Saturday, March 12, 2016

सुभाष  -  १
सुभाष गोट्या खेळत होता. अकरा वर्षांचा सुभाष मतिमंद होता. अत्रे पती पत्नीचा एकुलता एक मुलगा. परत चान्स घ्यायचं धाडस त्यांनी केलं नव्हतं. आता कुठे तो बर्‍यापैकी बोलू लागला होता.  विश्वास अत्रे एका मोठ्या कंपनीत अधिकारी होते तर हिमानी अत्रे शिक्षिका होत्या. शाळा जवळच होती. पंधरा वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं तेव्हां दोघांनी हौसेने इकडे फ्लॅट घेतला होता. जरा गावाबाहेर वाटला होता तेव्हां पण आता वसतीमध्ये आला होता. टू बीएचके फ्लॅट होता. विश्वासचे आई बाबा गावी रहात असत. सातारा जिल्ह्यात बुध या गावात ते रहात असत. तिथे शेती होती. फार नाही सहा एकर. पण आजोबा सातार्‍यात नोकरी देखिल करत असत.  जोंधळा, तूर, असे पीक घेत असत. शिवाय भाजी पाला होताच. घराच्या परसात आंब्याचे झाड, कवठ, केळी व अंजीर अशी झाडे होती. समोर रामफळ होते. फळे मुबलक येत होती. जोंधळा चांगला पिकत होता. जनावरांना कडबा मिळत होता. पावसाळ्यात हिरवं बाटुक खायला मिळत होतं. दोन गाई होत्या. घरच्या पुरतं दूध निघत असे. सुखी कुटुंब होतं. विश्वास शिकला. पुण्याला जाऊन आणखी शिकला. मग नोकरी लागली. पगार चांगला होता. आजोबांना तर इतका पगार ऐकून धक्का बसला होता. पण विश्वासला कल्पना होती की ही तर सुरुवात आहे. अजून कमवायला हवे. तरच तो भविष्यात यशस्वी जीवन जगू शकणार होता. तो परीक्षा देत राहिला.
चार वर्षांनी त्याचं लग्न हिमानीशी झालं होतं. हिमानी डोंबिवलीची. रामनगरमधील. ती सातार्‍यात यायला नाखुष होती. पण आई वडिलांनी दबाव टाकल्याने तिने लग्नाला हो म्हटले होते. ती देखिल सुशिक्षित होती. त्यामुळे तिला लगेच शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी लागली. सुनेने नोकरी करणे आजी आजोबांना पसंत नव्हते. पण ते गप्प बसले. विश्वास व हिमानीने सातार्‍यात फ्लॅट बघायला सुरुवात केली होती. हिमानीला सातार्‍यातील शाळेत नोकरी मिळत होती. पण बुध येथे राहून ते शक्य नव्हते. मग त्यांना हा जरा आडबाजूला असलेल्या इमारतीत फ्लॅट मिळाला होता. अजूबाजूला वसती नव्हती. संध्याकाळी दिवेलागणीनंतर यायला भीती वाटायची. पण हळूहळू वसती वाढत गेली. आता फारशी भीती नव्हती पण तेव्हां भीती वाटायची.
तीन वर्षांनी सुभाषचा जन्म झाला होता. सगळ्यांना खूप खूप आनंद झाला होता. पण लवकरच आनंद मावळला होता. सुभाष मतीमंद होता. हळू हळू प्रगती होत होती. त्याला मतीमंदांच्या शाळेत घातले होते. तिथे त्याला विविध खेळ शिकवले जायचे. काही साधी सोपी कामे करवून घेतली जायची. सुभाष आठ वर्षांचा झाला आणि त्याला गोट्या खेळायचा छंद लागला. मग विश्वासने त्याला गोट्या आणून दिल्या होत्या. सुभाष गोट्या घेऊन त्यातल्या पाच सहा जमिनीवर ठेवून मग एका गोटीने त्यातील एक उडवायचा प्रयत्न करत असे. नेम मुळीच लागत नव्हता. जमिनीवरच्या गोट्यांपासून चार चार फुटांवर फेकलेली गोटी पडत असे. पण तरी सुभाषला आनंद होत असे. त्या खेळात तो तासनतास रमत असे.
त्या दिवशी आजोबांशी विश्वासचा वाद झाला होता. विश्वासचं म्हणणं असं होतं की आता खूप झालं काम आता शेती बिती विकून दोघांनी सातार्‍याला त्यांच्या बरोबर येऊन रहावे. पण हे आजोबांना मान्य नव्हते. शेवटी शेवटी आजोबांचा आवाज जरा चढलाच होता. मग विश्वास गप्प बसला होता. सुभाष बघत होता. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती. त्याचे डोळे आजोबांवर खिळले होते. रागारागाने विश्वास सातार्‍याला निघाला होता. हिमानीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण विश्वासने काही ऐकलं नव्हतं. तिघं सातार्‍याला घरी आले. हिमानी स्वयंपाकघरात गेली. विश्वास अजून धुमसत होता. त्याला आजोबांची भूमिका समजत नव्हती.
सुभाष गोट्या घेऊन आला. त्याने विश्वासला विचारलं "बाबा आजोबा वाईट आहे नं? मी त्याला मारू?"  विश्वासला हसू आलं. "मारतोस? जा मार जा" सुभाषने पाच गोट्या जमिनीवर मांडल्या "मग एक्केका गोटीला नावे दिली "आजोबा, आजी, बाबा, आई, आणि सुभाष  आता आपण आजोबाला मारू. त्याने लांब उभा राहून गोटी फेकली. पाचातली एक गोटी उडाली. विश्वासचं लक्ष त्याच वेळी गेलं. त्याला आश्चर्य वाटलं. "अगं हिमानी सुभाषने आता अचूक एक गोटी टिपली आहे बघ. प्रगती आहे म्हणायची" त्याला आनंद झाला  होता.
फोन वाजू लागला. आजी होती. घाबरली होती. "अरे विश्वास हे बघ कसे करतायत उठतच नाहीयेत. चालता चालता पडले. किती हलवलं तरी उठत नाहीयेत. शेजार्‍यांनी डॉक्टरला बोलावलय. तू ये बाबा लवकर. विश्वास आणि हिमानी सुभाषला घेऊन धावले.
पोचेपर्यंत कळलं होतं. आजोबा गेले होते. सगळ्यांना प्रचंड धक्का बसला होता. विश्वासला फार वाईट वाटलं होतं. शेवटच्या दिवशी तो वडिलांशी भांडला होता. सुभाषचे डोळे चमकत होते.
सगळे उरकून विश्वास घरी आला. त्याचा चेहरा उतरला होता.
................सुभाष गोट्या खेळत होता.


सुभाष - २
सुभाष गोट्या खेळत होता.
सात आठ महिने उलटले. शेती, घर विकून विश्वासने आजीला सातार्‍याला आणले. आजी आता त्यांच्याच बरोबर रहात होती. तिला जरी गावाची आठवण येत होती तरी स्त्रियांचं पुरुषांसारखं होत नाही. त्यांचा वेळ कसाही निघून जातो. स्वयंपाकघर, सुभाष बरोबर असा वेळ निघून जात होता. आजोबांचा वेळ मात्र गेला नसता हे त्यांना मनोमन पटलं होतं. अर्थात आता पटून काही उपयोग नव्हता.
शेती व घर विकून चांगला पैसा आला होता. तो विश्वासने चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, बाँड्स व विविध योजनांमध्ये गुंतवला. काही बँकेत फिक्समध्ये ठेवला. त्याचं व्याज चांगलं येऊ लागलं. सगळे फिक्स डिपॉझिट त्याने आई व हिमानीच्या नावाने जॉईंट अकाउंट मध्ये ठेवले होते. हिमानी देखिल येणारे व्याजाचे पैसे सासूच्या हातात ठेवत असे. पण आजी म्हणायच्या "अगं मला मेलीला कशाला लागताहेत इतके पैसे? ठेव तुझ्याकडेच. औषधापुरते देत जा म्हणजे झाले." उरलेले पैसे हिमानी बँकेत टाकत असे. एकूण आर्थिक घडी नीट बसली होती.
हल्ली विश्वासला कामावरून यायला उशीर होत होता. त्यांच्या कंपनीचा नवीन रीजनल मॅनेजर आला होता. तो आल्यापासून सेल्स टार्गेट्स घसरली होती. तो सगळं खापर त्याच्या ज्युनियर्सवर फोडायला बघत असे. त्यातल्या त्यात विश्वासला फार त्रास होत होता कारण तो रीजनल मॅनेजरला डायरेक्ट रिपोर्टिंग करत असे. त्याच्या सहकार्‍यांना सहानूभूती होती पण ते काहीच करू शकत नव्हते. तरीही त्याचा करसपाँडन्स नीट ठेवायचा आटोकाट प्रयत्न त्याचा असिस्टंट नेने करत होता. वेगवेगळ्या अपॉईंटमेंट्स त्याची सहकारी कल्पना बघत असे. विश्वास अधिक काम करत होता पण त्यांचा रीजनल मॅनेजर त्यागी चार चौघांसमोर त्याचा पाणउतारा करत होता. "व्हॉट इज धिस मि. विश्वास? यू हॅव नॉट कंप्लीटेड द जॉब आय हॅड गिवन टू यू" विश्वास म्हणे "बट सर यू हॅड नॉट गिवन मी धिस जॉब. यू हॅड टोल्ड मी अबाऊट अनादर क्लायंट" त्यागी आवाज चढवून म्हणत असे "सो यू आर काँट्रडिक्टिंग मी. इज दॅट सो? ट्राईंग टू टेल मी दॅट आय अ‍ॅम राँग?" शेवटी विश्वास गप्प बसत असे.
हा प्रकार चालूच राहिला होता. अगदी तो घरी असताना देखिल त्यागी फोन करून झाडत होते. एकदा असाच रात्री आठ वाजता फोन आला. विश्वास नुकताच घरी आला होता. त्याने फोन घेतला "येस सर?" "बट सर दॅट जॉब इज नॉट हॅन्डल्ड बाय मी. इट इज लुक आऊट ऑफ पर्चेस डिपार्टमेंट नॉट सेल्स. व्हाय आर यू होल्डिंग मी रेस्पॉन्सिबल फॉर सम्बडी एल्सेस मिस्टेक?" जरा वेळाने विश्वासचा आवाज चढला "दॅट्स इनफ सर. यू आर सिनीयर डस नॉट मीन यू कॅन अब्यूज मी. आय अ‍ॅम वॉर्निंग यू आय वि लॉज अ कंप्लेन्ट अगेन्स्ट यू." त्यागी काय म्हणाला कोण जाणे पण विश्वासचा तोल ढळला होता. तो मोठ्याने ओरडला होता "शट अप मि. त्यागी. आय विल नॉट टॉलरेट युवर बुलशिट अ‍ॅनीमोअर" त्याने फोन कट केला.
सुभाष ऐकत होता. त्याचे डोळे चमकत होते.
दुसरे दिवशी विश्वास कामावर जातांना तणावाखालीच होता. हिमानीला म्हणाला "आता हा त्यागी काय काय करतोय कोण जाणे. फार म्हणजे फारच त्रास देतोय" विश्वास निघून गेला.
दुपारी सुभाष शाळेतून घरी आल्यावर त्याने आजीला विचारले "आजी बाबा कोणाशी भांडत होते गं?" आजी म्हणाली "अरे बाळा ते त्यांचे साहेब आहेत." सुभाषने विचारले "आजी साहेब वाईट आहे ना? मी त्याला मारू?" आजीला खूप वाईट वाटलं हा आता बारा वर्षांचा होईल पण अजून सहा वर्षांचा असल्यासारखा बोलतो. ती म्हणाली "हो. मार हां. चांगला मार त्याला." सुभाषचे डोळे चमकू लागले. त्याने गोट्या घेतल्या व तो बाहेरच्या खोलीत गेला. त्याचा आवाज येऊ लागला "हा बाबा आणि हा साहेब. आता आपण साहेबाला मारू या हं"
विश्वासचे त्यागीसाहेबांशी कडाक्याचे भांडण झाले होते. "सर मी तुम्हाला परत सांगतोय की ऑर्डर कॅन्सल झाली हा माझा दोष नाहीये. ऑर्डर आणणे हे माझं काम. पुढे प्रॉडक्शन का झालं नाही. त्यांना रॉ मटेरियल मिळालं की नाही हे बघायला मी जनरल मॅनेजर नाही. मी मार्केटिंग मॅनेजर आहे. पर्चेसवाल्यांनी जर रॉ मटेरियल वेळेवर उपलब्ध करून दिलं नसेल तर मी काय करू?" त्यावर त्यागी साहेब तुच्छतेने म्हणाले "यू विल नेव्हर अंडरस्टँड. यू आर अ मोरॉन" आता विश्वास भडकला "ओ... इज इट? आय अ‍ॅम अ मोरॉन? देन यू आर अ‍ॅन अ‍ॅरोगंट बास्टर्ड मि त्यागी" त्यागी चवताळला आणि म्हणाला "आय विल सी टू इट दॅट यू आर फायर्ड. देन यू विल कम टू नो" त्यागी केबिन मध्ये निघून गेला.
विश्वासने ठरवले आपणच राजीनामा देऊन टाकू या. सारखी झिकझिक नको. तीन वाजून गेले. त्याने शिपायाला त्यागीसाहेब फ्री आहेत का बघायला केबिन मध्ये पाठवले. शिपाई ओरडत व पळत पळत बाहेर आला. सगळे धावले. त्यागीसाहेब अस्ताव्यस्त पडले होते. डॉक्टरांना फोन गेला. डॉक्टर कंपनीला टाय्-अप रिलेशन मध्ये होते. ते लगेच आले. तपासून त्यांनी डिक्लेर केलं. "डेड." पोलिसांना फोन गेला. पोलिस आले पंचनामा झाला. इनस्पेक्टर आवटी होते. जुजबी चौकशी झाली. मृत्यूचं कारण कळे पर्यंत पोलिस काही करू शकत नव्हते. विश्वास सुन्न झाला होता. इनस्पेक्टर आवटींनी त्याला विचारलं "तसा तर नॅचरल डेथ वाटतोय पण तरी शवविच्छेदनानंतर तुम्हाला काही लोकांना पोलिस स्टेशनला यावं लागेल. कुठे रहाता तुम्ही?" विश्वासने सांगितलं "निलायम सोसायटी सर" "हं माहित आहे" आवटी म्हणाले. त्यागींची बॉडी हलवून शवविच्छेदन होईपर्यंत व बॉडी कुटुंबीयांच्या ताब्यात देईपर्यंत विश्वासला आठ वाजले.
विलक्षण थकून तो घरी आला.
"काय झालं हो?" हिमानीने विचारलं. "अगं ते त्यागी साहेब नाही का? ते गेले. ऑफिसमध्येच" विश्वास सगळं सांगू लागला.
सुभाषचे डोळे चमकत होते. त्याने गोट्या घेतल्या
.......... सुभाष गोट्या खेळत होता.
अपूर्ण

सुभाष - ३
सुभाष गोट्या खेळत होता ...
विश्वास ऑफिसमध्ये पोचला. कालच्या त्यागीसाहेबांच्या मृत्यूने सगळेच हबकलेले होते. वातावरण तंग होते. एक अस्वस्थ शांतता होती. विश्वासला ऑफिसमध्ये कळले की सकाळी सकाळी शिपायाला व नंतर नेनेला पोलिसांनी बोलावून घेतलं होतं. विश्वासला कळत नव्हतं यात कोणाला बोलावण्याचा काय संबंध आहे? तितक्यात कल्पनाला देखिल फोन आला व पोलिस स्टेशनला बोलावलं गेलं. कल्पना घाबरली पण गेली. मग बराच वेळ गेला. 
दोन तास गेले आणि विश्वासचा मोबाईल वाजू लागला. ईनस्पेक्टर आवटी होते "मि. विश्वास? तुम्ही जरा पोलिस स्टेशनला पोचा लगेच. बोलायचं आहे." विश्वास पोलिस स्टेशनला पोचला. इनस्पेक्टर आवटी जरा वेळ कुठेतरी शून्यात बघत राहिले मग विश्वास पुरेसा अस्वस्थ झाल्यावर त्यांनी विश्वासवर नजर रोखली "मि. विश्वास काल तुमचे आणि त्यागींचे भांडण झाले होते?" विश्वास दचकला "भांडण म्हणजे असं झालं ..... " इनस्पेक्टर आवटींनी मध्येच त्याला तोडलं "हो की नाही तेवढच सांगा" विश्वासने आवंढा गिळला "होय" "कडाक्याचं?" इनस्पेकटर आवटींनी नजर तीव्र करत विचारलं. "होय" विश्वास चुळबुळत म्हणाला "पण म्हणजे..." इनस्पेक्टर आवटींनी हात उंचावून त्याला थांबवले "म्हणजे त्यागी गेले तर तुम्हाला आनंदच होणार होता ना?" आता विश्वासला राग आला. त्याने शांतपणे इनस्पेक्टर आवटींच्या नजरेला नजर भिडवली "ऑफिसमधल्या भांडणांसाठी मी कोणाच्या मृत्यूची इच्छा करत नाही. ते माझी चूक नसताना मला वाटेल तसे बोलत होते. शेवटी माझा तोल सुटला आणि मी पण बोललो. इतकच." इनस्पेक्टर आवटींनी विचारलं "इतकच?" "हो इतकच" विश्वास ठासून म्हणाला. "त्यांनी तुम्हाला काढून टाकायची धमकी दिली नाही?" इनस्पेक्टर आवटींनी विचारलं. "हो दिली" विश्वास शांतपणे म्हणाला "पण मग मी ठरवलं की मीच राजीनामा द्यावा. हा बघा अजून माझ्या खिशात आहे. आणि तो देण्यासाठीच त्यागीसाहेब फ्री आहेत का हे बघायला मी शिपायाला पाठवलं होतं." त्याने राजीनाम्याचा कागद काढून इनस्पेक्टर आवटींसमोर धरला. त्यावर नजर टाकून आवटी म्हणाले "हाऊ व्हेरी कन्व्हीनीयन्ट मि. विश्वास. आता ते गेल्यावर तुम्ही हा कागद माझ्यासमोर धरताय. कुठे रहाता तुम्ही? निलायम सोसायटी ना? पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट येईपर्यंत सातारा सोडून जाऊ नका. आमची नजर आहे तुमच्यावर." विश्वास चिडून म्हणाला "म्हणजे तुमचा माझ्यावर संशय आहे? माझ्यावर?" आवटी त्याला जाण्याचा इशारा करत म्हणाले "तसा आमचा ऑफिसमधल्या सगळ्यांवरच संशय आहे. पण रिपोर्ट येईपर्यंत आम्ही शांत आहोत. पण जर का तो नैसर्गिक मृत्यू नाही असा रिपोर्ट आला तर मात्र यू आर इन ग्रेव्ह ट्रबल मि. विश्वास." विश्वास त्राण गेल्यासारखा चालत ऑफिसमध्ये परतला. तिथे पोचल्यावर त्याला कळलं की शिपाई, नेने व कल्पनाची देखिल कसून चौकशी झाली होती. 
इनस्पेक्टर आवटी विचारात पडले होते. विश्वासचे बोलणे अन्य लोकांच्या बोलण्याशी जुळत होते. तशी ही कोणीही माणसं गुन्हेगार वाटत नव्हती पण चेहर्‍यावरून अंदाज बांधले तर चुकू शकतात हे त्यांना माहीत होतं. "बघू संध्याकाळी रिपोर्ट येईल मग ठरवू काय करायचं ते." त्यांनी फाईल पुढे ओढली. 
संध्याकाळी रिपोर्ट आले. "ब्रेन हॅमरेज". इनस्पेक्टर आवटींनी फाईलवर नॅचरल डेथ असा शेरा मारून फाईल बंद केली. विश्वासला फोन करून सगळ्यांना बोलावून घेतलं. "ओके. ईट्स अ नॅचरल डेथ. आय अ‍ॅम सॉरी. पण आम्हाला जरा कठोर वागावं लागतं. तुम्ही सगळे आता जाऊ शकता." 
पाच सहा महिने गेले.
सुभाष सोसायटीच्या बागेत खेळत होता. त्याचा खेळ म्हणजे काय? तर नुसतेच इकडून तिकडे धावणे. त्याला कोणी खेळायला घेत नसत. वॉचमन फक्त लक्ष ठेवून असे. त्याला माहीत होते व विश्वासनेही सांगितले होते सुभाषवर लक्ष ठेवायला. सोसायटीच्या कंपाऊंडला लागूनच पण बाहेर काही मुले व्हॉलीबॉल खेळत होती. खेळता खेळता बॉल सोसायटीच्या आवारात आला. सुभाषच्या जवळ येऊन पडला. सुभाषने तो घेतला आणि खेळू लागला. तितक्यात व्हिक्टर बॉल शोधत आला. व्हिक्टर सोसायटीतला आडदांड मुलगा होता. मारामार्‍या करण्यात त्याचा हातखंडा होता. अत्यंत उद्दाम देखणा व चुकीच्या मार्गाला लागलेला असा तो मुलगा आई वडिलांसाठी चिंतेचा विषय होता.
शोधता शोधता व्हिक्टरचं लक्ष सुभाषकडे गेलं. "क्या रे दिखता नही क्या मै बॉल ढूंढ रहेला है? बॉल चुराएगा क्या?" त्याने सुभाषला ढकललं. वॉचमन धावत आला. "अरे व्हिक्टरबाबा जाने दो ना. तुमको मालूम है ना उसका प्रॉब्लेम है" पण व्हिक्टरला बरेच दिवसात कोणी गिर्‍हाईक मिळालं नव्हतं "प्रॉब्लेम है तो घर मे बैठनेका ना?" सुभाषकडे वळून तो म्हणाला "क्या रे? दिमाग है नही; लेकिन खुजली बहुत है क्या तेरे को?" त्याने सुभाषच्या गालावर एक जोरात थप्पड ठेवून दिली. सुभाष हेलपाटला. त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं. पण तो रडत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावर हास्य आलं. त्याचे डोळे चमकू लागले. त्याचे ते चमकत असलेले डोळे व्हिक्टरवर खिळले. व्हिक्टर चिडला "हस क्या रहा है बे तू? मस्ती चढी है क्या?" त्याने आणखी एक थप्पड चढवली सुभाषच्या गालावर. सुभाष खाली पडला पण लगेच उठला. पुन्हा त्याच्या चेहर्‍यावर हास्य होते. त्याचे डोळे व्हिक्टरवर खिळले होते. व्हिक्टर अजून एक मारणार तेवढ्यात विश्वास तिथे पोचला. ते दृष्य बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व्हिक्टरवर धाऊन जात त्याने व्हिक्टरच्या कानाखाली एक ठेऊन दिली. आधी अचानक हल्ल्याने गडबडलेला व्हिक्टर मग विश्वासकडे वळला "क्या बे तेरेको भी मस्ती चढी क्या? ठहर दिखाता हूं" मग त्याची आणि विश्वासची मारामारी झाली. पण व्हिक्टरपुढे मध्यम वर्गीय पांढरपेशा विश्वास म्हणजे काहीच नव्हता. गर्दी जमा होई पर्यंत विश्वासने खूप मार खाल्ला होता. तितक्यात व्हिक्टरचे वडील मध्ये आले. "स्टॉप इट व्हिक्टर. हॅव सम शेम. यू हॅव बीटन दॅट इनोसंट बॉय. जिजस विल नॉट फर्गिव यू" खांदे उडवून व्हिक्टर निघून गेला. त्याच्या मित्रांना देखिल झाला प्रकार मुळीच आवडला नव्हता. आता मूड गेला असं सांगून त्यांनी काढता पाय घेतला. व्हिक्टरच्या वडिलांनी विश्वासची पुन्हा पुन्हा माफी मागितली. 
हिमानी तो पर्यंत घरी परतली. सुभाष आणि विश्वासची अवस्था पाहून ती रडायलाच लागली. सुभाषचा चेहरा धुवून तिने त्याला खायला दिलं. मग दामटून झोपवलं. विश्वास अजून रागातच होता. पोलिसात जावं असच त्याला वाटत होतं पण व्हिक्टरचे आई वडील अतिशय सभ्य व चांगले लोक होते. त्यांचा विचार करून तो गप्प बसला. पण सोसायटीने दखल घेतली होती. चेअरमन व सेक्रेटरी व्हिक्टरच्या घरी जाऊन त्यांना समज देऊन आले. सोसायटी स्वतः पोलिसात जाईल हे सांगण्यात आलं. 
संध्याकाळ झाली. सुभाष उठला होता. त्याला दूध व काही खायला देऊन हिमानी कामाला लागली. सुभाष अजूनही हसत होता. फाटलेल्या ओठावरून हात फिरवत त्याने कपाटातून गोट्या काढल्या. "सुभाष" तो स्वतःला म्हणाला "व्हिक्टर वाईट आहे ना?" त्याचे डोळे चमकत होते. त्याने गोट्या मांडल्या .....
इनस्पेक्टर आवटी खुर्चीत बसून फाईल चाळत होते. तितक्यात फोन घणघणू लागला. हाय वे वरून रस्ता आत वळतो तिथे टू व्हीलरचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. एक तरूण मुलगा खूप जखमी झाला होता. तडफडत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवायला सांगून आवटी अपघात स्थळावर पोचले. सांडलेले रक्त बघून तो मुलगा वाचण्याची शक्यता कमीच होती. ते हॉस्पिटलकडे निघाले. अपेक्षेप्रमाणे "ब्रॉट डेड" असा शेरा डॉक्टरांनी कागदपत्रांवर मारला होता. ज्या हवालदाराने आणले त्याने माहीती दिली "माझ्यासमोर अ‍ॅक्सिडेंट झाला साहेब. तसा स्पीड पण नव्हता आणि रस्ताही सरळ होता. पण अचानक टू व्हीलर घसरली आणि याचं डोकं डिव्हायडरवर आपटलं." आवटींनी विचारलं "काही कागदपत्रं सापडली?" हवालदार म्हणाला "हे लायसंस होतं साहेब. शिवाय काही पैसे आणि हे एटीएम कार्ड" पत्ता शोधायला पोलिसांना वेळ लागला नाही. निलायम सोसायटी म्हटल्यावर आवटी हे नाव आधी कधी ऐकलं होतं ते आठवायला लागले. थोड्याच वेळात त्यांना आठवलं. त्यागी डेथ केस. 
ते निलायम सोसायटीकडे निघाले. मग विचार बदलून त्यांनी आधी फोन करून मुलाच्या आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये बोलावले. 
वातावरण शोकाकूल होते. जरा भर ओसरल्यावर त्यांनी व्हिक्टरच्या वडिलांना बाजूला घेतलं. "आय अ‍ॅम सॉरी पण मला काही चौकशी कराची आहे. पोस्ट मॉर्टेम मध्ये कळेलच पण तुमचा मुलगा व्हिक्टर ड्रिंक्स घेत होता का?" वडिलांनी शोकाकूल पणे म्हटले "वाया गेला होता तो साहेब. ड्रिंक्स घ्यायचा, मारामार्‍या करायचा, मुलींना छेडायचा. जिजसने पनिशमेंट केली साहेब." आवटिंनी विचारलं "मारामार्‍या करायचा?" "हो साहेब आजच आमच्या सोसायटीमधल्या विश्वास अत्रे यांना त्याने मारलं होतं" वडील म्हणाले. एकदम आवटींच्या डोक्यात लाल दिवा पेटला. "विश्वास अत्रे?" त्यांनी विचारलं. "होय साहेब." वडिलांनी सगळी घटना सांगितली. 
व्हिक्टरची बॉडी सोसायटीत पार सकाळी आणली. सोसायटीतले वातावरण सुन्न होते. सगळे कुजबुजत होते. व्हिक्टरबद्दल कोणाचेच मत चांगले नव्हते. पण सगळे त्याच्या आई वडिलांच्या दु:खात सहभागी होते. अंत्य यात्रा निघाली. सुभाष बाल्कनीतून बघत होता. त्याचे डोळे चमकत होते. मग तो आत आला.
सुभाष गोट्या खेळत होता..........
अपूर्ण

सुभाष - ४
सुभाष गोट्या खेळत होता......
विश्वासने पाहिले तर अजिबात नेम बसत नव्हता. फेकलेली गोटी कुठच्याकुठे पडत होती. म्हणजे आपल्याला वाटली तशी प्रगती झाली नव्हती तर. मान हलवत तो ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडला.
ऑफिसमध्ये सगळे त्याला पाहून दचकले. "अरे काय झालं हे? कुठे पडला बिडलास की काय?" विश्वासच्या चेहर्‍यावर ठीक ठीकाणी मार लागला होता. काही ठिकाणी पट्ट्या लावल्या होत्या तर काही भाग काळा निळा पडला होता. विश्वासने जे घडलं ते सांगितलं. "अरे मग पोलिस कंप्लेन्ट कर सरळ. सोडू नको अजिबात." विश्वास म्हणाला "करणार होतो रे पण त्याचे आई वडील अतिशय सभ्य व चांगले लोक आहेत. आणि दुसरं म्हणजे त्याचा अपघात झाला संध्याकाळी आणि तो गेला." सगळ्यांनी तो विषय तिथेच सोडला. 
विश्वासचा फोन वाजू लागला. इनस्पेक्टर आवटी होते. त्याला पोलिसस्टेशनला बोलावले होते. "काय त्रास आहे" म्हणत तो पोलिस स्टेशनला पोचला. इनस्पेक्टर आवटींसमोर बसला. आवटी शून्यात बघत बसले होते. कोणी काहीही बोलत नव्हते. विश्वास अस्वस्थ झाला. "मला कशाला बोलावलं आहे?" इनस्पेक्टर आवटींनी त्याच्यावर नजर रोखली "चेहर्‍याला काय झालं मि. विश्वास?" विश्वास म्हणाला "काही नाही काल जरा मारामारी झाली होती." आवटींनी विचारलं "व्हिक्टरशी?" विश्वास म्हणाला "होय. तो माझ्या मुलाला मारत होता. मग मी त्याच्याशी मारामारी केली. अर्थात तो मला भारी पडला. मला काही मारामारीची सवय नाही." "पण मारण्याची आहे. काय?" आवटींनी विचारले. "काय? म्हणजे काय म्हणताय?" विश्वास गडबडला. "व्हिक्टरला कस मारलं मि. विश्वास?" विश्वास उडालाच "काय? काय बोलताय?" आवटींनी थंडपणे त्याला न्याहाळले. "त्यागी गेले, व्हिक्टर गेला. दोन्ही अचानक मृत्यू. दोन्ही केसमध्ये मृत व्यक्तीशी आधी तुमचं भांडण झालं होतं. केवळ योगायोग?" विश्वास म्हणाला "हे बघा उगाच काही तरी बादरायण संबंध जोडू नका. योगायोगच आहे हा" आवटी बराच वेळ विश्वासला न्याहाळत होते. "बघू या मि. विश्वास. पण आम्हा पोलिसांचा योगायोगावर भरवसा नसतो. आता जाऊ शकता तुम्ही. पण हा प्रकार मला संशयास्पद वाटत आहे हे मात्र खरे" 
काल विश्वासचं नाव ऐकल्याबरोबर आवटींनी पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉक्टरना काळजीपूर्वक पोस्टमॉर्टेम करायला सांगितलं होतं. व्हिसेरा घायला सांगितला होता. व्हिक्टरची टू व्हीलर अत्यंत काळजीपूर्वक तपासली जाणार होती. छेडछाड झालेली सापडली तर विश्वासला उचलून थर्ड दिग्री देऊया असा विचार आवटींनी केला होता. "टायरमध्ये घालून मारू या साल्याला म्हणजे खरं ओकेल तो" ते स्वतःशी म्हणाले. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आला. काहीही वेगळं सापडलं नाही. दारूचे अंश जरी सापडले असले तरी ते फार नव्हते. ज्याला प्यायची सवय आहे त्याला शुद्धीवर रहाण्याइतके कमी होते. "मग कशाने तो पडला असावा?" आवटी अस्वस्थ होते. काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये असं त्यांना सारखं वाटत होतं. व्हिसेराचा रिपोर्ट दोन दिवसांनी येणार होता. पण आवटींना फारशी आशा नव्हती. व्हिक्टरला जरी काही खायला दिलं असलं तरी ते देणार्‍याला हे माहीत असणं शक्य नाही की त्याचा परीणाम कुठे आणि कसा होईल. विष असेल आणि नेमकं त्याच वेळी त्याची शुद्ध हरपायला लागून त्याची गाडी स्किड झाली असेल का? आवटींचं डोकं भणभणायला लागलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर विश्वास आला. तो हे करत असेल? वाटत तर नाही. पण असे निष्पाप चेहर्‍याचे लोक देखिल थंड डोक्याने खून करू शकतात हे आवटींना माहीत होते. पण विश्वासला आत टाकण्या इतकं काही त्यांच्या हातात नव्हतं. त्यांचा चेहरा कठोर झाला. "मी मुळा पर्यंत जाईन. जो असेल त्याला सोडणार नाही." त्यांनी मनाशी निश्चय केला.
विश्वासही अस्वस्थ होता. "असं कसं झालं असेल? नेमकं दोन्ही वेळा आपल्याशी भांडण झालं आणि काही तासातच ती व्यक्ती मरण पावली. कोणी आपल्याला अडकवण्याचा तर प्रयत्न करत नसेल? पण त्यागींचा तर नैसर्गिक मृत्यू झाला होता." विश्वास एका ठिकाणी चहा घ्यायला थांबला. पण चहा घेऊनही त्याची बेचैनी कमी झाली नाही. आज कामातही त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्यागी गेल्यानंतर त्यांचा चार्ज विश्वासकडेच होता. कामाचं खूप लोड होतं पण विश्वास आज काहीच काम करू शकला नाही. सहकार्‍यांनी त्याला चिअरअप करण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नव्हता. 
दोन दिवसांनी व्हिसेराचा रिपोर्ट आला. काहीही संशयास्पद आढळले नव्हते. आवटी हैराण झाले होते. असं कसं होऊ शकतं? हा खरच योगायोग आहे? पण त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घालायचं ठरवलं. एसीपी धनंजय कदम पोलिसखात्यात नावाजलेले होते. कडक अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला होता. सगळं ऐकल्यावर ते ही विचारात पडले. सगळे रिपोर्ट त्यांनी बारकाईने वाचले होते. मोटर सायकल तपासणार्‍याने अक्षरशः भिंग लावून तपासले होते. पण कुठेही फाऊल प्ले दिसून आला नव्हता. टू व्हीलरमध्ये काही छेडछाड झालेली दिसत नव्हती. ब्रेक व्यवस्थित होते. टायर ठीक ठाक होते. सगळच बरोबर होतं मग अपघात कसा झाला? पोस्ट मॉर्टेम मध्ये काही वेगळं आढळून आलं नव्हतं. त्यांनी डॉक्टरांच्या रिपोर्टवरून त्यांचा नंबर घेतला व फोन लावला. "डॉक्टर मी एसीपी धनंजय कदम बोलतोय. त्या व्हिक्टरच्या अपघाती मृत्यूबद्दल बोलायचे आहे. तुमचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट समोरच आहे माझ्या पण तरी मला विचारायचे आहे की तुम्हाला काहीच अनैसर्गिक आढळले नाही? आवटींनी तुमच्याशी या बद्दल आधी चर्चा केली होती ना? काय आहे की दोन्ही वेळा मृत व्यक्ती आधी एकाच व्यक्तीशी भांडली होती हे जरा संशयास्पद वाटतं." डॉक्टर म्हणाले "होय मला आवटी म्हणाले होते पण बारकाईने पाहूनही मला काहीच संशयास्पद आढळले नाही. व्हिसेरा देखिल नॉर्मलच आहे. तरीही मी तो अन्य एका डॉक्टरकडूनही तपासून घेतला. पण त्याच्या पोटात विष गेलय असं दिसत नाही. अन्य काही नशा आणणारी द्रव्ये देखिल सापडली नाहीत." धनंजयसाहेबांनी विचारलं "बरं डॉक्टरसाहेब जे तुम्ही लिहिलय ते मी वाचलं. पण बरेचदा खात्री नसते म्हणून काही गोष्टी रेकॉर्डवर आणल्या जात नाहीत. तसं काही आढळलं का?" डॉक्टर जरा घुटमळले मग म्हणाले "म्हणजे मला असं वाटलं होतं की अपघाताच्या थोडं आधी व्हिक्टरला ब्रेन हॅमरेज झालं असावं. त्याच्या मेंदूत मला रक्त साकळलेलं दिसलं." धनंजयसाहेब चमकले "डॉक्टर त्यागींचे पोस्टमॉर्टेम देखिल तुम्हीच केलं होतं ना? तुम्चा रिपोर्ट आहे समोर. त्यातही ब्रेन हॅमरेज हेच कारण दिसत आहे मृत्यूचे" डॉक्टर चकित झाले "अरे हो की. हे कनेक्शन माझ्या लक्षातच नाही आले. पण त्याने काय होणार?" धनंजयसाहेब म्हणाले "डॉक्टर ब्रेन हॅमरेज कशामुळे होतं? म्हणजे मला असं म्हणायचय की ते घडवता येतं का?" डॉक्टर विचारात पडले "म्हणजे ब्रेन हॅमरेज होण्याची अनेक कारणे आहेत पण एका निरोगी व्यक्तीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अचानक वाढलेला रक्तदाब हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि हो; रक्तदाब काही ड्र्ग्स देऊन वाढवता येतो पण या केस मध्ये तसं झालं असेल असं वाटत्य का तुम्हाला? त्या ड्रग ला अ‍ॅक्सेस असणे सामान्य व्यक्तींना अवघड आहे. त्यांना माहीती असणे देखिल अवघड आहे." धनंजयसाहेबांनी विचारलं "त्या दृष्टीने तपासलं नसेल ना?" डॉक्टरांनी कबूल केलं "नाही. तसा विचारच आला नाही." धनंजयसाहेबांनी विचारलं "डॉक्टर आता बॉडी एक्झ्यूम केली तर तपासता येईल का?" डॉक्टरांनी सांगितलं "शक्यता कमी आहे कारण ही ड्रग्स चोवीस तासात विघटन पावतात. त्यामुळे आता कितपत उपयोग होईल कोण जाणे." धनंजयसाहेबांनी आवटींना सांगितलं "आता काही करता येण्यासारखं नाही पण एक काम करा या विश्वासची कुंडली काढा. बघू या काही सापडत्य का ते. आणि एक जनरल वॉच असू दे त्याच्यावर." 
विश्वासची पोलिसांनी चौकशी केली हे सोसायटीत कळलं होतं. काही लोक येऊन विश्वासला भेटून गेले होते. विश्वास अगदी वैतागला होता. त्याने फोन करून रजा टाकली. आणि घरीच बसायचं ठरवलं. पण थोड्या वेळातच त्याला कंटाळा आला. शेवटी तो उठला आणि हिमानीला म्हणाला "चल आपण जेवायला बाहेर जाऊ या. आज तू पण रजा टाक." विश्वास; हिमानी आणि सुभाष बाहेर पडले. जेवणे झाली. विश्वासचा मूड जरा सुधारला होता. मग तिघं चक्कर मारत रजताद्री लॉजजवळून जात परत फिरू लागले. या भागात प्रचंड रहदारी असते. त्यामुळे विश्वासने सुभाषचा हात धरला आणि कडेने सगळे जाऊ लागले. तितक्यात एक टू व्हीलर सुसाट वेगाने आली आणि अगदी जवळून पुढे गेली. नकळ्त विश्वासच्या तोंडून शिवी गेली. टू व्हीलर लगेच थांबली. त्यावर तीन जण बसले होते. टू व्हीलर गर्रकन उलटी फिरवून ते विश्वास जवळ आले. "काय रं काय म्हनलास तू?" "विश्वास म्हणाला "मग? तुम्ही किती जवळून गेलात? आम्हाला धक्का लागला असता म्हणजे?" तिघं आता उतरले "लागला न्हाई न्हवं? मग शिव्या कशापाई दिल्या तू?" त्याने विश्वासची कॉलर पकडली. विश्वास म्हणाला "कॉलर सोड एक तर कशी पण चालवता आणि वर दादागिरी करता?" दुसरा तरूण हसला "दादागिरी? आरं अजून पायलीच कुटं रं तू आमची दादागिरी? दावू का?" विश्वासने हिसडा देऊन कॉलर सोडवली "अरे जा रे पुष्कळ पाहिलेत तुमच्यासारखे" तिघं खो खो हसले "आरं पायलेत बरं का आपल्यासारकं त्यानं. दिसतय ना थोबाड फोडलया कुनीतरी. तरी बी सुधरना. आरं गप बसावं ना घरी पोराबाळांसंगट. का उगा झेंगाड करतुयास?" त्याने विश्वासला जोरात ढकललं. सुभाष बघत होता. त्याचे डोळे चमकू लागले. तिघांवर त्याचे डोळे खिळले. चेहर्‍यावर हास्य उमटले. तितक्यात दोन हवालदार गर्दी का झाली आहे ते पहायला तिथे आले. काय झालं ते कळल्यावर त्यांनी मोटरसायकल वाल्यांना लायसन्स विचारलं. लायसन्स नव्हतच. "एक तर बिना लायसन्स, ते पण टिब्बल शीट. मस्ती आली व्हय रं XXXनो. चला पावती फाडा." एका हवालदाराने विश्वासला ओळखलं. त्याने आवटींना फोन लावला "साहेब ते विश्वास अत्रे आहेत ना? त्यांच इथे रजताद्री लॉज जवळ तीन तरूण मुलांशी भांडण झालय. तुम्ही सांगितलय ना लक्ष ठेवायला?" आवटी गडबडीने म्हणाले "थांबव सगळ्यांना मी येतो" 
आवटी येऊन पोचले. सगळं कळल्यावर त्यांनी त्या तिन्ही तरूणांना एक एक कानाखाली ठेवून दिली. दंड वसूल केला आणि सोडून दिलं. विश्वासला म्हणाले "जा तुम्ही मि. विश्वास. आज काय फिरायला बाहेर पडला होता?" विश्वास निघाला. आवटींनी हवालदाराला सांगितलं "आज कडक नजर ठेवा यांच्यावर. कुठे बाहेर पडले तर पाठलाग करायचा. कुठे जातात काय करतात ते सगळं मला सांगत रहा."
विश्वास घरी पोचला. सगळा मूड गेला होता. त्याने ताणून द्यायची ठरवले. सुभाषला हिमानी काहीतरी शिकवत होती. जरा वेळ डोळा लागला असेल. जाग आली तर सुभाष त्याला हलवून उठवत होता. तो ऊठला. हिमानीने दिलेला चहा घेऊन तो बाहेरच्या खोलीत येऊन बसला. सुभाष आला. त्याचे डोळे चमकत होते. "बाबा ते लोक कोण होते हो?" विश्वासला तो विषय नको होता "गुंड होते रे कोणीतरी. जा तू खेळ जा" सुभाषने कपाटातून गोट्या काढल्या. "बाबा मी त्यांना मारू?" विश्वासने त्याला टाळण्यासाठी म्हटले "जा मार" सुभाष बाल्कनीत गेला. विश्वासला आठवलं त्याने असच आजोबांना मारू का म्हणून विचारलं होतं. स्वतःच्या नकळत तो उठला आणि सुभाषचा खेळ बघू लागला. सुभाषने चार गोट्या मांडल्या. "हे बाबा आणि हे तीन गुंड" त्याने तीन गोट्या चिकटून तर एक वेगळी ठेवली "आता आपण त्यांना मारू या" त्याने मग दुरून त्या तीन गोट्या अचूक उडवल्या. विश्वास आश्चर्याने बघत राहिला. 
इनस्पेक्टर आवटी घरी निघायच्या तयारीत होते. तितक्यात हवालदार नाखरेचा फोन आला "साहेब हाय वे वरून बातमी आलीये. टू व्हीलर खड्ड्यात पडून तीन जण जागच्या जागी गेलेत म्हणे. आपल्या हद्दीत नाही पण साहेब टू व्हीलरचा नंबर तोच आहे विश्वास अत्रेंशी भांडलेल्यांच्या टू व्हीलरचा." आवटी जागच्या जागी थिजले. त्यांनी विश्वासवर नजर ठेवणार्‍या हवालदाराला फोन लावला "हणमंता त्या विश्वास अत्रेंची काय खबर?" हवालदार म्हणाला "काय नाय साहेब घरीच हाय तवाधरनं" 
आवटी अपघात स्थळी निघाले.
सुभाषचे डोळे चमकत होते
सुभाष गोट्या खेळत होता.
अपूर्ण
सुभाष - ५
सुभाष गोट्या खेळत होता......
 विश्वास जरा वेळ बघत उभा राहिला. मग काही विचार करून त्याने सुभाषला म्हटले "सुभाष ही बघ ही गोटी उडव पाहू" सुभाषने गोटी फेकली. पण ती कुठच्या कुठे पडली. अजून ४-५ वेळा प्रयत्न करूनही तसच झालं. विश्वास विचार करत बाजूला झाला. "इतका जर नेम चुकतो तर मग काही वेळाच तो कसा बरोबर लागतो? त्या वेळेस भांडणाचीच पार्श्वभूमी का होती?" विश्वास कामावर पोचला तेव्हां विचारातच होता. पण कंपनीच्या बाहेरच आवटी सिव्हिल मध्ये उभे होते. "मि. विश्वास चला तुमच्या बरोबर बोलायचे आहे." विश्वास म्हणाला "अहो साहेब मी किती वेळा सांगू की ना त्यागी साहेबांच्या ना व्हिक्टरच्या मृत्यूमध्ये माझा काही हात आहे म्हणून" आवटींनी भेदक नजरेने विश्वासकडे पाहिले "आणि कालच्या त्या तीन जणांच्या मृत्यूमध्येदेखिल तुमचा हात नसेल ना?" विश्वासला बसलेला धक्का त्यांना दिसला. "क....काय साहेब? काय झालं?" आवटी गरजले "चला पोलिस स्टेशनला मग सांगतो"
काल आवटी अपघातस्थळी पोचले तेव्हां तिथे सब इनस्पेक्टर साळवी होते. आवटींना सॅल्यूट ठोकून त्यांनी विचारलं "सर तुम्ही इकडे कसे?" आवटींनी आधीच्या दोन मृत्यूंची व विश्वासशी भांडणांची पार्श्वभूमी सांगितली. विश्वासबद्दल असलेल्या संशयाबद्दल पण कसलाही पुरावा नसण्याबद्दल देखिल सांगितले. "काय झालय की या तीन मुलांशी विश्वासशी दुपारी एक च्या सुमारास भांडण झालं होतं. चूक या मुलांचीच होती. खरं सांगायचं तर कोणत्याही भांडणांमध्ये विश्वासची चूक नव्हती. पण पुढे जी व्यक्ती त्याच्याशी भांडली ती व्यक्ती मरण पावली. अगदी त्याच दिवशी. आम्ही तर आज विश्वासवर वॉच पण ठेवला होता. पण तो घर सोडून कुठेही गेला नाही याबद्दल आम्हाला खात्री आहे. काही कळत नाहीये. एक तर तो अति हुषार आहे अथवा हे सगळे खरोखर योगायोग आहेत. पण तीन तीन योगायोग?" सबइनस्पेक्टर साळवी देखिल चक्रावले. "मोठी समस्या दिसते आहे. मग आता काय करायचय साहेब?" आवटींनी ए.सी.पी धनंजय यांना फोन लावला. "साहेब ते विश्वास अत्रे प्रकरण आहे ना? त्यात एक न्वीन कॉम्प्लिकेशन आहे साहेब." आवटींनी सगळी घटना सांगितली "साहेब एक निश्चित आहे की आम्ही त्याच्यावर वॉच ठेवला होता आणि तो नंतर घराबाहेर पडलेला नाही." आवटी थोडा वेळ ऐकत राहिले मग त्यांनी फोन सब इनस्पेक्टर साळवींना दिला. साळवी एकदम ताठ झाले "यस सर ! हो सर. नीट पंचनामा करतो सर. हो सर हो अगदी नीट तपासतो बाईक." आवटींनी मग कोण डॉक्टर पोस्ट मॉर्टेम करतील याची चौकशी करून त्यांना फोन लावला "डॉक्टर तीन बॉडी पाठवतोय पोस्ट मॉर्टेमला..... अं काय? नाही माझ्या हद्दीत नाही पण इथे सबइनस्पेक्टर साळवी आहेत ना..... बरं त्यांच्याशी बोला" त्यांनी फोन साळवींना दिला. साळवींनी फोनवर बोलायला सुरुवात केली "डॉक्टर हे मॅटर फार गंभीर आहे. स्वतः ए.सी.पी साहेब लक्ष घालत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून आवटीसाहेब आलेत. मी त्यांना फोन देतो. ते बोलतील... हो ठीक आहे साहेब ते मी बघून घेईन" साळवी हसत होते. मोबाईलवर हात ठेवून म्हणाले "काही नाही इगो प्रॉब्लेम. बोला साहेब" आवटींनी फोन कानाला लावला "तर डॉक्टरसाहेब झालय असं... " त्यांनी सारी हकीकत डॉक्टरांना सांगितली. शिवाय आधीच्या डॉक्टरांना देखिल या डॉक्टरांशी बोलायला सांगितलं. धनंजयसाहेबांनी देखिल डॉक्टरांना फोन केला "डॉक्टर; आवटींनी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेच असेल. तर मला पोस्ट मॉर्टेम काळजी पूर्वक करून हवय. आधीच्या दोन्ही डेथ्स मध्ये ब्रेन हॅमरेज झालेले सापडले होते. पण ते दुसर्‍या केस मध्ये ऑफ दि रेकॉर्ड ठेवले गेले. तसच जर काही सापडलं तर तुम्ही पण मला ऑफ दी रेकॉर्ड सांगू शकता. आणि हो जर काही ड्रग्स, त्यातल्या त्यात नशा आणणारी, ब्लड प्रेशर वाढवणारी अथवा अन्य कोणतेही मेडिकल कंडिशन जी नॉर्मल नाहिये असं दिसल्यास मला सांगा." बाईक अत्यंत बारकाईने तपासली गेली. हुशार मेकॅनिक आणला होता कंपनी शोरूम मधून पण काहीही गैर सापडले नाही. 
विश्वासला घेऊन आवटी पोलिस स्टेशनला पोचले. "हं मि. विश्वास बोला पटापट मला वेळ नाही. आधीच सांगतो माझा योगायोगावर अजिबात विश्वास नाही. आणि मला माझा वेळ घालवलेला आवडत नाही. पाच मृत्यू झालेत आणि पाची जणांशी तुमचे भांडण झाले आहे. बोला कसं मारताय या लोकांना" विश्वास एकदम रडायलाच लागला "साहेब मलाही कळत नाहीये हो हे काय घडतय ते. मलाच भीती वाटू लागली आहे. सगळ्यांचं माझ्याशी भांडण झालं होतं हे मला मान्य आहे पण मी खरच काही केल नाही हो" विश्वास अगदी केविलवाणा झाला होता. आवटी त्याच्याकडे निरखून पहात होते. त्यांना तो खोटं बोलतोय असं वाटलं नाही. त्यांची पोलिसी नजर तरबेज झाली होती. पण तसं न दाखवता त्यांनी जरबेने म्हटले "आता सोदतोय मी तुम्हाला पण आम्हाला जरा जरी पुरावा मिळाला ना तुमच्या विरुद्ध तर मग आम्ही कसे सरळ करतो लोकांना ते पहाल"
विश्वास त्राण गेल्यासारखा बाहेर पडून भरकटल्यासारखा चालत राहिला. बर्‍याच वेळाने भानावर आल्यावर त्याने रिक्षा केली आणि घरी पोचला. मागावर असलेल्या हवालदाराने आवटींना माहिती दिली. 
हिमानी आणि सुभाष शाळेत गेले होते. विश्वास कोसळल्यासारखा बिछान्यावर पडला आणि डोळे मिटून पडून राहिला. पण तो इतका बेचैन होता की थोड्या वेळातच उठून येरझारे घालू लागला. परत जाऊन पडला. जरा वेळाने काही विचार करून तो उठला आणि आई पाशी जाऊन तो म्हणाला "आई हल्ली सुभाष फार मारण्या बिरण्याच्या गोष्टी करत आहे असं मला वाटतय. तुला बोलला का गं कधी?" आजी म्हणाली "मला एकदा बोलला होता. म्हणजे तुझे ते साहेब गेले बघ. त्या दिवशी याने विचारलं होतं की त्यांना मारू का म्हणून आणि मग मी मार म्हटलं आणि तो गोट्या खेळायला गेला होता. बाहेरून त्याचा आवाज येत होता की हे साहेब आणि आता त्यांना मारू या म्हणून. पण का रे? काय झालं?" विश्वासने म्हटले "नाही काही नाही आई. पण या वयात मारण्या बिरण्याच्या गोष्टी करणे योग्य नाही ना." आई म्हणाली "त्याला काय कळतय रे बिचार्‍याला. कुठून तरी ऐकतो आणि बोलतो. नको इतका विचार करूस."
विश्वास एक कागद घेऊन टेबलाशी बसला आणि लिहू लागला 
१. माझं वडिलांशी भांडण : सुभाषने मारू का विचारले आणि एक गोटी उडवली : वडिलांचा मृत्यू
२. माझं त्यागीसाहेबांशी भांडण : सुभाषने आईला मारू का विचारून एक गोटी उडवली : साहेबांचा मृत्यू
३. माझं व्हिक्टरशी भांडण : सुभाषलाही मारलं होतं बाकी माहीत नाही पण व्हिक्टरचा मृत्यू
४. माझं त्या तीन जणांशी भांडण.: सुभाष ने विचारलं की त्यांना मारू का आणि तीन गोट्या एकदम उडवल्या : तिघांचा मृत्यू
विश्वास कागदाकडे बघत बसला. काही लिंक आहे का? सुभाषमध्ये अथवा त्याच्या अवतीभवती काही अमानवी शक्ती? आता हे हिमानीला आणि आईला कसं सांगायचं? जो जो विश्वास विचार करू लागला तो तो त्याला काहीतरी जाणवू लागलं. त्याला आता भयंकर भीती वाटू लागली. त्याने उठून कागद कपाटात ठेवला. 
रिपोर्ट्स आले. काहीही संशयास्पद नव्हतं बाईक अगदी ठीक होती. तिघांच्याही शरीरात कोणतीही ड्रग्स सापडली नव्हती. हां पण तिघांनाही ब्रेन हॅमरेज झालेलं असावं "असं ऑफ दी रेकॉर्ड" डॉक्टरांनी सांगितलं होतं. 
विश्वास चक्कर मारायला बाहेर पडला. फिरत फिरत तो बराच दूर गेला. मग माघारी फिरला. हवालदार त्याच्या नजरेस न येता त्याचा पाठलाग करत होता. चालता चालता विश्वास गर्दीच्या ठिकाणी आला. रस्ता क्रॉस करायला थांबला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या नादात त्याला हॉर्न ऐकूच आला नाही. एका गाडीने करकचून ब्रेक मारला. ड्रायव्हर संतापून खाली उतरला. "क्या बे दिखता नही क्या? बहरा है? कबसे हॉर्न बजा रहा हूं सुनाई नही देता क्या? मरना है?" विश्वासने सॉरी म्हटले आणि तो जायला लागला. पण त्या ड्रायव्हरला आता चेव आला होता. त्याने विश्वासची गचांडी धरली "सॉरी क्या? तू मरता था तो मेरेको भुगतना पडता था ना?" तितक्यात विश्वासवर वॉच ठेवणारा हवालदार पुढे आला. त्याने दोघांना बाजूला केलं आणि विश्वासला जायला सांगितलं. त्याने फोनवरून आवटींना खबर दिली. आवटींनी सांगितल्याप्रमाणे गाडीचा नंबर घेतला आणि ड्रायव्हरचं नाव विचारून घेतलं. मग तो परत विश्वासच्या मागोमाग निघाला. 
आज विश्वासने ही घटना घरी न सांगायचा निश्वय केला होता. 
चार दिवस उलटले. कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. विश्वासने सुस्कारा सोडला. आवटींना देखिल बरं वाटलं. "कदाचित योगायोगच असेल" ते मनाशी म्हणाले.
विश्वास कामावरून घरी आला. त्याने पाहिलं हिमानी पण नुकतीच आली होती. त्याने बाहेर पाहिलं तर ....
सुभाष गोट्या खेळत होता.........
अपूर्ण