊसवाला खूश होता. त्याचे गेस्टहाऊस कधी फुल नसायचे पण या सिझनला फूल झाले होते. एकदम पंधरा जणी आल्यामुळे त्याच्या आठ रूम बुक झाल्या होत्या. सगळ्या दिवसभर भटकत व दुपारच्या जेवायला येत. परत भटकायला निघत ते थेट संध्याकाळी परत येत असत. मंदाने त्या मुलाचा किस्सा सगळ्या मुलींना एव्हाना सांगून टाकला होता.
मुलींनी नयनाला चिडवून हैराण केले होते. अर्थात तिला गुदगुल्याही होत होत्याच. रोजच ती पायर्‍या चढतांना तो खिडकीत असे. कधी तो तिच्याकडेच बघत असे तर कधी त्याचे लक्ष नसे. पण तो आपल्यासाठीच तिथे उभा असतो याची तिला खात्री झाली होती.
सुट्टी संपत येत होती तशी नयनाला अस्वस्थ वाटत होते. मग एकदा ती व मंदा गेस्टहाऊसच्या लॉनवर जाऊन बसल्या. तिथे तो मुलांबरोबर होता. एका बाकावर तो बसला होता. मित्र मात्र इकडेतिकडे
नाचत होते मस्ती करत होते. हा इतका शांत कसा? तिला प्रश्न पडला. तितक्यात एकाने त्याला हलवत म्हटले "विश्वास गाणं म्हण ना" आणि त्याच्या हातात गिटार दिली. विश्वासने अचानक तिच्याकडे पाहिले. मग तसाच बघत राहिला.
त्याने गिटारवरून हात फिरवला आणि सुरू केले "ऐसे तो ना देखो ..... के हमको नशा हो जाये खूबसूरतसी कोई हमसे खता हो जाये.... ऐसे तो ना देखो."
अधून मधून तो तिच्याचकडे रोखून पहात होता. मंदादेखिल तिला कोपराने ढोसत होती त्याने पाहिल्यावर. त्याचा आवाज छानच होता. गाणे संपले आणि त्या दोघी निघाल्या.
ही सगळी कथा मैत्रिणींमध्ये पसरली. सगळ्यांनी त्याला पाहिले होतेच. त्या नयनाला चिडवू लागल्या. एक मैत्रीण म्हणाली "पण नयना कशावरून तो तुलाच उद्देशून म्हणत आहे?" नयना म्हणाली "अरे अधूनमधून माझ्याकडे रोखून बघत होता ना. ते काय उगाच?" ती मैत्रीण म्हणाली "अग नयना कदाचित त्याचे असेच लक्ष जात असेल. तू उगाच काहीतरी अंदाज काढत असशील." मंदा म्हणाली "अगं नयनाकडे कोणीही पुरुष बघणारच ना? अपनी नयना तो है ही हिरोईन. अशी सुंदर मुलगी काय मुलांच्या नजरेला पडल्या शिवाय राहील का?" मैत्रिणिने हेका सोडला नाही."मला तरी वाटतं की कदाचित हा सगळा गैरसमज असेल." नयना म्हणाली "अगं पण आपला स्त्रियांचा सिक्स्थ सेन्सही असतोच ना? पुरुषांची नजर आपल्याला लगेच कळते" मग ती मैत्रीण गप्प बसली. तिला पटले असावे.
दोन दिवस गेले. तो अधून मधून दिसत होता. तिच्याकडे बघत असला की टक लावून बघत असे. पण एकदाही त्याने ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. हे थोडं विचित्र होतं नयनाला वाटलं. पण कदाचित या ओळखीचा उपयोग काय असे त्याला वाटत असावे. पण नयनाला मात्र त्याने काहीतरी पुढाकार घ्यावा असे वाटत होते. पण तसे घडले नाही. निघायचा दिवस आला.
सामान गाड्यांमध्ये भरले. सगळ्या निघाल्या. नयनाचे डोळे त्याला शोधत होते. तिथेच थोड्या अंतरावर तो उभा होता. तिच्याचकडे टक लावून बघत होता. नयनाने इकडे तिकडे पाहून हळूच त्याला बाय केले. पण त्याचा काही प्रतिसाद दिसला नाही. तेवढ्यात त्याचा मित्र येऊन त्याला काहीतरी म्हणाला. तो हसला. मग गळ्यातल्या बॅगेत त्याने हात घातला
नयना बघत राहिली. तिच्या मैत्रिणीदेखिल अविश्वासाने पहात राहिल्या. त्याने बॅगेतून फोल्डिंग पांढरी काठी काढली व मित्रा मागोमाग चालू लागला होता. दूर दूर जात होता.