Saturday, December 31, 2016

घुसमट

घुसमट - १
"What a stud yaar what a hunk आयला शमा तेरा नही जमा ना तो मुझे बता. मै मेरा प्रपोजल भेजुंगी." रोमिला म्हणाली. रेशमा पण म्हणाली "शमे कसला भारी आहे गं. काय ते बायसेप्स, काय ते खांदे आयला माझ्यासाठी सोड ना याला. अरे याच्या बरोबर वन नाईट स्टँड जरी मिळाला तरी त्यासाठी मी काही पण द्यायला तयार आहे." कल्पना तर उघडच म्हणाली "शमा आम्हाला तर जलन होत आहे. हा असा मुलगा तुला प्रपोजल पाठवतो? तुला?" शर्मिष्ठाला देखिल आश्चर्य वाटलं होतच. शर्मिष्ठावर निसर्गाने पहिल्यापासून अन्याय केला होता. मळकट सावळा रंग; धड गोरा नाही धड काळा नाही. सावळा; पण तो देखिल निस्तेज. बसकं नाक, बुटकी केवळ पाच फूट उंची आणि या सगळ्यात भर म्हणजे पोट थोडं मोठंच. तिची आई तर तिला 'ढबर्‍या पोटाची' म्हणायची. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत देखण्या लोकांच्या घरात तिचा जन्म झाला होता. हे सगळं कमीच होतं म्हणून की काय पुरुषांबद्दल अनिवार आकर्षण हा एक मोठाच त्रास होता. एक तर पुरुष तिच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. तिचे मित्र देखिल त्या नजरेने अजिबात बघत नव्हते. ज्या स्त्रीकडे पुरुष मुळीच बघत नाहीत तिचे दु:ख तिलाच ठाऊक.
तिचा जन्म झाला आणि नर्स तिला कपड्यात बांधून घेऊन आली तेव्हां तिला बघून तिची आई किंचाळली होती "ई....ई.....ई हे माझं मूल नाही. तुमच्या हातून बदललं गेलय. माझं मूल मला आणून द्या." आईने अगदी थयथयाट केला होता. तो ऐकून बाहेर बसलेले बाबा व आजी आत आले होते. त्यांना देखिल शर्मिष्ठाकडे बघून नवल वाटलं होतं. शर्मिष्ठाची आई गोरी पान होती. बाबादेखिल चांगले गोरे होते. मुख्य म्हणजे आई अगदी रूपवती होती. अजूनही ती बाहेर पडली की पुरुषांच्या नजरा तिच्याकडे वळत. शर्मिष्ठाचा मोठा भाऊ विक्रम आणि दोन मोठ्या बहिणी देखिल अतिशय सुंदर होत्या. आईने त्यांची नावे साजेशी म्हणजे उर्वशी आणि मेनका ठेवली होती. आणि आता ही? तिच्या बाबांनी तिला हातात घेतलं होतं आणि तिच्याकडे बघत होते. तेव्हां इतका वेळ शांत असलेल्या शर्मिष्ठाने आपलं बोळकं पसरून ती हसली. हसल्यावर तिचे डोळे लुकलुकले. बाबांना तिच्याबद्दल माया दाटून आली. डॉक्टरांनी देखिल सांगितलं होतच की त्या वेळी दुसर्‍या कोणत्याही स्त्रीची डिलीव्हरी झाली नव्हती. त्यामुळे मुलांची अदला बदली होणं शक्यच नव्हतं. शेवटी दोन दिवसांनी सगळे घरी आले होते. आई तर तिला जवळ देखिल घेत नव्हती. पाजायला देखिल तयार नव्हती. पण आजी दरडावून म्हणत होती " वासंती; अगदी अदला बदल झाली आहे असे म्हटले तरी त्यात त्या निष्पाप जिवाचा काय दोष? पाज बघू तिला. पाप लागेल तुला असं निष्पाप बाळाला उपाशी ठेवलस तर" आई चडफडत तिला पाजत असे. बाबांनी देखिल समजावयाचा प्रयत्न केला होता "वासंती अगं तुझ्या किंवा माझ्या पूर्वजांपैकी कोणी असे असू शकेल ना? कोणतेही गुण अचानक वर येऊ शकतात. अशी नको वागूस गं तिच्याशी. निरागस मूल आहे ते." पण आई मानायला तयार नव्हती.
आईच काय तिच्या बहिणीदेखिल तिला हातही लावायला तयार नसत. जणू हे कळत असल्यासारखी शर्मिष्ठा बाबा आणि विक्रमदादाकडे झेप घ्यायची. त्यांच्याबरोबर ती आनंदाने रहायची. अर्थात आजी होती. आजीचं देखिल तिच्यावर प्रेम होतं.
अश्या वातावरणात शर्मिष्ठा मोठी होत होती. ती खायला लागल्यावर देखिल आई तिला जेवायला देत नसे. आजीला लक्ष ठेवायला लागत असे. बाबा बरेच वेळा बाहेर असत. त्यांची फिरतीची नोकरी होती. आजी मात्र काही पदार्थ केला की शर्मिष्ठाला खायला मिळालय की नाही हे पहात असे. आधी तिच्या हाती खाऊ देत असे. शर्मिष्ठाला कळले होते की खाण्यापिण्याचे नखरे आपल्याला परवडणार नाहीत. पानात पडेल ते ती आनंदाने खात असे. त्यावरूनही आई चिडत असे. "खादाड मेली. गिळा; मिळेल ते गिळा" ती बडबडत असे. आजीची जरब नसती तर तिने शर्मिष्ठाला उपाशीच ठेवलं असतं. शर्मिष्ठा पण अशी की अशी वागणूक मिळूनही कधी आजारी पडत नव्हती. उत्साही होती. तिचे हसू तिच्या डोळ्यात पोचत असे. त्यामुळे ती हसली की समोरच्यालाही प्रसन्न वाटे. हा एकच भाग तिच्या जमेकडे होता. हां आणखी एक होता. ती अत्यंत बुद्धीमान होती. शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नव्हता तिने. आईला धुसफुस करायला आणखी एक निमित्त होतं ते. कारण बहिणी यथातथा होत्या अभ्यासात. जेमतेम पास होत होत्या.
मोठी होऊ लागली तसा आणखी एक गुण तिच्या लक्षात आला. लोक तिचं बोलणं ऐकत रहात असत. तिला आपला मुद्द पटवून द्यायला फारसे सायास पडत नव्हते. दिवस जात होते. शर्मिष्ठा दहा वर्षांची झाली आणि तिच्यावर एक आघात झाला. थोड्याश्या आजाराचं निमित्त होऊन तिची आजी गेली होती. आजीने जातांना विक्रमला सांगितले होते "विक्रम बाळा माझे दिवस भरत आले. शमा कडे लक्ष दे. तुला माहीत आहेच तुझी आई आणि बहिणी तिच्याशी कश्या वागतात ते. तिला खायला देखिल देत नाही तुझी आई. आता तूच लक्ष दे बाबा" विक्रमने आजीचं बोलणं मनावर घेतलं होतं. जेवायला बसला, न्याहारीला बसला की शर्मिष्ठाला घेऊनच बसायचा. आपल्या पानातली चपाती शर्मिष्ठाच्या पानात वाढायचा. आईला नाश्त्याच्या दोन डिश द्यायला लावायचा. त्याशिवाय तो खायचाच नाही. बाबा आले की बाबापण लक्ष देत असत. बाबा आईला चांगलेच ओळखून होते. आईला फारसे बोलू शकत नसले तरी शर्मिष्ठाला काही कमी पडणार नाही हे ते पहात असत.
शर्मिष्ठा आता आठवीत गेली होती. तिच्या लक्षात आलं होतं की तिला मुलांबद्दल खूप आकर्षण वाटतं. पण मुलं जशी अन्य मुलींशी छेडछाड करत असत तशी तिच्याशी अजिबात करत नसत. अर्थात तिला मित्र भरपूर होते. पण ते तिच्या बोलण्यातल्या चातूर्यामुळे व हुशारी मुळे होते. तिच्या नोट्स सगळ्यांना हव्या असायच्या. तिचं हसणं सगळ्यांना आवडायचं. वक्तृत्वस्पर्धा ती गाजवत असे. तिला आता आपल्या रूपाच्या वैगुण्याची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली होती. शिवाय तिचं मोठं पोट. तिने सगळे प्रयत्न केले होते. सूर्यनमस्कार, योगासने, इतर व्यायाम पण कशाचाही काही उपयोग झाला नव्हता. तिच्या पोटामुळे तिचं वयात येणं कोणाला जाणवतच नव्हतं. तिच्या बहिणी मात्र अतिशय सुंदर दिसत होत्या. मेनका अकरावीला होती तर उर्वशी एफ्.वाय्. बीकॉम ला होती. त्यांना स्वतःच्या सौंदर्याची जाणिवच नव्हे तर गर्व होता. मेक अप कसा करावा. मुलांना घायाळ कसं करावं हे त्यांना उपजतच कळत होतं. चालतांना शरीराला कसे हेलकावे द्यावेत म्हणजे पुरुषांची नजर खिळून राहील हे त्यांना कोणी शिकवावं लागलं नव्हतं. तिचा विक्रमदादा देखिल एम्.कॉमला होता. अत्यंत देखणा दिसत होता. मुली त्याच्या मागे लागत होत्या. तिची आई त्याच्यासाठी सुंदर मुली आतापासून हेरून ठेवत होती. आणि अश्या या भावंडांमध्ये शर्मिष्ठा अडकली होती. "काय पण घर सापडलय मला जन्म घ्यायला" ती स्वतःशी हसून बोलली होती. पण ती हसत होती. तिला माहीत होतं हसणं हाच आपला प्लस पॉईंट आहे.
अपूर्ण

घुसमट - २
अमर शाळेत पहिला आला होता. अमरेन्द्र पहिल्यापासून हुशार. जरा नाजुक चणीचा पण दिसायला तरतरीत आणि देखणा. उत्साही आणि बडबड्या. शाळेत तो हुशार मुलांमध्ये गणला जात असे. साहजिकच दहावीच्या परीक्षेच्या वेळेस शाळेने त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं होतं. अमरनेही चांगला अभ्यास केला होता. शाळेतच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात पहिला येऊन त्याने शाळेची मान उंचावली होती. कोणी विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये येण्याची शाळेची ही पहिलीच वेळ होती. सगळे शिक्षक; मुख्याध्यापक अमरवर खुश होते. अमरच्या पपांचा; श्रीपादराव प्रधानांचा; फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. घरात सुबत्ता होती. चार पाच मोठ्या कंपन्यांचे सतत काम होते. त्यामुळे कामाची आणि आर्थिक काही चिंता नव्हती. फोर बी.एच.के फ्लॅट होता विलेपार्ल्याला. दोन गाड्या होत्या. पपा भायंदरला जात कामाला. तिथे त्यांचा मोठा गाळा होता. ते जुन्या काळचे मेकॅनिकल इंजिनीयर होते. काही काळ नोकरी करून त्यांनी स्वतःची लेथ टाकली होती. सुरुवातीला काम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. पण चांगलं काम व योग्य दाम आणि वेळेवर डिलिव्हरी या जोरावर त्यांनी जम बसवला होता. पुढे काही मोठ्या कंपन्यांचं काम मिळवून त्यांनी ते करून दिलं. त्यांच काम बघून त्यांना नियमित काम मिळायला लागलं होतं. पुढे लग्न झालं आणि तीन मुलं झाली होती. दोन मुली आणि एक मुलगा.
धाकटा म्हणून अमर सगळ्यांचा लाडका होता. दोन तायांचा देखिल. अधून मधून भांडणे व्हायची पण अमर अतिशय सौम्य स्वभावाचा होता. फारच समजूतदार. त्याची आई म्हणायची सुद्धा "अरे अमर इतकं साधं राहून चालत नाही रे आताच्या जगात. कसं कळायचं तुला?" मीनाक्षी आणि नीलाक्षी दोघी अमरवर दादागिरी करायच्या. त्या देखिल तश्या हुशार होत्या. साठ ते सत्तर टक्क्यांच्या दरम्यान असायच्या. पुढे दोघी सायन्सला गेल्या. पपांचा सायन्सला जाण्याचा आग्रह असायचा. पपा आणि मम्मी देखिल सायन्सवाले होते. पपा इंजिनीयर आणि मम्मी बी.एस्.सी. आता मीनाक्षी आणि नीलाक्षी देखिल बी.एस्.सी करायच्या तयारीत होत्या. मीनाक्षी टी.वाय्.बी.एस्.सी ला गेली होती तर नीलाक्षी एफ.वाय ला. दोघी बहिणी बर्‍या दिसत होत्या. घरात पैसा होता. मुली दिसायला चारचौघींसारख्या होत्या. करीयर बिरियर बाबत फारश्या गंभीर नव्हत्या. त्यामुळे मीनाक्षीचं ग्रॅजुएट झाल्यावर लग्नाचं बघायचं असा विचार घरात सुरू होता. मीनाक्षीला देखिल पुढे शिकावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे ती लग्नाला तयार होती. "ए काय गं मम्मी" असं म्हणायची पण विरोध करत नव्हती.
अमर लहानपणापासूनच तसा नाजुक. पण अतिशय उत्साही. कोणत्याही कामाला तयार. आईला तोच मदत करायचा. दोघी बहिणी मात्र आईला अजिबात दाद देत नसत. पण अमरला उत्साह होता. कोणी आलं की ट्रे मध्ये पाणी नेऊन दे. आईने खाद्यपदार्थ तयार केले की ते डिश मध्ये भरून सगळ्यांना दे; अशी कामं तो न सांगता करायचा. शाळेत हुशार तो होताच. पण एकच प्रॉब्लेम होता. मनाने फार हळवा व साधा होता. कोणीही त्याला फसवत असे. जरा कोणाला काही झालं की याच्या डोळ्यात पाणी आलच. ताया तर सारख्याच छळायच्या त्याला. मग रडारड. आईला त्याची चिंता होती. कसं व्हायचं या पोराचं असं तिला नेहमी वाटे. आता तो कॉलेज मध्ये जाणार होता. काय करेल? कसा जमवून घेईल? इतर मुलांमध्ये हा निभावून जाईल का? एक ना अनेक चिंता आईला वाटत होत्या. अमरने देखिल सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली. त्याच्या मार्कांमुळे त्याला लगेच अ‍ॅडमिशन मिळाली होती. अर्थात पपांनी डोनेशन दिलं असतं गरज पडली असती तर. कॉलेज सुरू झालं होतं.
दोन महिन्यांनी अमर घरी लवकर आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. काही तरी बिनसलय हे आईने ताडले. पण काही न बोलता तिने त्याला पाणी पाजलं आणि सरबत दिलं. मग जरा वेळ जाऊ दिल्यावर हळूच विचारलं "काय झालं रे अमर?" अमरच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. "मम्मी आज ना लॅब मध्ये डायसेक्शन होतं" आईने विचारलं "बरं मग?" अमर आता आणखी रडू लागला "पण मम्मी तो बेडूक त्याला किती दुखत असेल ना? तो जिवंत होता गं. टीचरनी दाखवलं तेव्हां त्याचं हृदय हालचाल करत होतं आणि फुफ्फुसं पण हालचाल करत होती. पण टीचर सरळ कापत होत्या गं. मला बघवलं नाही. आता पुढच्या वेळेस आम्हाला कापायचं आहे. मी नाही कापणार." आईला कळेना या हळव्या पोराला कसं समजवायचं ते. शेवटी पप्पांनी त्याला जवळ घेतलं. "हे बघ बेटा अरे तू एक बेडूक कापतोस ना त्यामुळे अनेक प्राण्यांचा आणि माणसांचा जीव वाचतो बरं का. तुम्ही त्याचा अभ्यास करता. त्यामुळे आतील अवयव; त्यांचे कार्य याची माहिती होते. मग काही रोग झाल्यास कुठे आणि काय उपचार करायचे ते कळतं. हे जनावरांचे डॉक्टर असतात ते प्राण्यांवरच उपचार करतात ना?" हळूहळू अमर शांत झाला. त्याला पटलं. पण तो कापायला तयार नव्हताच. शेवटी पप्पा कॉलेजमध्ये गेले. शिक्षकांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. शिक्षकांनाही नवल वाटलं. पण अमर हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे शिक्षकांनी सहकार्य करायचं कबूल केलं. मम्मी पपांना हायसं वाटलं.
अपूर्ण
घुसमट -
'शर्मिष्ठा राजे' शर्मिष्ठाच्या नावाचा पुकारा झाला आणि शर्मिष्ठा पुरस्कार घ्यायला व्यासपीठावर गेली. वक्तृत्वस्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस तिला मिळाले होते. तिने प्रमुख पाहुण्यांकडून मानपत्र मेडल घेतलं परत खुर्चीत येऊन बसली. तिला आनंद झाला होता. पण तिचा आनंद वाटून घ्यायला फारसं कोणी नव्हतं. तिच्या काही मैत्रिणी, मित्र, विक्रमदादा आणि बाबा. आई आणि बहिणींना मुळीच आनंद होणार नव्हता. उलट वैषम्य वाटणार होतं. आणि बाबा तर बाहेर फिरतीवर होते. मैत्रिणी देखिल फारश्या नव्हत्याच तिला. मित्र मात्र खूप होते. आणि ते मनापासून कौतुक करणारे होते. पण पुरुषांनी केलेल्या कौतुकात आणि स्त्रियांनी केलेल्या कौतुकात फरक असतो ना. पुरुषांना फारसे बोलता येत नाही. थोडक्यात बोलतात. सगळ्यांनी मनापासून अभिनंदन केले 'वी आर प्राऊड ऑफ यू. पार्टी पाहिजे' म्हटले की झाले पुरुषांचे कौतुक. स्त्रियांचे वेगळे असते. त्या कितीतरी गोष्टी बोलतात. ते ऐकायला बरं वाटतं ना? पण शर्मिष्ठाच्या वाट्याला तो आनंद नव्हता. 
विचार करत शर्मिष्ठा घरी पोचली. लगेच तिने विक्रमदादाला फोन करून बातमी दिली. विक्रम खुष झाला. लवकर घरी येतो म्हणाला आला देखिल. त्याने येताना पेढे आणले होते. आल्याआल्या त्याने मोठ्याने हाक दिली "शमे ............. काँग्रॅट्स" हे त्याने मुद्दाम आई बहिणींना ऐकू यावे म्हणून केलं होतं. शमा नाचतच बाहेर आली. तिने मेडल मानपत्र दाखवलं. तिला जवळ घेऊन विक्रम म्हणाला "मग; आहेच आमची शमा हुशार !!! शमा हे बघ हे पेढे देवापुढे ठेव. आणि मग सगळ्यांना दे." आई  बहिणींची तोंडे वाकडी झाली पण वरवर त्यांनी "अभिनंदन" असे एका शब्दात म्हणून एकच पेढा तिघीत वाटून घेतला. त्या आत गेल्या तसा विक्रम म्हणाला "जाऊ दे शमा; त्या तश्याच आहेत. चल आपण शेजारी पाजारी पेढे वाटू या". दोघं जाऊन पेढे वाटून आले. शेजार्‍यांना शर्मिष्ठाशी आई बहिणी कश्या वागतात ते माहीत होते. त्यांनी देखिल तिचे मनापासून कौतुक केले. विक्रमने मग शर्मिष्ठाच्या हातात एक हजार रुपये ठेवले आणि म्हणाला "जा शमा तुला ड्रेसमटेरियल घेऊन ये. आता माझ्याकडे इतकेच आहेत. अजून कमवत नाही ना!" शर्मिष्ठा पैसे परत देत म्हणू लागली "अरे मग दादा......" तिच्या तोंडावर हात ठेवत विक्रमने दटावले "दादा कोण आहे? मग ऐकायचं असतं दादाचं" शर्मिष्ठाने डोळे पुसले.
अरविंद राजे म्हणजे शर्मिष्ठाचे बाबा मध्यम वर्गीय, आपले काम बरे आपण बरे अश्या वृत्तीचे. कल्याणला त्यांचा टू बीएचके फ्लॅट होता. कल्याणला सीकेपी वसती बर्‍यापैकी आहे. सगळा समाज एकमेकांना धरून असतो. सर्वसाधारणपणे हा समाज आनंदी, धर्माभिमानी, आपल्या परंपरा रीतीरिवाजांचा आदर करणारा असा आहे. आपल्या शौर्याचा त्याला अभिमान असतो. बर्‍याच कार्यांमध्ये अग्रेसर असतो. शर्मिष्ठाचे बाबा देखिल त्याला अपवाद नव्हते. घरी असतील तेव्हां समाजच्या बैठकांमध्ये आवर्जून भाग घ्यायचे. याचा अजून एक उपयोग होत असे. समाजातील चांगली मुले मुली यांची माहिती मिळत असे. उर्वशी आता शेवटच्या वर्षाला होती. अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या लग्नाचं बघायला हवं होतं. आई देखिल चौकशी करत होतीच. मुलींवर आईचं लक्ष होतं. तिने मुलींना सांगितलं होतं "हे पहा शरीर जितकं झाकलं ठेवाल तितकीच त्याच्याबद्दल उत्सुकता रहाते. आणि हे देखिल लक्षात ठेवा जोपर्यंत स्त्रीची प्राप्ती होत नाही तोपर्यंतच पुरुषाचा रस टिकून रहातो. त्यामुळे लग्न झाल्यखेरीज काहीही अगोचरपणा करायचा नाही." उर्वशी मेनका तिच्या शब्दाबाहेर नव्हत्या. उर्वशी आणि मेनका दोघींकडे मुलांचं लक्ष होतं. मुलांमध्ये थट्टेने म्हटलं जायचं की "जो मर्द इनको देखके नजरांदाज करे वो मर्द में जरूर कोई प्रॉब्लेम है ये पक्का समझ लेना" दोघी होत्याही तश्याच. फिगरचे आदर्श फिके पडतील अशी शरीरयष्टी त्यांना लाभली होती. शर्मिष्ठा बिचारी मनातल्या मनात म्हणायची देखिल "देवा; सगळं यांनाच दिलस? मला द्यायला का विसरलास रे?" बहिणींबद्दल मुलांमध्ये जे कमेंट्स होतात ते तिला माहीत होते. त्यांना पाहून वाजणार्‍या शिट्ट्या तिने ऐकल्या होत्याच. बहिणींचे नखरे देखिल बघितले होते. खोटा खोटा राग दाखवून शरीराला जास्तच हेलकावे देणार्‍या आपल्या बहिणींबद्दल एक प्रकारची असूया तिच्या मनात होती. पण हे दु: कोणाला सांगणार? बाबा विक्रमला सांगता येणार नव्हते. आणि आई  बहिणी तर तिचे काहीच ऐकून घेत नव्हत्या. "काळुन्द्री, ढबर्‍या पोटाची" हे आणि इतकच त्यांना शर्मिष्ठाच्या बाबतीत बोलता येत असे.
अश्या वातावरणात शर्मिष्ठा दहावी झाली. झाली म्हणजे काय ती झळकली. अख्ख्या ठाणे जिल्ह्यात ती पहिली आली. शाळेने तिचा सत्कार केला. बाबा आणि विक्रम सत्काराला उपस्थित होते. आई बहिणींनी स्पष्ट नकार दिला होता. सत्कार बघून दोघांचे डोळे कौतुकाने ओलावले होते. घरी आल्यावर बाबांनीच तिला ओवाळले होते. नमस्कार केल्यावर त्यांनी आशीर्वाद दिला "असच नाव काढ पोरी"
पण बाबांना आता एक चिंता होती. शमा मोठी होत आहे. तिच्या लग्नाचं कसं होणार?????  शेवटी रूपालाही महत्त्व आहेच ना?
अपूर्ण
घुसमट -
आईच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. तिला मैत्रिणीने आदल्या दिवसापासून बोलावलं होतं. अर्थात पपांना; श्रीपादला देखिल आग्रहाचं आमंत्रण होतं. मैत्रिणीशीपण संबंध देखिल चांगले होते.  आईला प्रश्न पडला होता की अमरचं काय करायचं? अमरच्या मित्रांची एक लहानशी सहल ठरली होती. ज्या दिवशी आई व पप्पा निघणार होते तेव्हांच तो परतणार होता. त्याच्यासाठी थांबायला बहिणींनी साफ नकार दिला होता. दोघींना लग्नात धमाल करायची होती. जिचं लग्न होतं ती त्यांचीही मैत्रीण होतीच. शेवटी आई पप्पांना म्हणाली "असं करा तुम्ही पुढे जा. मी अमर आला आणि त्याचा जरा आराम झाला की त्याला घेऊन निघते. ड्रायव्हरला माझ्यासाठी ठेवा." पप्पा हसून म्हणाले "अगं म्हणजे मैत्रिणीच्या शिव्या मी खाऊ म्हणतेस? त्यापेक्षा तू पुढे जा ड्रायव्हरला घेऊन; मी थांबतो अमरसाठी. मग आम्ही दुसरी गाडी घेऊन येऊ." बेत पक्का झाला. आईला तेच हवं होतं पण पप्पांच्या तोंडून निघायला हवं होतं. तयारी सुरू झाली. पुण्यालाच जायचं होतं. दुसर्‍या दिवशी परत फिरायचं होतं. त्यामुळे विशेष तयारी करायची नव्हती. पण लग्नाला जायचं म्हणजे तश्या साड्या नकोत? मुलींना ड्रेस नकोत? असं करत खरेदी झाली. तीन दिवसांवर जाणं येऊन ठेपलं. अमर सहलीला निघून गेला. त्याला त्याची सॅक तयार करून दिली होती. मुलांना असं काय लागतं? चार इनर्स व दोन टी शर्ट आणि दोन जीन्स. बाकी ब्रश, साबण टॉवेल, असं सामान. आईनेच पॅकिंग केलं. खबरदारी म्हणून अ‍ॅनासिनच्या व क्रोसिनच्या गोळ्या दिल्या. "अधून मधून मेसेज कर; पोचल्यावर फोन कर" असं दहावेळा सांगून झालं. अमर बाहेर पडला.
आईचं आणि मुलींच देखिल लग्नाला निघणं उद्यावर आलं. तोच आईची लांबची बहीण सुमित्रा येऊन टपकली. दिसायला सुंदर; नुकतेच लग्न झालेली सुमित्रा मुलुंडला रहात होती. तिचा नवरा बोटीवर कामाला होता. बराचसा बाहेरच असे. सुमित्राला अजून नोकरी मिळाली नव्हती. बॉटनिस्ट होती ती. पण लग्नानंतर मुंबईला यायचं म्हणून तिने आधीची नोकरी सोडून दिली होती. आता ती मुंबईत नोकरी शोधत होती. घरी दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे अगदी कंटाळली होती. मग तिला रेवतीची म्हणजे अमरच्या आईची आठवण झाली होती. चार दिवस रेवतीकडे राहून येऊ अश्या विचाराने ती आली होती. रेवतीबाई आणि सुमित्रा मध्ये बरच अंतर होतं. दोघींचं माहेर सातार्‍याचं होतं. जवळच रहात होत्या त्यामुळे एकमेकींच्या घरी सतत येणंजाणं होतं. त्यातूनच सहवास झाला होता. सुमित्राला रेवतीताई आणि रेवतीबाईंना सुमित्रा आवडत होती. सुमित्राला पाहिल्यावर रेवतीबाईंना आनंद झाला "अगं सुमित्रा? हे काय? अचानक? सांगायचं ना फोन करून. आता आम्ही उद्या पुण्याला निघतोय बघ लग्नाला. परवा येणार. असं कर तू रहा घरी. अमर देखिल येईलच. उलट बरं झालं मला टेन्शन नाही. आता आम्ही सगळे एकत्रच निघू. तू आहेसच अमरकडे बघायला. आणि गुणी आहे हं तो. या दोघींसारखा नाही." मीनाक्षी व नीलाक्षीने एकमेकींना टाळी दिली. सुमित्रा हसली "अगं खुशाल जा तुम्ही. मी आहे ना. आणि रहायलाच आले आहे. मग नंतर चांगली महिनाभर रहाणार आहे. जा तुम्ही. अमरचं मी बघते."
अपूर्ण
घुसमट -
शर्मिष्ठा आर्ट्सला गेली. तिला बांधून ठेवणारं सायन्स नको होतं वा शुष्क कॉमर्स देखिल नको होतं. तिला कला शाखाच पसंत होती. पुढे एखादी भाषा, संस्कृत घ्यावे का? का इतिहास घ्यावे? विचार करायला दोन वर्षे होती. सावकाश ठरवता येणार होते. बारावी पर्यंत कल्याणच्याच बिर्ला कॉलेजमध्ये शिकू या असं तिने ठरवलं.
शर्मिष्ठाचे बाबा अरविंद राजे कामाला लागले होते. ते उर्वशीसाठी संभाव्य मुले बघत होते. उर्वशीचे नाव एका मॅट्रिमोनी साईटवर नोंदवले. पण तिच्या आईची तिची अपेक्षा होती त्याप्रमाणे स्थळावर उड्या पडल्या नाहीत. केवळ बी.कॉम इतक्या शिक्षणावर स्थळे मिळत नव्हती. शेवटी तिने नोकरी शोधायला सुरुवात केली. एका मोठ्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये ती अकाऊंट्स असिस्टंट म्हणून लागली. ओळखीतून   काही स्थळे येत होती. मुलांना ती एकदम पसंत होती. पण चार पावसाळे अधिक पाहिलेले त्यांचे आई वडील तिचे शिक्षण नोकरीकडे बघत असत. ते बघण्याचा कार्यक्रम होईल इतके पुढे जातच नसत. ते दिवस गेले होते ज्यावेळी मुलीचं रूप पाहून तिला मागण्या येत. आता शिक्षण नोकरीला महत्त्व आलं होतं. उर्वशीच्या आईला हे मुळीच पसंत नव्हतं. 'तक्या सुंदर मुलीने नोकरी करायची म्हणजे काय?' पण परीस्थितीपुढे इलाज नव्हता.
बाबांना शर्मिष्ठाची देखिल काळजी होती. त्यांनी तिची पत्रिका देशपांडे गुरुजींना दाखवायचे ठरवले. एका रविवारी ते गुरुजींकडे जाऊन पोचले. त्यांनी आधी कंप्यूटरवर कुंडली बनवून घेतली होती. देशपांडे गुरुजी त्यांना पाहून आश्चर्याने म्हणाले "या राजे!!! आज इकडे कुठे?" बाबांनी शर्मिष्ठाची कुंडली गुरुजींसमोर ठेवली. गुरुजी कुंडली बघण्यात मग्न झाले. वेळ जात होता. गुरुजी जणू ध्यानस्थ झाले होते. बाबा चुळबुळत बसले होते. १५ मिनिटे झाली, २०, २५ पण गुरुजी काही वर बघण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी ३५, ४० मिनिटांनी गुरुजींनी डोकं वर केलं. "कोणाची पत्रिका आहे ही?" त्यांनी विचारलं. बाबांनी सांगितलं "माझ्या धाकट्या मुलीची. शर्मिष्ठाची. काय झालं? काही विशेष?" "विशेषच आहे" गुरुजी म्हणाले; क्वचित मिळते अशी पत्रिका. धनू लग्न आणि लग्नी चंद्र. म्हणजे तीव्र बुद्धी जी विषयाच्या गाभ्यापर्यंत पोचते. फाफटपसारा दूर करून मूळ कुठे आहे हे ती सहज शोधते. मुद्देसूद बोलते. इतरांना पटवून देण्यात एकदम पटाईत." बाबांना उत्साह आला. "हो हो; एकदम तशीच आहे ती. आणखी काय सांगता येईल?" गुरुजींनी सांगितलं "पराक्रमात राहू. ही मुलगी धीट असेल. स्वपराक्रमाने संकटातून मार्ग काढेल. पण त्याच वेळी भावंडांच्या प्रेमात काही न्यून असेल. चतुर्थात मीन राशी आहे. हिचा स्वामी गुरू भाग्यात असला तरी तो केतू बरोबर आहे. शिवाय हे स्थान मंगळ राहू यांच्या मध्ये अडकलेले आहे. त्यामुळे हिचे आईशी मतभेद असतील. पंचमात मंगळ आहे. मेषेचा मंगळ असल्याने चांगली शिकेल. कोणत्याही विषयाला हात घालण्याचे धाडस हा मंगळ देतो. सप्तमात शनी आहे. तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने बर्यापैकी मोठा असेल." बाबांना उत्साह आला "म्हणजे लग्न होईल ना तिचं?" गुरुजी हसले "निश्चित होईल. आणि चांगलं स्थळ मिळेल काळजी करू नका. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण पुढे तिचं आयुष्य खूप चांगलं जाईल." बाबा आनंदित झाले "आणखी काही?" गुरुजी सांगू लागले "सप्तमात शनि आहेमी म्हटलं तसं वयात निदान ते वर्षांचं अंतर असेल. पण त्याच वेळी ही रंगाने काळसर बुटकी असेल. भाग्यात गुरू केतू आहे. त्यामुळे तशी परंपरा प्रिय असली तरी केतूच्या प्रभावामुळे चिकित्सा करायला घाबरणारी असेल. दशमात बुध आहे. ही अश्या व्यवसायात जाईल जिथे बोलावं लागतं. म्हणजे शिक्षण, काऊन्सेलिंग इत्यादी. रवि लाभात आहे. तिला अनेक चांगले लाभ होतील. एकूण आयुष्य चांगले आहे." गुरुजी बोलायचे थांबले. त्यांची दक्षिणा देऊन बाबा जणू उडतच घरी आले. पण कोणाला काही बोलले नाहीत.
शर्मिष्ठा बारावी झाली. बोर्डात आली होती ती. कोणता विषय घ्यावा हे ठरत नव्हते. ती तिच्या शिक्षकांकडे गेली. वाळिंबे सर अगदी प्रेमळ माणूस होता. त्यांना शर्मिष्ठाबद्दल सहानूभूती होती. "बोल शमा काय काम काढलस?" शर्मिष्ठाने विचारलं "सर मी पुढे कोणता विषय घेऊ?" सर म्हणाले "माझ्या मते तू मानसशास्त्र घेऊन बी. कर आणि पुढे एमए कर. मानवी स्वभाव  त्याची गुंतागुंत हे शिकायला मिळेल आणि त्या नंतर तू मॅरिटल काऊंसेलिंगचा व्यवसाय करावास." सरांनी  पुढे बरीच माहिती दिली. शर्मिष्ठा विचार करत घरी आली. बाबा आणि विक्रमदादाला विचारून तिने मानसशास्त्र घ्यायचे नक्की केले. अर्थात एफवायला इतरही विषय असणार होते. तिने बाबांना विचारले "बाबा मी एलफिन्स्टन कॉलेजला जाऊ का? ते  कॉलेज आर्ट्स साठी प्रसिद्ध आहे म्हणे" बाबांनी  म्हटलं "इतक्या लांब? अगं कल्याणहून त्रपती शिवाजी टर्मिनस आणि युनिव्हर्सिटीच्या पुढे आहे ना ते कॉलेज?" शर्मिष्ठाने सांगितलं "हो बाबा; पण मी करीन मॅनेज" पण बाबांना शंका होत्या "अगं पण बाळा तुला डबा कोण देणार? इतक्या लांब जायचं तर थकणार. खायला प्यायला व्यवस्थित नको का?" शर्मिष्ठा म्हणाली "बाबा काळजी करू नका. मी पहाटे माझ्यापुरता नाश्ता आणि डबा करून घेईन. आणि जमत नाही असं वाटलं तर पुढच्या वर्षी बदलू या"
शर्मिष्ठाने एलफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एलफिन्स्टन कॉलेजचे ते दगडी बांधकाम, उंच छत, मागे उंच उंच होत जाणारी बसण्याची व्यवस्था, शर्मिष्ठाला कॉलेज आवडले होते. जरा अंधारे होते पण एक प्रकारचा उबदारपणा होता. पहिल्या दिवशी शर्मिष्ठा कॉलेजमध्ये पोचली. एलफिन्स्टन कॉलेजला नेहमी मिश्र प्रकारचे विद्यार्थी असतात. काही वरच्या सांपत्तिक थरातले. बेफिकीर, सिगारेटी फुंकणारे, ड्रिंक्स घेणारे श्रीमंत आईबापांची लाडावलेली पोरे तर काही मध्यम वर्गातले मनापासून अभ्यास करणारे. पहिल्या प्रकारातले विद्यार्थी दुसर्‍या प्रकारतल्या विद्यार्थ्यांकडे सुरुवातीला तुच्छतेने बघत. बसतांना सरळ सरळ वेगळे गट पडत. शर्मिष्ठाला या सगळ्याची कल्पना नव्हती. ती वर्गात शिरली. एका मुलीशेजारी जागा होती. तिकडे जाऊन तिने विचारलं "मे आय सिट हियर?" आणि ती हसली. आधी तिच्याकडे बघून नाराज झालेली कल्पना जोशी तिच्या हसण्याने विरघळली "येस प्लीज सिट डाऊन. व्हॉट्स युवर नेम?" "शर्मिष्ठा राजे" शर्मिष्ठाने सांगितलं. लगेच कल्पना मराठीत बोलू लागली. "कुठे रहातेस तू?" "कल्याणला; आणि तू?" शर्मिष्ठाने विचारलं. कल्पना म्हणाली "भुलेश्वरला" मग दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात एक मुलगी वर्गात शिरली भरपूर मेक अप केलेली. दिसायला बरी. पण टंच शरीराची. तिचे उंच टाचांचे सँडल टॉक टॉक वाजवत ती एका जागेवर बसली. सगळ्या विद्यार्थ्यांवर तिने अंदाज घेणारा कटाक्ष टाकला. श्रीमंत दिसत होतीच ती. हळूहळू वर्ग भरला. पहिलाच दिवस होता. अजून काही माहीत नव्हते. तितक्यात एक सुंदर तरुणी वर्गात शिरली. वर्गासमोर उभी राहून तिने हात उंच केले. गोरीपान, मोठे मोठे प्रफुल्लित डोळे. पण चेहर्‍याने मराठी वाटत नव्हती. सगळे शांत झाल्यावर म्हणाली "स्टूडंट्स, गुड मॉर्निंग, आय अ‍ॅम मिस वकील अ‍ॅन्ड आय विल बी टीचिंग यू इंग्लिश लिटरेचर. सो शाल वी इंट्रोड्यूस अवरसेल्वस?" एक एक जण उभा राहून माहिती देऊ लागला. "हलो, आय अ‍ॅम दिपेंदरसिंग, आय लिव इन खार वेस्ट, आय इंटेंड टू स्टडी हिस्टरी अ‍ॅज मेजर सब्जेक्ट." दुसरा मुलगा उभा राहिला "हलो आय अ‍ॅम नीलेश शहा. आय कम फ्रॉम मरीन ड्राईव अ‍ॅन्ड माय एम इज टू मेजर विथ इंग्लिश लिटरेचर." शर्मिष्ठाचा नंबर आला. पण तिने इतरांप्रमाणे जागीच उभी राहून परिचय देता मिस वकील यांच्या शेजारी जाऊन उभी राहिली. सगळ्या वर्गाकडे एकदा नजर फिरवली. तिला पाहून वर्गात कुजबूज सुरू झाली "अरे यह कौनसे हॉरर फिल्मसे आयी है यार?" "क्या डेडली कॅरॅक्टर है ना?" तितक्यात शर्मिष्ठा हसली. तिच्याबरोबर तिचे डोळे लुकलुकले. सगळी कुजबूज एकदम थांबली. "हाय फ्रेन्ड्स, आय अ‍ॅम शर्मिष्ठा राजे. आय कम फ्रॉम कल्याण. आय वॉन्ट टू स्टडी सायकॉलॉजी अ‍ॅन्ड आफ्टर डुईंग मास्टर्स आय विल स्टार्ट माय काउन्सेलिंग वर्क" मिस वकील तिच्याकडे बघत होत्या. त्यांनी विचारलं "हाऊ मच डिड यू स्कोअर इन ट्वेल्थ शर्मिष्ठा?" शर्मिष्ठाने त्यांच्याकडे हसून बघत सांगितलंएटी सेवन पर्सेंट" वर्गात शांतता पसरली "आर्ट्स मध्ये इतके मार्क्स?" हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. कोणालाही इतके मार्क नव्हते. एक स्कॉलर आपल्या वर्गात आली आहे याची सगळ्यांनी खुणगाठ बांधली" शर्मिष्ठा जागेवर जाऊन बसली.
शर्मिष्ठाचा कॉलेजचा पहिला दिवस सुरू झाला.
अपूर्ण

घुसमट –
अमरची आई आणि बहिणींना घेऊन अमरचे पप्पा पुण्याला निघून गेले. मैत्रिणीच्या मुलीच लग्न. त्यात ती मुलींचीही मैत्रीण. ग्रहमखापासून सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला. जात्यावरची गाणी, होम, घरचे आहेर सगळं अगदी यथासांग व उत्साहाने सुरू होतं. एकुलती एक मुलगी म्हणून मैत्रिणीने देखिल काही करायचं कमी ठेवलं नव्हतं. रुखवत देखिल छान मांडलं होतं. अनेक वस्तू दिलेल्या होत्या. डिनर सेट, फुड प्रोसेसर, प्रेशर पॅन्स, एक ना अनेक. शिवाय नव्या बरोबरच जुनं देखिल होतच. चुरमुर्‍याचे, बुंदीचे, रागगिर्‍याचे शेंगदाण्याचे भलेमोठे लाडू, मोठमोठ्या करंज्या ह्यांनी भरलेली भांडी मांडलेली होती. विविध सेंट व पर्फ्यूम्स मैत्रिणींनी मांडले होते. श्रीमंत पूजन थाटात झाले. नवर्‍या मुलाला घास भरवायला मैत्रिणी मोठ्या उत्साहाने पुढे येत होत्या. खरं म्हणजे देखणा मुलगा पाहून सगळ्याच मैत्रिणींना अस्साच नवरा आपल्यालाही मिळायला हवा असं वाटून गेलं होतं.
दुसरे दिवशी सगळे पहाटेच आवरून तयार झाले होते. लग्नाचा मूहूर्त लवकरचा होता. घाई गडबड चालली होती. कोणी लाऊडस्पीकरवरून सूचना देत होते. "नाश्ता तयार आहे. सगळ्यांनी नाश्ता करून घ्यावा. खालच्या मजल्यावर नाश्ता घ्यायला जावे" अश्या सूचना येत होत्या. कोणी कोणी खाली जात होते. मुलीकडले म्हणून काही लोक उगाच धावपळ करत होते. मुलाकडले जरा रुबाबात होते. मैत्रिणी मुलीची थट्टा करत होत्या. ब्यूटीशियन हजर झाली होती. मुलीला नऊवारी नेसवायची होती आणि मेक अप करायचा होता. अचानक रेवतीबाईंचा फोन वाजू लागला. पण इतक्या गोंधळात कोणाला ऐकू जातय? वाजून वाजून फोन बंद झाला. पाच मिनिटांनी पुन्हा वाजू लागला. पण छे! मग आळीपाळीने मीनाक्षी आणि नीलाक्षी यांचे फोन वाजत राहिले. पण प्रत्येकीचे फोन सध्या पर्समध्ये होते आणि पर्सेस कुठेतरी ठेवल्या होत्या.
लग्न लागलं. सप्तपदी सुरू झाली. मग काहीसे आठवून रेवतीबाईंनी पर्स उघडली. सहज मोबाईल बघतात तर सुमित्राचे चाळीस मिस्ड कॉल. घाबरून त्यांनी सुमित्राला फोन केला. "काय झालं गं सुमित्रा? इतके कॉल? काही प्रॉब्लेम झाला आहे का?" सुमित्राचा घाबरा स्वर ऐकू आला "किती कॉल करायचे? अगं अमरला ताप आलाय. तर तुम्ही लौकर परत या. मी मेटासिन आणून दिलं. पण मला बाहेर पडायची देखिल भीती वाटत होती त्याला एकट्याला ठेवून. मला तुमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर दे ना. नाही तर तूच तिथून फोन करून त्यांना इकडे यायला सांग." रेवतीबाईंना प्रचंड टेन्शन आलं. "किती आहे गं ताप?" सुमित्रा म्हणाली "माहीत नाही पण बराच असावा. तो ग्लानीत आहे, काही बोलत नाहीये. डोळे देखिल उघडत नाही." रेवतीबाई आणखी घाबरल्या. त्यांनी लगेच श्रीपादरावांना सगळं सांगून डॉक्टरांना फोन करायला लावला. आता कोणाचही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये लक्ष नव्हतं.
पण तरी कसेबसे जेवण आटोपून मैत्रिणीला सगळं सांगून सगळे निघाले. मीनाक्षी आणि नीलाक्षी नाराज झाल्या होत्या. पण आईचा मूड बघून त्या गप्प होत्या. रेवतीबाईंना अनाकलनीय रुखरुख वाटत होती. संध्याकाळी सहाला गाडी त्यांच्या सोसायटीत शिरली. रेवतीबाई घरात शिरल्या तेव्हां सुमित्रा वाटच बघत होती. "बरं झालं बाई आलीस. मी किती घाबरले होते. डॉक्टर येऊन गेले. १०४ ताप आहे म्हणे. त्यांनी इंजेक्शन दिले आहे." रेवतीबाईं पटकन अमरकडे गेल्या. अमरच्या कपाळाला हात लावल्यावर त्या दचकल्या. अंग चांगलच गरम होतं. सुमित्राने इतर काही उपाय केलेले दिसत नव्हते. त्यांनी थर्मॉमिटर लावला. अजूनही १०४ ताप होता. त्या घाबरल्या. पप्पा देखिल गंभीर झाले. त्यांनी परत डॉक्टरांना बोलावून घेतलं. तोपर्यंत रेवतीबाईंनी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याचं काम नीलाक्षीला दिलं.
रेवतीबाई सुमित्राशी बोलायला बाहेर आल्या. सुमित्रा स्वतःच आजार्यासारखी दिसत होती. रेवतीबाईंना वाईट वाटलं. थकली बिचारी. त्यांनी तिला चहा करून दिला. "कसा आहे गं तो?" सुमित्राने विचारलं. "अजून ताप आहेच. डॉक्टरांना बोलावलय." रेवतीबाई   म्हणाल्या "काय झालं पण? आल्या आल्याच ताप होता का?" "माहीत नाही; अगं त्याने आल्यावर लगेच बेडवर अंगं टाकलं. मला वाटलं थकला असेल. म्हणून मी पण झोपून गेले. सकाळी बघते तर ताप. हाका मारल्या तरी डोळे उघडेना. मग घाबरले आणि तुला फोन लावते तर तुम्ही कोणी फोन उचलत नव्हता." रेवतीबाई म्हणाल्या "हो; अगं तिकडल्या गोंधळात फोन ऐकूच आले नाहीत बघ."  तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी तपासले. अमर डोळे उघडत नव्हता. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं काही औषधे दिली. "या औषधांनी बहुधा उतरेल. नाहीतर काही तपासण्या करून घ्याव्या लागतील" डॉक्टर म्हणाले. डॉक्टर निघून गेले. सुमित्राने भीत भीत रेवतीबाईंना म्हटले "ताई, मला एक इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. पण अमरची प्रकृती अशी. तर मी येत नाही म्हणून कळवू का?" रेवतीबाई प्रेमाने म्हणाल्या "अगं तसं कशाला? जा की तू. आता आम्ही सगळे आहोत घरी अमरकडे बघायला."  "खरच ना ताई?" सुमित्राने विचारले. रेवतीबाईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवत सांगितले "खरच जा." सुमित्रा सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेली.
 रात्र झाली तरी ताप उतरलेला नव्हता आणि अमर डोळे देखिल उघडत नव्हता. त्याला औषधे द्यायची कशी? रेवतीबाईंनी लापशी केली. चमच्याने अमरला भरवू लागल्या. पण भरवलेले आत जातच नव्हते. सगळे बाहेर गळून जात होते. त्या घाबरल्या. त्यांनी श्रीपादरावांना बोलावलं. "अहो ऐकलं का? अमर बघा कसा करतोय. त्याला भरवलेलं गिळता देखिल येत नाहीये." परत डॉक्टर आले. मग त्यांच्या सल्ल्याने अमरला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. सलाईन लावलेला अमर पाहून रेवतीबाईंना भडभडून येत होतं. त्यांचा आधीच नाजूक असलेला पोर आता अगदी असहाय्य दिसत होता. बहिणींना देखिल आता प्रसंगाची जाणीव झाली होती. त्या अमरजवळ बसून होत्या. शेवटी नर्स ने सगळ्यांना बहेर काढलं. कोणी एकानेच थांबा म्हणून सांगितलं. मग रेवतीबाई थांबल्या. बाकी सगळे घरी आले. पण कोणालाही शांत झोप आली नाही. दुसर्‍या दिवशी पप्पा सकाळी सहालाच हॉस्पिटलमध्ये पोचले. अमरची अवस्था होती तशीच होती. ताप उतरला नव्हता. कमी देखिल झाला नव्हता. आणि मुख्य म्हणजे तो डोळे उघडत नव्हता. कशालाही प्रतिसाद देत नव्हता. हाका मारल्या, स्पर्श केला तरी तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. डॉक्टर राऊंडला आले. त्यांनी तपासले. त्यांच्या गंभीर चेहर्‍याकडे बघून रेवतीबाई घाबरल्या. आता सुरू झाल्या टेस्ट्स.
टायफॉईड, पॅराटायफॉईड निगेटिव्ह आले. मग डेंग्यू व चिकुनगुनियासाठी तपासण्या झाल्या. पण रिझल्ट निगेटिव्ह. प्लेटेलेट काऊंट नॉर्मल होता. मलेरियाची तपासणी झाली. तशी अमरला थंडी वाजतांना दिसत नव्हती. पण तरी तपासणी झाली. पण मलेरिया देखिल निगेटिव्ह. कसलेही निदान होईना. शेवटी डॉक्टरांनी व्हायरल फीवर घोषित केले व त्या दिशेने उपचार सुरू झाले. दुसरा दिवस उलटला. तिसरा दिवस उजाडला. अमरची स्थिती होती तशीच होती. त्याच्या पोटात काही जात नव्हतं. डॉक्टरांनी फीडिंग पंपने नळीद्वारे अन्न द्यायचा निर्णय घेतला. नाकातून नळी घालून अन्न दिलं गेलं. सतत मॉनिटरींग सुरू होतं. अमरला लघवी आणि स्टूल्स साठी अडल्ट डायपर लावले गेले. दर दोन तासांनी डायपर बदलायच्या सूचना वॉर्ड बॉईजना दिल्या गेल्या. एक एक दिवस उलटत होता. चिंता वाढत होती. दहा दिवसांनी डॉक्टरांनी पप्पांना बोलावून घेतलं. "मि. श्रीपाद आय अ‍ॅम अफ्रेड देअर इज नो इम्प्रूव्हमेंट. खरं तर डायग्नोसिसच झालेले नाही. सगळ्या टेस्ट्स नॉर्मल आहेत आणि तरीही अमरचा ताप उतरत नाही आणि तो शुद्धीवरही येत नाही. आम्ही अनेक डॉक्टर्स चे ओपिनियन घेतलं आहे. पण काही कळत नाहीये. आय थिंक तुम्ही त्याला हिंदुजाला न्या."
अमरला हिंदुजाला हलवलं गेलं. तिथल्या डॉक्टर्सच्या टीमने रिपोर्ट्स वाचले. औषधोपचार बघितले. परत काही तपासण्या केल्या गेल्या. सीटि स्कॅन करण्यात आला. पण कुठेही काहीही आढळले नाही. तीन महिने उलटले काहीही फरक पडत नव्हता. मग एके दिवशी तिथल्या डॉक्टरांनी पप्पांना सांगितलं "आय अ‍ॅम सॉरी टू से बट वी आर जस्ट नॉट एबल टू फाईंड आऊट व्हॉट इज राँग विथ अमर. आय सजेस्ट दॅट यू शिफ्ट हिम टू युवर रेसिडंस. देअर इज नो पॉईंट इन कीपिंग हिम हियर." श्रीपादराव जड पावलांनी बाहेर पडले. भरपूर खर्च आणि धावपळ होऊनही काही हाती लागले नव्हते. अमरला घरी आणण्यात आलं. आता अंगारे धुपारे सुरू झाले. देवांना साकडं घालून झालं. एक एक दिवस सरकत होता. महिना उलटला. अमरमध्ये काहीच फरक पडेना. मग रेवतीबाईंच्या एका मैत्रिणीने रेवतीबाईंना सोमण गुरुजींचं नाव सांगितलं. रेवतीबाई सोमण गुरुजींकडे गेल्या. गुरुजी एका बैठकीवर डोळे मिटून बसले होते. रेवतीबाई अधीरपणे वाट बघत बसल्या. अर्धा तास गेला. गुरुजींनी डोळे उघडले. रेवतीबाई पुढे झाल्या. त्यां गुरु़जींना वाकून नमस्कार करणार तोच गुरुजी म्हणाले "मला नको. त्या शिवशंभोला नमस्कार करा." त्यांनी एका कोपर्‍यात देवघर होते तिकडे बोट दाखवले. रेवतीबाई देवघराकडे जाऊन त्यांनी बाहेरूनच नमस्कार केला आणि त्या गुरुजींपुढे येऊन बसल्या. "बोला. काय काम आहे?" गुरुजींनी विचारलं.
रेवतीबाईंनी अमरबद्दल गुरुजींना सांगितलं. "माझा मुलगा अमरेन्द्र खूप आजारी आहे हो गुरुजी. आज चार महिने झाले. त्याचा ताप हटतच नाही. सतत १०४ ताप आहे. मोठे मोठे डॉक्टर झाले पण काहिही फरक नाही. शेवटी डॉक्टरांनी घरी न्या म्हणून सांगितलं. तुमच्याकडे मोठ्या आशेने आले आहे गुरुजी. काहीतरी उपाय सांगा." गुरुजींनी विचारलं "कुंडली आणली आहे?" रेवतीबाईंनी कुंडली पुढे केली. गुरुजींनी कुंडली बारकाईने न्याहाळली. पंचांग काढून काही बघितले. मग डोळे मिटून काही विचार करत बसले. रेवतीबाईंचा धीर सुटत होता. गुरुजींनी डोळे उघडले "हे पहा त्याच्या कुंडलीत अष्टमात राहू मंगळ युती आहे. सध्या त्यावरून शनीचे भ्रमण आहे. एकूण गंडांतर योग आहे." गंडांतर म्हटल्यावर रेवतीबाई घाबरल्या "मग त्यावर काय उपाय करायचा गुरुजी?" गुरुजी म्हणाले "आपण राहू शांती करून घेऊ या. शिवाय नवग्रहांच्या आहुत्या देऊ या. बघू; गंडांतर टळावे असे वाटते. कारण लग्नेश सुस्थितीत आहे." तीन दिवसांनंतर अग्नि पृथ्वीवर आहे त्या दिवशी पूजा करता येईल असे गुरुजींनी सांगितलं. रेवतीबाई पूजेच्या तयारीला लागल्या.
तीन दिवसांनी सोमण गुरुजी आले. श्रीपादरावांचा या सगळ्यावर मुळीच विश्वास नव्हता. पण मुलाच्या चिंतेने त्यांचा विरोध क्षीण झाला. मुकाट्याने ते पूजेला बसले. पूजेला आलेल्या सर्व गुरुजींच्या मंत्रोच्चारांनी घर भरून गेले. पूजा व्यवस्थित पार पडली. गुरुजींनी १०१ गरीब मुलांना भोजन द्यायला सांगितलं. त्यानुसार एका आदीवासी संस्थेला संपर्क करून एक दिवसाचे दोन्ही वेळचे जेवणाची एका केटररला ऑर्डर दिली. श्रीपादराव स्वतः मुलांना वाढायला उभे राहिले. मुलं खुश झालेली त्यांनी पाहिली. त्यांना बरं वाटलं. "अमर बरा तर व्हायलाच हवा शिवाय हे एक चांगलं काम झालं" ते स्वतःशी म्हणाले.
अपूर्ण
घुसमट -
चार पाच दिवस उलटले.
रात्र झाली. रेवतीबाई हल्ली अमरपाशीच आडव्या पडत. बहिणी देखिल अमरची काळजी घेत होत्या. पण काळजी घेणं म्हणजे तरी काय? तो शुद्धीवर नव्हताच. फक्त त्याच्या नाकातल्या नळीतून त्याला हळूहळू पाणी पाजणे आणि सरसरीत करून अन्न देणे. आधीच नाजुक शरीरयष्टी असलेला अमर आता अगदी अस्थिपंजर झाला होता. अमरचे फीडिंग झाले. मग बहिणींनी बाकी सगळ्यांचे जेवण उरकले. या आजारपणामुळे एक मात्र झाले होते. अजिबात काम न करणार्‍या दोन्ही बहिणी घरात कामे करू लागल्या होत्या. दोघींना चक्क चहा करणे; वरण भात लावणे अशी कामे जमू लागली होती. वेड्या वाकड्या का होईना पोळ्या करत होत्या. कधी तिखट कधी खारट कधी अळणी अशी भाजी येत होती. रात्र झाली तशी रेवतीबाई लाईट बंद करून अमरपाशी आडव्या पडल्या. गेल्या काही दिवसात त्यांच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली होती. पप्पा देखिल आजारी असल्यासारखे दिसत होते.
रेवतीबाईंना जाग आली. कसला आवाज आला? त्या इकडे तिकडे बघत अंधारातच अंदाज घेत होत्या. परत आवाज आला "अं ... अं" अमर? त्या धडपडत उठल्या व त्यांनी दिवा लावला. होय अमरच कण्हत होता. त्यांनी धावत जाऊन श्रीपादरावांना बोलावून आणले. याला काय म्हणायचं? प्रगती? का??????? दुसरा विचार करवत नव्हता. सकाळी डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर आले. त्यांनी बघितलं. अमर निश्चितपणे कण्हत होता. "इतक्यात काही सांगता येत नाही. आपण जरा दोन दिवसांनी बघू या." त्यांच्या बोलण्यात आशा नव्हती. दोन दिवस? पुन्हा रात्र झाली. आता रेवतीबाई अमरवर लक्ष ठेवून होत्या. लाईट बंद न करताच त्या आडव्या झाल्या. मध्येच उठून त्या अमरकडे बघत होत्या. पहाटे त्या उठल्या. अमरकडे बघितलं तर अमरने डोळे उघडले होते. "जरासा ह्सला का तो?" रेवतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "माझा बाळ तो. काय रे झालं तुला?" श्रीपादराव देखिल तसे सावधच होते. ते पटकन आत आले. अमरने डोळे उघडलेले बघून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. आता निश्चितपणे प्रगती होत होती.
आठ दिवस उलटले. अमरच्या सगळ्या नळ्या काढून टाकल्या होत्या. तो स्वतःच्या तोंडाने खाऊ लागला होता. उठून बसत होता. "कसा आहेस" विचारलं तर मानेनेच उत्तर देत होता. विचारात गढलेला असायचा. अजून धरून चालवावे लागत होते. डॉक्टरांना देखिल आश्चर्य वाटले होते. पण आता त्यांनी अमरला बी-कॉम्प्लेक्सची इंजेक्शन्स द्यायला सुरुवात केली. हळू हळू अमर ठीक दिसू लागला. हिंडूफिरू लागला. पण फारसा बोलत नव्हता. हे वेगळं होतं. अमर तर बडबड्या होता. सतत बडबडत असायचा. मग हे काय? महिना उलटला.  हळूहळू घरच्यांना आणखी एक फरक जाणवला. सतत माणसांमध्ये रहाणारा अमर आता एकांतप्रिय झाला होता. सतत शून्यात नजर लागलेली असायची. आजारपणात चार साडेचार महिने वाया गेले होते. आता कॉलेजला नाही गेला तरी चालेल असं पप्पांनी सांगितलं. अमर काही बोलला नाही. रेवतीबाई म्हणाल्या "अरे अमर ऐकलस का पप्पा काय म्हणतायत ते? इतके दिवस वाया गेलेत तर आता सरळ पुढल्या वर्षीच जा कॉलेजमध्ये. म्हणजे तुझा अशक्तपणा देखिल भरून निघेल." एकदम अमरच्या चेहर्‍यावर रागीट झाक आली "मला मुळीच अशक्तपणा नाहीये. मी उद्यापासून कॉलेजमध्ये जाईन."
रेवतीबाई आणि श्रीपादरावांनी एकमेकांकडे बघितलं. अमरच्या डोळ्यातली रागीट छटा पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं. अमरचं हे रूप त्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं. दोघं एकदम अस्वस्थ झाले. बाहेर येऊन ते बसून राहिले. "हे काय झालय अमरचं?" श्रीपादरावांनी विचारलं. रेवतीबाई म्हणाल्या "हे त्या आजारपणामुळेच झालय. काहीतरी बाहेरची बाधाच होती. बघा ना; तो सहलीला गेला होता. आला तो आजारीच पडला. पूजा झाली तसा बरा झाला." श्रीपादरावांना काही बोलता आलं नाही. कारण घडलं तर तसच होतं.
अमर कॉलेजला जाऊ लागला. पण पूर्वीचा अभ्यासू अमर आता राहिला नव्हता. अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं त्याचं. अमर जायचं म्हणून कॉलेजला जात असल्यासारखा होता. शिक्षकांच्या देखिल लक्षात आलं. पण त्यांना त्याच्या आजारपणाबद्दल माहीत असल्यामुळे ते गप्प बसले. काही दिवसांनी पुन्हा बेडूक डायसेक्शनला आला. शिक्षकांनी अमरला म्हटले "तुला नाही कापायचा ना? मग राहू दे. तू नुसता बघ." अमरच्या डोळ्यात परत रागीट छटा आली "कोण म्हणतं तसं? मी कापणार आहे." आणि खरोखरच त्याने बेडकाचे डायसेक्शन केले. शिक्षक चकित झाले. त्यांनी फोन करून श्रीपादरावांना सगळं सांगितलं. घरी आल्यावर श्रीपादरावांनी रेवतीबाईंना म्हटलं "आणखी एक बदल. अमर बेडूक कापायला नुसता तयारच झालेला नाही तर त्याने डायसेक्शन केलं देखिल." रेवतीबाई म्हणाल्या "तेच काय? आता अमर घरातही काही काम करत नाही. अजिबात हात लावत नाही. हा देखिल बदल झालाय."  काय घडतय कोणालाच कळत नव्हतं. वर्षं संपलं. अमर कसातरी पास झाला होता. ज्याच्याकडून पहिला येण्याची अपेक्षा होती तो काठावर पास झाला होता. चार साडेचार महिने वाया गेले हे गृहित धरून देखिल त्याला निदान साठ टक्के मिळतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. काही बोलता पण येत नव्हतं. तो उत्तर देत तरी कुठे होता? एका बाजूला विचार करत बसलेला असायचा.
आईने विचारलं "अमर सुट्टीत काय करणार आहेस? ते बुद्धीबळाचे वर्ग आहेत ते लाव. नाहीतर कॅरमच्या स्पर्धा आहेत. भाग घेणार आहेस का?" अमरने तुटकपणे उत्तर दिलं "हॅ!!! मला बैठे खेळ आवडत नाहीत" आई आश्चर्यचकित होऊन बघत राहिली. हे दोन्ही खेळ त्याचे अत्यंत आवडते होते. एके दिवशी सकाळी आई अमरच्या खोलीत डोकावली तर अमर जागेवर नव्हता. कुठे गेला असेल म्हणे पर्यंत अमर बाहेरून घरात शिरला. घामाघूम झाला होता. "काय रे अमर कुठे गेला होतास?" अमर रुक्षपणे म्हणाला "जॉगिंगला. आता रोज जाणार आहे." आणि खरोखरच तो रोज जात होता. अमरच्या चेहर्‍यावर आता एक प्रकारचा करारीपणा दिसत होता. कोवळीक हरपली होती.
काही दिवसांनी अमरने रेवतीबाईंकडे मागणी केली "मम्मी मला सहा हजार रुपये दे. मला जिम लावायचा आहे." रेवतीबाई जरा वेळ त्याच्याकडे बघत राहिल्या. तो काहीतरी आपण होऊन करतोय याचा आनंद मानायचा का हे त्याच्या आजवरच्या स्वभावाविरुद्ध म्हणून चिंता करायची? आजवर अमरने नेहमी व्यायाम या प्रकाराचा कंटाळा केला होता. धावणे पळणे हे देखिल तो करत नसे. जेवणा खाण्याचे देखिल खूप नखरे होते त्याचे. पण आता तो पानात पडेल ते खात होता. आहार वाढला होता. कॉलेजला कारने जाणे टाळत होता. चालत जात होता. पण "ठीक आहे काहीतरी करतोय ना" असा विचार करून रेवतीबाईंनी त्याच्या हातात सहा हजार ठेवले. अमर नियमित जिमला जाऊ लागला. इंस्ट्रक्टरच्या सल्ल्याने त्याने रोज अंडी खायला सुरुवात केली. पूर्वी त्याला अंड्यांचा वास देखिल सहन होत नसे. आता तो कच्चं अंड खात होता. आता सीकेपी घरात नॉन व्हेज तर होणारच ना? पण अमर कधी खात नसे. त्याला त्या प्राण्याला मारल्याचे दु:ख होत असे. पण आता तो नॉन व्हेज विना तक्रार खाऊ लागला. शरीराला प्रोटीनची आवश्यकता आहे असं म्हणू लागला. व्हे प्रोटीन, मिल्क प्रोटीन हे शब्द त्याच्या तोंडी अधून मधून यायला लागले.

अपूर्ण

घुसमट -
शर्मिष्ठा कॉलेजवर खुश होती. प्रोफेसर्स चांगले होते. मिस वकील यांची तर ती आवडती विद्यार्थिनी झाली होती. त्यांनी पहिल्याच दिवशी तिची धिटाई पाहून तिला स्टाफ रूम मध्ये बोलावून घेतलं होतं. त्या वेळी त्यांनी तिला सांगितलं होतं "शर्मिष्ठा इफ यू रियली इंटेन्ड टू डू वेल इन इंग्लिश लिटरेचर, लर्न टू थिंक इन इंग्लिश. इव्हन दी सब्जेक्ट सायकॉलॉजी दॅट यू इंटेन्ड टू पर्स्यू, शाल बी बेटर अंडर्स्टुड इफ यू लर्न टू थिंक इन इंग्लिश" शर्मिष्ठा म्हणाली "येस मॅम; आय विल डेफिनाईटली ट्राय" तेव्हांपासून ती तसा प्रयत्न करत होती.
तिला एकच त्रास होता. पुरुषांबद्दलचं तिचं अनिवार आकर्षण!! आणि वर्गात कितीतरी देखणी राकट मुले होती. प्रत्येक वेळी एखादा चांगला मुलगा दिसला की शरीरभर एक अस्वस्थ करणारी आकर्षणाची लाट फिरून जायची. तिला शक्य असतं तर ती नक्कीच एखाद्या मुलाचा हात धरून पळून गेली असती. वन नाईट स्टँडला ती एका पायावर तयार होती. पण कोणी म्हणता कोणीही तिला त्या नजरेने बघत नव्हते. तिची छेड काढत नव्हते. इतर मुलींशी होत असलेलं फ्लर्टिंग बघून तिला अगदी मानसिक त्रास होत असे. पण तिचा काहीच इलाज नव्हता. अकरावी बारावीलाच तिला मैत्रिणींनी पोर्न क्लिप्स पोर्न साईट्स यांची ओळख करून दिली होती. काही काळ तिला तो नादही लागला होता. पण लवकरच तिला उमगले की यातून आपण शांत होता आणखी उत्तेजित होतो आपल्याला दुखायला लागते. शेवटी तिने ते कमी कमी करत बंद केले होते. तिचा मनावर तसा ताबा होता. एकदा बघायचं नाही ठरवल्यावर तिने ते कटाक्षाने पाळले होते. पण हे पुरुषांचे आकर्षण मात्र काही केल्या कमी होत नव्हते.
आज सायकॉलॉजीचा क्लास होता. गेल्या आठ दिवसात क्लास झालाच नव्हता. त्यामुळे प्रोफेसर कोण आहेत हे माहीत नव्हते. आज ती वाट बघत बसली होती. प्रोफेसर नाडकर्णी म्हणून कोणी सायकॉलॉजी शिकवतात असं ऐकलं होतं. वेळ झाली आणि प्रोफेसर नाडकर्णी वर्गात शिरले. त्यांच्याकडे बघून पुन्हा एकदा शर्मिष्ठाच्या शरीरात ती अस्वस्थ करणारी आकर्षणाची लाट फिरून गेली. पंचेचाळीसचे प्रोफेसर नाडकर्णी होतेही तसेच. सावळे, देखणे, भव्य कपाळावर विखुरलेले केस, कमावलेली उत्तम शरीरयष्टी, बुद्धीमत्ता दर्शवणारे भेदक काळेभोर डोळे. शर्मिष्ठाच्या मांड्यांमध्ये थरथर होऊ लागली. थोडा वेळ तिला भोवळ येते की काय असं वाटू लागलं. तिने घट्ट मुठी आवळल्या. डोळे मिटून घेतले. प्रयत्नपूर्वक स्वतःवर ताबा मिळवला. ती डोळे उघडून वर बघू लागली. प्र. नाडकर्णी बोलत होते "बॉईज एण्ड गर्ल्स, नाईस टू सी यू हियर. आय अ‍ॅम हियर टू इन्स्ट्रक्ट यू इन सायकॉलॉजी टू दी बेस्ट ऑफ माय अ‍ॅबिलिटी.”
“अ‍ॅज यू माईट नो, सायकॉलॉजी इज सायन्स ऑफ साईक ऑर माईंड. हाऊ इस धिस माईंड? The mind is a set of cognitive faculties including consciousnessperceptionthinkingjudgement, and memory.
The mind is the faculty of a human being's reasoning and thoughts. It holds the power of imagination, recognition, and appreciation, and is responsible for processing feelings and emotions, resulting in attitudes and actions.
 तर सध्याच्या मान्यतेनुसार मनाचा एक गोल आहे. त्यात सगळ्यात वरचा भाग हा जागृत मनाचा आहे. पण हा भाग केवळ दहा ते पंधरा टक्के असतो. मग येते ते रॅशनल बॅरियर. हे ते आहे जे येणार्‍या इनपुट्स चे विश्लेषण करते. नको असलेले दूर करते योग्य तेच आत पाठवते. तिसरा भाग आहे सबकॉन्शस माईंड अर्थात अव्यक्त मनाचा. हे सांगतांना ज्या महान व्यक्तीने सायको ॅनालिसिसचा पाया घातला त्या सिग्मंड फ्रॉईड (Sigmund Freud) चे म्हणणे काय आहे ते समजून घेतलेच पाहिजेफ्रॉईडच्या म्हणण्यानुसार मन हे आईसबर्ग अर्थात हिमनगासारखे आहे. त्याचा अर्थ असा की आपल्याला जे जाणवते ते मन प्रत्यक्ष मनाचा फार लहानसा भाग आहे. त्याने मनाचे भाग इड, इगो आणि सुपर इगो मध्ये वर्गीकरण केले. पैकी इड हा भाग हा व्यवहारी भाग आहेहा भाग स्वार्थावर आधारित आहे. जो स्वतःसाठी स्वतःच्या सुखासाठी धडपडत असतो, मार्ग शोधत असतो. वेगवेगळ्या इच्छा आकांक्षांवर आधारित असतो. बाहेरून येणारे विविध दृष्ये, ऐकीव वा काल्पनिक गोष्टींवर (Stimulus) आधारित हा भाग स्वतःच्या इच्छा निश्चित करतो त्यामागे पळायची प्रेरणा देतो. सुपर इगो हा माणसाला त्याचे आध्यात्मिक कल, कर्तव्ये, सामाजिक जाणीव देतो. आणि इगो हा इड सुपर इगो यांच्यामध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करतो. दी इगो ॅन्ड दी इड (The Ego and the Id) या पुस्तकात फ्रॉईडने हे सगळे विस्ताराने मांडले आहेमाझी इच्छा आहे की ज्यांना पुढे सायकॉलॉजी घ्यायचे आहे त्यांनी तरी हे पुस्तक घेऊन वाचावे.
नाडकर्णी सरांचा तास संपला. शर्मिष्ठा ते पुस्तक घेऊन वाचणार होती. तिला पुढे सायकॉलॉजी घ्यायचे होते हे तर झालेच पण नाडकर्णीसरांच्या आकर्षकपणाचाही त्यात काही रोल होता का? तिच्या डोळ्यांसमोर नाडकर्णीसर उभे राहिले. त्यांची भक्कम शरीरयष्टी, कानांपाशी किंचित करडे झालेले केस त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच घालत होते. पुन्हा एकदा शर्मिष्ठाच्या शरीरात ती बेचैन करणारी लाट फिरली. "हे असे सरांबद्दल आकर्षण वाटणे बरोबर नाही" तिने स्वतःला बजावले.
पुढे काय होणार होते? शर्मिष्ठाला स्वतःला भीती वाटत होती. हे आकर्षण आपल्या अभ्यासाच्या आड तर येणार नाही?
अपूर्ण


घुसमट – ९
अमरची प्रकृती हळूहळू सुदृढ दिसू लागली.  व्यायाम व आहार याचा परीणाम दिसून येऊ लागला. घरातही त्याच्या खोलीत डंबेल्स, वेट्स दिसू लागले. स्प्रिंग्स दिसू लागल्या. अन्य व्यायामाची साधने देखिल दिसू लागली. हे सगळे त्याने अधून मधून रेवतीबाईंकडून पैसे घेऊन विकत घेतले होते. घरी देखिल तो बराच व्यायाम करत होता. श्रीपादराव आणि रेवतीबाईंनी ठरवलं की आता अमरशी अभ्यासाबद्दल बोलायला हवं. एके दिवशी दोघं अमरच्या खोलीत शिरले. अमर व्यायाम करत होता. शॉर्ट्सवर त्याची शरीरयष्टी उठून दिसत होती. स्नायू जाणवत होते. या दोघांना बघून अमर थांबला. "वा अमर तब्बेत छान दिसायला लागली आहे तुझी." श्रीपादरावांनी आधी जरा स्तुती करून त्याला सोबर मूड मध्ये आणायचा प्रयत्न केला. तसं झालं देखिल. अमरच्या चेहर्‍यावर हास्य आलं. "खरच? मॅनली दिसायला लागलो का मी?" अमरने विचारले. पप्पा म्हणाले "नक्कीच. तीन चार महिनेच झाले असतील ना तू व्यायामाला सुरुवात करून? मग त्या मानाने खूप प्रगती आहे." "थँक्स" अमर म्हणाला. श्रीपादरावांनी त्याचा मूड चांगला झाल्याचे बघून म्हटले "बरं अमर; आता हे तुझं बारावीचं वर्ष आहे. अभ्यास करतोयस ना?  बघ हे महत्त्वाचं वर्षं आहे." अमरच्या   चेहर्‍यावरचं हास्य मावळलं. त्याच्या डोळ्यात परत ती रागीट झाक आली. "हो. मला माहीत आहे. करतोय मी तयारी." तो परत व्यायाम करायला लागला. रेवतीबाई व श्रीपादराव मुकाट्याने बाहेर पडले. सध्या तरी अमरला दुखवायचे नाही असा त्यांचा विचार होता. त्यांची इच्छा होती की अमरने मेकॅनिकल इंजिनीयर व्हावं परदेशातून शिकून यावं आणि आपला धंदा आणखी पुढे न्यावा. पण जरी तसं झालं नाही तरी काही बिघडत नव्हतं. अमरने आहे तो धंदा जरी चालवला तरी पुरेसं होतं.
दिवस जात होते. अमरने आता कॉलेजच्या खेळांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. एक चांगला अ‍ॅथलीट म्हणून तो ओळ्खला जाऊ लागला. कबड्डी, फुटबॉल, इत्यादी खेळातही तो चमकू लागला. एन्.सी.सी त्याने जॉईन केली. युद्धाच्या कथा हल्ली त्याला आवडू लागल्या होत्या. नेटवर तो युद्धकथा वाचत असे. विविध युद्धांबद्दल माहिती मिळवत असे. पण अभ्यास मात्र यथातथा होत होता. कॉलेजच्या परीक्षेत त्याला जेमतेम पंचावन्न टक्के मार्क पडले होते. रेवतीबाई आणि श्रीपादरावांना काय करावं काही सुचत नव्हतं. परीक्षांमध्ये बक्षिसे मिळवणारा अमर आता विविध खेळंमध्ये बक्षिसे मिळवू लागला होता.
त्या दिवशी रविवार होता. दुपारी नॉनव्हेज जेवून श्रीपादराव कोणाला तरी भेटायला निघून गेले होते. रेवतीबाई आवरत होत्या. अमर नेहमीप्रमाणे दुसर्‍या महायुद्धाची माहिती वाचत होता. मीनाक्षीने ते बघितले. "ए अमर सारखं काय तेच तेच युद्धाबद्दल वाचतोस? ही नॉव्हेल वाच. मस्त आहे बघ. 'अ स्ट्रेंजर इन द मिरर' वाच ना." अमरने तुटकपणे म्हटलं "मला नाही वाचायचं." मग नीलाक्षी देखिल बहिणीच्या बाजूला आली. "काय रे? सारखं युद्धाबद्दल वाचतोयस काही उपयोग आहे का त्याचा? त्यापेक्षा अभ्यास कर" अमर तटकन म्हणाला "गप्प बस. बायकांना काय कळतय?" त्याच्या डोळ्यात तरळलेली ती रागीट झाक त्यांना दिसली. पण त्यापेक्षा त्यांना धक्का बसला तो अमर जे काही बोलला त्याचा. "बायकांना काय कळतय?" असं म्हणाला अमर? आश्चर्यचकित होऊन त्यांनी सगळं आईला सांगितलं. "मम्मी बघ ना हा अमर हल्ली वेगळाच वागायला लागलाय." "का गं काय झालं?" आईने विचारलं. नीलाक्षी म्हणाली "अगं सारखं युद्ध युद्ध वाचत असतो. म्हणून त्याला म्हटलं जरा अभ्यास कर तर म्हणतो 'बायकांना काय कळतय'. आता तूच सांग हा असा कधी पूर्वी बोललाय का? हा आपला पूर्वीचा अमर वाटतच नाही. कोणी दुसराच आहे असं वाटतं" रेवतीबाई धसकून ऐकत राहिल्या. "असं म्हणाला तो?" त्यांनी विचारलं, "त्या आजारपणापासून साफ बदलून गेलाय आपला अमर. मला तर खात्रीच आहे की त्याला काही बाहेरचच झालय. पहा ना पिकनिकहून आला की लगेच आजारी पडला. आणि पूजा केल्यावर कसं बरं वाटायला लागल? पण अजून त्या दुष्ट शक्तीचा प्रभाव पुरता ओसरलेला दिसत नाही. मला परत एकदा गुरुजींकडे जायला हवं." मीनाक्षी म्हणाली "अगं आई आधी डॉक्टरांकडे जाऊ या. त्यांच्याने काही झालं नाही तर मग जा तू गुरुजींकडे." रेवतीबाई काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहर्‍यावरचे चिंताक्रांत भाव दोघींनाही दिसत होते. अमर खूप बदलला होता हे तर खरच होतं. त्याचं व्यायामाचं वेड हे चिंतेचं कारण नव्हतं. सीकेपी घरांमध्ये मुलगा सातवी आठवी पासूनच व्यायाम करायला लागतो. बॉडी बिल्डिंगची आवड सीकेपी पुरुषांमध्ये असतेच. पण अमरचे हे वेड नॉर्मल या सदरात मोडत नव्हते. त्याचा तो ध्यास झाला होता. सतत व्यायाम करणे, त्याचबद्दल बोलणे, युद्ध, मैदानी खेळ याशिवाय दुसरा विषय नव्हता.
अमरचे स्त्रियांवर राग धरणे पुढे नेहमीचेच झाले. कोणत्याही मुलीने काही म्हटले की तो तिरसटपणा करत असे. "तुला विचारलय का? मुलींनी मध्ये बोलायचं काम नाही" अशी उत्तरे देत असे. "बायकांचा सल्ला घ्यायची वेळ आली नाही माझ्यावर अजून" असे देखिल बरेच वेळा त्याच्याकडून ऐकायला मिळत असे. रेवतीबाईंनी विचारलं "अमर अरे असा का बोलतोस? का इतका राग बायकांवर?" अमर तिरसटून म्हणाला "मला ना रागच येतो बायकांचा. उगाच शहाणपणा करत असतात. स्वतःला फार शहाण्या समजतात आणि सगळ्या गोष्टींमध्ये लुडबुड करतात. शिवाय स्वतःवर किती अन्याय होतो असा सतत आव आणतात." रेवतीबाई म्हणाल्या "अरे मी पण बाईच आहे ना? मग माझ्याबद्दलही असच म्हणतोयस का?" अमर जरा वरमून म्हणाला "तू नाही ग मम्मी. पण बाकीच्या बायका अश्याच असतात. मला त्या अजिबात आवडत नाहीत. खूप राग येतो." रेवतीबाई चिंतित झाल्या होत्या. श्रीपादरावांना सांगितलं तर ते हसून म्हणाले अगं सगळ्याच मुलामुलींची वयात येतांना आधी भांडणे होतात. आणि मग पुढे एकमेकांचे आकर्षण वाटू लागते. आणि मग प्रेमात पडतात आणि लग्न करतात. अमरचे देखिल तेच चालले असावे. फक्त दोन वर्ष उशीर झाला आहे. हॉर्मोनल बदलांमुळे हे घडत असते. जरा काही दिवस जाऊ दे. तोच एखादी मुलगी पटवतो की नाही बघ. मग आहेच बायकोची गुलामी. मी नाही का करत?" रेवतीबाई हसल्या खर्‍या पण त्यांची चिंता कमी झाली नव्हती. शिवाय त्यांना असं जाणवलं होतं की श्रीपादराव स्वतःची अस्वस्थता झाकण्यासाठी ओढून ताणून विनोद करत आहेत.
त्यांचा अंदाज खरा होता. श्रीपादराव अत्यंत अस्वस्थ होते. अमर दिवसे न दिवस व्हिम्सिकल होत चालला आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. वास्तविक सीकेपी समाज हा आनंदी प्रकारचा आहे. हा समाज जीवन फारसे सिरीयसली घेत नाही. खावे, प्यावे मजा करावी आनंदाने रहावे अशी विचारसरणी असणारा हा समाज आहे. धर्माभिमान, आपल्या परंपरांचा अभिमान या समाजात असतो. पण अमर सध्या वेगळाच वाटू लागला होता. रेवतीबाईंच्या लक्षात आलं होतं की नाही कोण जाणे पण अमर कित्येक दिवसात अजिबात हसला नव्हता हे श्रीपादरावांनी मार्क केलं होतं. हे सीकेपी समाजाला धरून नव्हतं. हसणे खेळणे हा या समाजाचा स्थायी भाव आहे. मग हे काय घडत आहे? काय करावं हे श्रीपादरावांना सुचत नव्हते. आता अमर काही फारसा शिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानुसार त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली होती. प्रॉडक्शन आयटम वाढले पाहिजेत असा विचार करून ते त्याप्रमाणे कामाला लागले. अमर डिझाईन करू शकणार नाही त्यामुळे त्याला रेडिमेड सेटअप दिला पाहिजे जो आपोआप चालत राहील व अमरला फारसे बघायला न लागता पैसा येत राहील अशी काही तरी योजना करायला हवी होती.
अपूर्ण
घुसमट - १०
शर्मिष्ठा रोज घरापासून स्टेशनपर्यंत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून कॉलेजपर्यंत चालत जात होती. पोट कमी करण्याच्या तिच्या प्रयत्नाचा हा भाग होता. तिला जिम लावायचा होता. पण वेळच नव्हता. शेवटी तिने रविवारी नमस्कार मंडळात जाऊन सूर्यनमस्कार शिकून घेतले आणि रोज सूर्यनमस्कार घालू लागली. पण काही उपयोग होत नव्हता. तिचं पोट काही कमी होत नव्हतं. चेहर्‍याच्या बाबतीत ती काहीच करू शकत नव्हती. प्लॅस्टिक सर्जरी वा तत्सम प्रकार आपल्या आवाक्या बाहेर आहेत हे तिला माहीत होतं. ना रंगाबाबत काही करता येत होतं. जाहिरातीत दाखवण्यात येणार्‍या क्रीम्सने येणारा गोरेपणा तिच्याबाबतीत मात्र दिसत नव्हता. कोणतेही क्रीम तिला गोरेपणा सोडाच; थोडा उजळपणा देखिल देऊ शकत नव्हते. शेवटी तिने तो नाद सोडला. वर्गातल्या जाड मुली वजन कमी केलेल्या तिने बघितल्या होत्या. त्यांनी सांगितलेले उपाय तिने करून बघितले होते. पण काहीही उपयोग होत नव्हता. उलट त्या डायेटिंगने तिला अशक्तपणा येत होता. आता तिने फक्त व्यायामावर लक्ष केन्द्रित केलं पोट कमी व्हायचं असेल तर होईल असं ठरवून विचार करणं बंद केलं होतं.
उर्वशीचं लग्न ठरलं. मुलगा ठाण्याचा होता. उर्वशीला पसंत नव्हता. दिसायला देखणा नव्हता. चार चौघांसारखा होता. पण बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होता. म्हणजे पुढे तो ब्रांच मॅनेजर त्याही पुढे जाईल असे नक्की होते. आई बाबांनी समजावून तिला लग्नाला तयार केलं. आई वा दोघी बहिणींकडून शर्मिष्ठाला कळणार नव्हतच पण बाबांनी विक्रमने सांगितलं. तसच हे ही सांगितलं की "तू फारसं लक्ष घालू नकोस शमा, त्या कश्या आहेत हे तुला माहीत आहेच. उगाच काहीतरी बोलतील."  तशीही शर्मिष्ठा लांबच रहाणार होती. त्यामुळे जेव्हां बाबांनी विक्रमने विचारले की "शमे तुला तुझ्या मित्र मैत्रिणींना आमंत्रण करायचं असेल ना? किती पत्रिका लागतील?" तेव्हां ती म्हणाली होती "नाही बाबा, मी कोणालाही बोलावणार नाहीये. उगाच त्यांच्यासमोर काही घडायला नको" बाबांनाही पटलं होतं.
लग्न व्यवस्थित पार पडलं. बाबांनी लग्नासाठी पैसे राखून ठेवले होते. शिवाय आता विक्रमला नोकरी लागली होती. आता जरी पगार वीस हजारच होता तरी तेवढी भर पडत होती. आणि विक्रमचा स्वतःचा खर्च फारच कमी होता. त्यामुळे बहुतेक पगार तो बाबांकडे देत होता. त्याचा खर्च जाऊन उरलेला पगार बाबा बँकेत ठेवत होते. एकंदर लग्न चांगलं पार पडलं. शर्मिष्ठा मागे मागेच राहिली. करवली म्हणून देखिल ती पुढे आली नाही ना तिला आई बहिणींनी बोलावलं. बाबा विक्रमला वाटलं पण उगाच शोभा व्हायला नको म्हणून ते गप्प बसले. पण त्यांना सारखं अपराध्यासारखं वाटत होतं. शर्मिष्ठाचे कपडे देखिल विक्रम आणि बाबांच्याच आग्रह करण्यामुळे तिने घेतले. लग्न झाल्यावर उर्वशीची पाठवणी झाली. उर्वशी आई मेनकाच्या गळ्यात पडून रडत होती. बाबा विक्रमच्या देखिल ती गळ्यात पडली. पण जवळच उभ्या असलेल्या शर्मिष्ठाकडे तिने बघून बघितल्यासारखं केलं. सगळ्यांना जाणवलं. नातेवाईकांचंही लक्ष होतच. शर्मिष्ठाचं रूप हा त्यांच्यात चर्चेचा विषय होता. अर्थात तिला मिळणारी वागणूक त्यांना पसंत नव्हती. पण वेळ आली तर यातल्या कोणीही आपल्या मुलासाठी वा भावासाठी तिचा विचार करणार नव्हतं.
वर्षं सरलं. शर्मिष्ठा एफ्.वायला कॉलेजमध्ये सर्व विषयांमध्ये पहिली आली. वर्गात तिचा दबदबा वाढला. एरवी तिला टाळणारी मुलं मुली आता तिच्याशी बोलू लागली. आधी नोट्स मागण्यासाठी आणि नंतर तिच्या चतुर बोलण्यामुळे तिचे मित्र मैत्रिणी वाढल्या. कोणताही विषय असो, शर्मिष्ठा काही तरी विशेष मुद्दे मांडायची ते ही अभ्यासपूर्ण. सगळे विचारायचे "अरे इतना पढती कब है?" कधी विचारायचे "कोई ऐसा टॉपिक भी है जिसके बारेमें तुझे पता नही?" शर्मिष्ठा हसायची. हसताना तिचे डोळे लकाकत असत. सगळे तिचं हसू बघत रहायचे. पण ते तितकच होतं. यापेक्षा जवळ कोणि येत नव्हतं.
सहा महिने अजून गेले आणि घरी सगळ्यांना एक धक्का बसला. एके दिवशी विक्रमदादा बरोबर एक काळी सावळीशी मुलगी घरी आली. विक्रमने बाबांना सांगितलं "बाबा; ही राधिका अय्यर. मला ही आणि तिला मी पसंत आहे. म्हणून तिला घरी घेऊन आलोय. आम्हाला लग्न करायचय." शर्मिष्ठाने राधिका कडे बघितलं "काळी सावळी; दाक्षिणात्य मुली असतात तशी ठसठशीत, सुंदर मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यांची राधिका हसरी होती. तिने सगळ्यांना हात जोडून नमस्ते केलं. "एक काळुंद्री काय कमी होती म्हणून आता हा दुसरी घेऊन येतोय" मेनका आईच्या कानात कुजबुजली. पण ते सगळ्यांना ऐकू गेलं. राधिका हसली "छान नाव आहे काळुंन्द्री! तुम्ही काळ्या मुलींना काळुंद्री म्हणता का?" सगळे दचकून तिच्याकडे बघत राहिले. शर्मिष्ठा पुढे झाली. राधिकाचा हात हातात घेऊन तिने विचारलं "तू मराठी इतकं छान कशी काय बोलतेस्?" राधिकाने विचारलं "तू शर्मिष्ठा ना? अगं मी लहानपणापासून इथेच राहिलेली आहे. मराठी शाळेत शिकलेली आहे. आणि आमचे शेजारी देखिल मराठीच होते. माझं आडनाव फक्त अय्यर आहे. बाकी मला तमिळ अजिबात कळत नाही." ती हसली. तिचं प्रसन्न हास्य पाहून शर्मिष्ठा आणि बाबांच मत तिच्याबद्दल अनुकूल झालं. आई आणि मेनकाला पटणं शक्य नव्हतच. त्या उठून गेल्या. पण राधिकाचा चेहरा अजिबात हलला नाही. ती शांतच होती. प्रसन्न हसत होती. तिने विचारलं "मग बाबा? तुमचे आशीर्वाद आहेत ना आमच्या लग्नाला?" बाबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला "सुखी हो पोरी. माझी पूर्ण संमती आहे या लग्नाला. कसं काय करू या पुढे? आणि हो तू शिकलियेस किती?" राधिकाने सांगितलं "मी वकील आहे बाबा. क्रिमिनल लॉयर. माझं ऑफिस आहे डोंबिवलीला. मी आणि विक्रम एकाच कॉलेजमध्ये होतो. मी बी.कॉम नंतर लॉ करायचं ठरवलं तर विक्रम एम. कॉम झाला. पण आमची ओळख होतीच." शर्मिष्ठाने थट्टेने विचारलं "नुसती ओळख?" पहिल्यांदाच राधिकाच्या चेहर्‍यावर लाज दिसली. ती सलज्जपणे म्हणाली "तू काय समजायचं ते समज" शर्मिष्ठाने टाळीसाठी हात पुढे केला. राधिकाने टाळी दिली.
विक्रम आणि राधिकाने रजिस्टर लग्न केलं. राधिकाचे आई वडील आणि भाऊ विक्रमची फॅमिली इतकेच हजर होते.
राधिका माप ओलांडून घरात आली. दुसरी बेडरूम तिला द्यावी लागल्यामुळे मेनका हॉलमध्ये आली. मेनकाने बरीच आदळ आपट केली. पण इलाजच नव्हता. शर्मिष्ठाला मात्र काहीही प्रॉब्लेम नव्हताती लहानपणापासून हॉलमध्येच झोपत होती. आजी बरोबर. आणि आजी गेल्यावर पुढे एकटी. अर्थात जरा मोठा झाल्यावर विक्रमही हॉलमध्येच झोपायला लागला होता. हॉलमधून देव्हारा दिसायचा. देव्हार्यातल्या समईचा स्निग्ध प्रकाश तिला दिसायचा. आजीचे बोल आठवायचे "शमे लक्षात ठेव. देव कायम आपल्यासोबत असतो. कधी भीती वाटली, नाराज असलीस, रडत असलीस तर त्या समईच्या प्रकाशाकडे बघत रहा. मन शांत होईल. स्वतः जळत प्रकाश देणार्या समई सारखं जीवन असावं. शांत; स्निग्ध!"
आताही ती आडवी पडून समईच्या प्रकाशाकडे बघत झोपेची आराधना करत होती. पण आज ती आनंदी होती. तिच्या जोडीला एक काळी सावळी मैत्रीण आली होती. शांतपणे हसत हसत उत्तर देणारी.

अपूर्ण